लाटाच लाटा

 निळाशार समुद्र आणि त्याचं अथांग अस्तित्व. त्याची उसळलेली लाट जमिनीपर्यंत पोहोचावी न मग त्याच्या व्यक्तित्वाची जाणीव भुईला व्हावी. लाटेलाटेतून होत आसावा संवाद नभाचा नि भुईचा. या लाटांतून आकंठ जगावं या भूमीनं आणि उकलीत जावं कोडं या विश्वाचं. 
कधी उंच लाटा कधी मध्यम लाटा. कधी वेगवान लाटा कधी संथ लाटा. कधी दिवसाच्या लाटा कधी रात्रीच्या लाटा. कधी भरभरून येणाऱ्या लाटा कधी दूर सरून लांब निघून जाणाऱ्या लाटा. कधी चकाकणाऱ्या लाटा कधी निस्तेज लाटा. कधी गडबडीने घोंघावत येणाऱ्या लाटा तर कधी एकट्या निशब्द लाटा. कधी मुक्त लाटा कधी बंदिस्त लाटा. कधी प्रसन्न लाटा कधी खिन्न लाटा. कधी आक्रोश करत गर्जत येणाऱ्या लाटा तर कधी भेदरलेल्या लाटा. कधी लोभसवाण्या लाटा तर कधी किळसवाण्या लाटा. कधी मादक लाटा तर कधी बावरलेल्या लाटा. कधी नव्या कोऱ्या लाटा तर कधी जुन्याच लाटा. कधी जोडणाऱ्या लाटा कधी तोडणाऱ्या लाटा, कधी भांडणाऱ्या लाटा कधी सामंजस्याच्या लाटा. कधी हव्याशा लाटा कधी नकोश्या लाटा. कधी एकेरी लाटा कधी दुहेरी लाटा, कधी शंखशिंपल्यात मढलेल्या लाटा तर कधी भुंड्या लाटा; कधी सजीव लाटा कधी निर्जीव लाटा. 
अन् मग हळूहळू ओळखीच्या लाटा, सवयीच्या लाटा, जोखायच्या लाटा, रोखायच्या लाटा, कसलेल्या लाटा, फसलेल्या लाटा, चुकलेल्या लाटा, सुकलेल्या लाटा, दमलेल्या लाटा, थकलेल्या लाटा. लाटाच लाटा, बेसुमार लाटा, फेसाळलेल्या लाटा, पिसाळलेल्या लाटा अनंत लाटा आणि निरंतर लाटाच.

टिप्पण्या