(इनोव्हेशन) नाविन्य भाग १

इनोव्हेशन
नाविन्य ... थोडक्यात ... बरंच काही 

एकदा एका घरात चार पाच वर्षे वयाची दोन लहान मुले खेळत असतात. खेळ असतो सापशिडीचा, त्यात असतात चार वेगवेगळ्या रंगांच्या सोंगट्या, एक फासा आणि त्या सापशिडीचा पट. सुरुवातीला आईबाबा सांगतात तसे तो फासा टाकत सापशिडी खेळायचा ते दोघे प्रयत्न करतात. दहा मिनिटं होतात तोच सापशिडीचा पट बाजूला राहतो. आता हातात राहतं ते त्या खेळाचं खोकं. हळूहळू ह्या सोंगट्या वेगवेगळ्या भाज्या होतात आणि त्या खोक्याची कढई होऊन जाते. मग दोघेजण ती भाजी मोठ्या उत्साहाने आणि आत्मविश्वासाने आईबाबांना आणून भरवू लागतात. आईबाबा कौतुकाने ते खातातही. मग जरा वेळाने त्या सोंगट्या बाजूला पडतात  आणि त्याऐवजी ह्या खोक्यांची गाडी बनते; ही दोघे मुले आता या गाडीत स्वार होऊन घरभर खोटाखोटा होर्न वाजवत फिरू लागतात. पुन्हा लक्ष दुसरीकडे गेलं की दुसरा खेळ असं या मुलाचं चालू राहतं. तुम्हाला वाटेल, ही कसली गोष्ट, सापशिडी सोडून तर सगळं काही खेळतात ही मुलं. मग कसलं कौतुक? पण याच ‘न खेळलेल्या खेळात’ (इनोव्हेशन) ‘नाविन्य’ नावाची गंमत दडलेली असते आणि ही दोघं लहान मुलं इतर कोणी नसतात आपणच असतो लहानपणीचे. तेव्हा आपल्या कल्पनांचे पंख पसरून आपण असेच घरभर उडत असतो.
ऐतिहासिक काळात आदिमानवाने आगीचा, चाकाचा शोध लावला. हे शोध लागत गेले तसे माणसाचे आयुष्य जगण्यासाठी योग्य, सोपे आणि आरामदायी बनत गेले. असे बदल घडले नसते तर आपल्याला जमीन आणि हवामानावर अवलंबून राहावे लागले असते. गरज ही शोधाची जननी असते त्यानुसार हे शोध लागत गेले;  माणूस प्रगत होऊ लागला व त्याच्याकडे विविध विषयांचे ज्ञान आत्मसात होऊ लागले. मग त्याने उपलब्द्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून नवीन वस्तू बनविण्यास सुरुवात केली. जसे; पेपर, रबर, शाई अशा निरनिराळ्या वस्तूंचा एकत्रित वापर करून प्रिंटींग सारखे तंत्र अस्तित्वात आले.
जगात अस्तित्वात असलेल्या गोष्टी माणसाला जेव्हा सापडतात तेव्हा त्यांचा शोध लागतो. मग तो त्या वस्तू सहजगत्या वापरू लागतो व कालांतराने ती गोष्ट कुठल्यातरी एकाच कारणासाठी वापरली जाऊ लागते. अशा वेळी जेव्हा त्या गोष्टीचा वापर वेगळ्या पद्धतीने केला जातो किंवा त्यापासून एखादी वेगळीच वस्तू, साधन, पद्धत अस्तित्वात येते तेव्हा त्याला (इनोव्हेशन) नाविन्य किंवा नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून संबोधले जाते.
कुठेतरी प्लॅस्टिकच्या एखाद्या रिकाम्या बाटलीला बारीक भोके पाडून, तिच्या तोंडाला पाण्याचा पाईप लावून त्या बाटलीचा बागेतल्या कारंज्यासारखा उपयोग केलेला दिसतो. कुठे कुणीतरी पेपरची क्लीप उघडून थोडीशी सरळ करत त्याची सुई बनवत मोबाईलचं सीमकार्ड व्यवस्थित लावताना दिसतं. कोणी रात्री झोपून पुस्तक वाचता यावे यासाठी दिवाणाजवळ एखादा पुस्तक धरणारा स्टँड लावून घेतो. तर जपान सारख्या देशातील लोक फुटपाथवर चालता चालता तयार होणारी गतिज उर्जा स्थितिज उर्जेत रुपांतरीत करून तिच्यापासून फुटपाथवरचे दिवे जळत ठेवणारी इलेक्ट्रिसिटी तयार करतात.
कल्पनाशक्तीच्या आधाराने ज्ञान आणि क्षमतेच्या बळावर माणूस कितीक उत्तमोत्तम नाविन्यपूर्ण वस्तू जगात घडवित आहे. या सदराच्या माध्यमातून आपण त्यातील काही वस्तू, उपक्रम आणि पद्धती यांची ओळख करून घेणार आहोत. 
                                                                           
                                                                                जुलै २०१६ शिक्षणविवेक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा