जुलै महिना आला की कायम असं होतं
कळत नकळत मन जुन्या दिवसात जातं
असं नसतं की हे फक्त मलाच वाटतं असं
फेसबुकवर या दिवसात कुणी नं कुणी ‘बालरंजन’चा फोटो शेअर किंवा लाईक करत असतं
जुने दिवस जुन्या आठवणी मग रांगेत ओळीनी उभ्या
राहतात
उंचीप्रमाणे उभं करताना तारांबळ आणि आनंद एकदम
देऊन जातात
एप्रिलमध्ये जाहीर होते पुरुषोत्तम नावाची नाटकाची स्पर्धा
त्यासाठी नेपथ्य, अभिनयच नाही लेखनाचीही ऑडिशन देऊन सिद्ध करायचा दर्जा
काहीतरी करू म्हणत आपण सगळीकडेच नाव देतो
घाबरत घाबरत उतारा वाचतो
जिजाऊ किंवा झाशीची राणी बनून दाखवतो
ते सगळं बघताना सिनियर्स छद्मीपणे हसत असतात
कास्ट आधीच ठरली असल्याचं अभिनयातून लपवित असतात
नेपथ्यातून आपल्या इंजिनियरिंग ची परीक्षा होते
सेटचा आकार फक्त चौकोन या सदरात मोडत असतो
लेव्हल किंवा मोडा यांनाही फक्त शब्दशः अर्थ असतो
खूप चर्चा विचार करून तुम्ही एकदाचे टीममध्ये
पोचता
कसंबसं रडतखडत मग घरी आईबाबांना पटवता
रात्रीची प्रॅक्टिस म्हणून मुलींना एकेक बॉडीगार्ड
दिला जातो
फाटका दिसला कोणी की बिचारा त्यातून दुसऱ्या
दिवशी रद्द होतो
कधी खूप कठीण किंवा कधी अगदीच सोप्पं स्क्रिप्ट
मग हातात येतं
पहिली दुसरीच्या बाराखडीची आठवण करून देतं
पहिल्या मजल्यापासून तिसऱ्या मजल्यापर्यंत मग
आवाजाची चाचणी होते
एकाच जागेत रडणं, चिडणं, हसणं, खिदळणं करत
अभिनयाला उधाण येते
कॉलेजच्या फरशीवर मग खडूनी उभ्या आडव्या रेघा
गोळे काढत स्टेज काढलं जातं
पोर्चमध्ये बसून कंटाळलेल्या गणपतीलाही आमचं
नाटक हाहा म्हणता पाठ होतं
तालमीची जागा आता बदलणार असल्याचं समजतं
बसलेलं नाटक बालरंजन नावाच्या स्टेजवर उभं राहतं
नेपथ्यातील वस्तू आता तयार झालेल्या असतात
मास्किंगचे रंगही आता वाळून गेलेले असतात
शब्दांना आता संगीताची साथ मिळालेली असते
रंगीत प्रकाशाने ती कलाकृती नटून तयार असते
रंगीत तालीम जवळ येते आणि भरतचं दर्शन घडतं
रंतामधून चुका सोडून काही हाती लागत नसतं
कोणाला रेडियम दिसत नसतो अंबर काय पत्ता नसतो
मास्किंगच्या घड्या उलगडताना प्रत्येकाचा ठोका चुकत
असतो
सगळ्या दुरुस्त्या करून पुन्हा नव्याने तयार
होतात सारेच
चार दिवसांनी मिळालेल्या करंडकाच स्वप्न बघतात खोटेच
पुढच्या चार दिवसात तसं विशेष काही घडत नाही
बदलतात एक दोन संवाद, चार सहा हालचाली आणि नाटकाचा
आशय
गेल्या दोन महिन्यांनंतर खरं तर सगळ्यांना पहिल्यांदा
कळतो नाटकाचा विषय
कोणाला काही माहित नसतं प्रयोग कसा होईल?
सगळ्यांना फक्त वाटत असतं आता आपल्याला पुढच्या
वर्षी पुरुषोत्तम नक्की करता येईल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा