(इनोव्हेशन) नाविन्य भाग २





इनोव्हेशनची सुरुवात घरापासून ...

सध्या आपण जे म्हणू ते आपल्याला मिळतंय. नवीन वही, नवं पुस्तक, नवी सायकल, नवा खेळ, नवा टीव्ही, नवं घड्याळ, नवे कपडे अगदी काय वाट्टेल ते आपल्याला मिळू शकतं. जर सगळंच उपलब्ध असेल तर काय नि कशाचा शोध लावणार आणि कुठलं इनोव्हेशन करणार? आपल्याकडे अशी कुठली गरजच उरत नाही जी भागत नाही मग अशा वेळी आपली कल्पनाशक्ती काम न करेल तर काय विशेष. पण आपल्याला अगदी बालवाडीपासून ते पार उच्चशिक्षण घेत असताना आजूबाजूने सगळेजण सांगत राहणार आउट ऑफ बॉक्स विचार करा, चाकोरीपलिकडचा वेगळा विचार करा आणि आपण मात्र या गोंधळात ठरलेला अभ्यास आणि मिळालेले मार्क पदरात पाडून मोठे होत राहणार. पण एखाद्या दिवशी खरंच असं वेगळं काही करायचं ठरवलं तर थोडं हटके जगायचं ठरवलं तर कुठून सुरुवात करायची?... अर्थात आपल्या घरापासून.
आपलं घर हेच असू शकतं आपल्या कल्पनाशक्तीला चालना देणारी कार्यशाळा. आपण जरा डोळे उघडे ठेवून बघितलं तर जाणवेल की कित्येक गोष्टी आपण अनवधानाने इनोव्हेट करून टाकल्यासुद्धा आहेत. अगदी रोजचा दात घासायचा ब्रश जुना झाला की आपण त्याचा वापर स्प्रे पेंट करायला करतोय, एखाद्या ग्लासमधून पेनपेन्सिल पट्टी डोकावतेय तर कपाटाच्या दारावर आपलं शाळेचं वेळापत्रक चिकटलेलं आहे. जरा स्वयंपाकघरात गेलो की तर कुठल्याशा जुन्या डब्या, बाटल्या, बरण्या वेगळ्याच पदार्थांनी भरलेल्या असतात. कुठल्याशा बारीक बाटलीत हळूच एखादी कोथिंबीर किंवा कढीपत्ता उगवलेला असतो आणि कुठल्याशा कोपऱ्यात ठेवलेल्या तांदूळाच्या पिंपावर मखमली कापडावर मिक्सरने जागा घेतलेली असते. जुन्या कापडाच्या तुकड्यांचं पायपुसणं बनून गेलेलं असतं. घरभरातला इंचनइंच वापरत आपण ते जगण्यासाठी सोईस्कर करत असतो.
केवळ माणूसच नाही तर कित्येक मोठमोठाल्या कंपन्या त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य घटक म्हणून इनोव्हेशन या मुद्द्याला महत्त्व देतात. 3M सारखी कंपनी आज गेली जवळपास ११४  वर्ष जगात याच इनोव्हेशन च्या बळावर अधिराज्य गाजवत आहे. post it-notes हे या कंपनीचे खूप प्रसिद्ध असे उत्पादन. सर्वप्रथम या कंपनीतील स्पेन्सर सिल्व्हरने एक प्रकारच्या डिंकाचा शोध लावला ज्यामुळे दोन गोष्टी एकमेकीना चिकटतील परंतू त्यातील एक वस्तू बाजूला केली तर त्याचं निशाण दुसऱ्या वस्तूवर राहणार नाही. पुढे काही वर्षानी आर्थर फ्रायने  त्याच्या हातातील पुस्तक उघडताना बुकमार्क गळून पडले, तेव्हा हा डिंक वापरून त्यावर कागद चिकटवून बघितला. त्या प्रकारच्या पद्धतीने पुढे post it नोट्स अस्तित्वात आल्या आणि त्यांनी जगाच्या बाजारपेठेत इतिहास घडवला.
एखादी प्लॅस्टिकची बाटली, एखादा लोकरीचा तुकडा इतकच काय एखादा दगड किंवा वीट विचारात घेत त्या वस्तूचा काय काय म्हणून उपयोग होऊ शकतो यावर तासनतास चर्चा केली जाते. त्यातील कुठलाही मुद्दा लहान किंवा मोठा मानला जात नाही तर त्याला कल्पना म्हणून महत्व दिलं जातं. यासारख्या कोणतेही बंधन न मानता केलेल्या विचारमंथनातून स्मार्टफोन-मोबाईल, अॅपल कम्प्युटर, रंगीत विटा किंवा स्वयंचलित गाडी अशी उत्पादने अस्तित्वात येत असतात.
वस्तूचा नवा उपयोग केला गेला, त्यापासून नवी वस्तू बनवली गेली तर त्याला व्यवसायाचं रूप देतं येईल का, त्या व्यवसायातून पैसा मिळवता येऊ शकतो का किंवा एखादी नवी बाजारपेठ निर्माण करता येऊ शकते का एवढा मोठा विचार या लहानश्या कृतीमधून करता येऊ शकतो. आपणही जर घरातील एखादी गोष्ट आणखी सहज वापरता यावी म्हणून जाणीवपूर्वक बदल करायचं ठरवलं तर खूप काही करू शकतो. 

                                                                       सप्टेंबर २०१६ शिक्षणविवेक

टिप्पण्या