गेल्या काही महिन्यांपूर्वी ‘अचानक’ या
शब्दाचा अर्थ मला नव्याने नुसता कळला असं नाही तर अनुभवायलाही मिळाला. काय गंमत
असते? आपण एखादी गोष्ट जेव्हा ठरवून करतो आणि ती जमते तेव्हा आनंद होतोच. पण जर
अशी एखादी गोष्ट अनपेक्षित असताना करायला मिळाली आणि थोड्याफार प्रमाणात ती
मनासारखी करता आली तर मिळतं ते समाधान. असो, आनंद समाधान ...फार शाब्दिक खेळ नकोच.
जून मध्ये मी California त आले. खूप दिवसांनी
.. नाही.. वर्षांनी माझ्या एका शाळेतल्या मैत्रिणीला भेटले. पु ल म्हणतात तसं दोन
ड्रायव्हर, दोन कंडक्टर, दोन मुंग्या त्याच धरतीवर पुढे जाऊन म्हणीन शाळा किंवा
कॉलेजमधले दोन मित्र मैत्रिणी भेटले की न संपणाऱ्या गप्पांची फैर झडते. विशेष
म्हणजे “याला हे सांगायचं नाहीये, किंवा ते तिला सांगायचं नाही हे लक्षात ठेवायचं
आहे” असल्या कॉर्पोरेट भानगडी नसतात. तशा ओघात तिने ‘California arts association अर्थात कला या संस्थेतर्फे एकांकिका महोत्सव आयोजित होत आहे’ हे सांगितलं. ‘नंदे,
करूया का नाटक?’ या तिच्या प्रश्नानी आमच्या एकांकिकेला सुरुवात झाली. नाटकाचा
विषय वास्तवाशी सम्बन्धित असावा म्हणजे तो लोकांना जवळचा वाटू शकतो हे ठरलं.
काळ जसजसा पुढे जातोय, मुली independent होत आहेत
सर्वार्थानं तसतसं त्यांचं लग्न करण्याचं वय वाढत चाललेलं आहे, या मुली असं का करत
असतील? हा विषय कुठेतरी प्रत्येकाच्या घरात, कट्ट्यावर ऐकला जातोय त्यावर
निरनिराळी मतं व्यक्त होताहेत. याच विषयावर आधारित अशी पण थोडीशी मनोरंजक अशी
एकांकिका लिहिता आली. कित्येक विचार मनात साठून असतात पण या नाटकाच्या निमित्ताने
ते मला मांडता आले.
कला या संस्थेच्या कार्यकारी सदस्यांनी
एकांकिकेची ती script महोत्सवासाठी निवडली. कुठेतरी चर्चा या प्रकारात मोडणाऱ्या
या एकांकिकेला उभं करताना दिग्दर्शन कसं करावं हा challenge होता. त्यामुळे
जबाबदारीची जाणीव होत होतीच पण ‘आपल्या मुलाला day care मध्ये पाठवताना जशी आईची
घालमेल होत असते’ तशी रुखरुख वाटत नव्हती. एकांकिकेच्या दिग्दर्शनाचे ना कधी धडे
घेतलेले ना प्रत्यक्ष अनुभव. पुण्यात असताना पुरुषोत्तम सारख्या वेगवेगळ्या एकांकिका
स्पर्धात सहभाग घेतला त्या निमित्ताने नाटक या क्षेत्राशी ओळख झालेली. त्यात मी या
देशात नवीन. तयार कलाकारांचा संच बरोबर नाही. असं असताना या संस्थेने आयोजित
केलेल्या auditionमुळे अशाच समविचारी मित्रमैत्रिणींच्या एका गटाशी ओळख झाली आणि नाटकातली
पात्र निश्चित झाली.
नवीन लेखक दिग्दर्शकाच्या बरोबर काम करताना त्याला
स्वीकारत, आदर देत, प्रसंगी वाद घालून मतभेद व्यक्त करत माझ्या टीमने एकांकिकेला ताकदीने
उभं केलं. गेल्या ९ ऑक्टोबर ला ही एकांकिका cubberley theatre येथे सादर झाली.
त्या थिएटरचं स्टेज, इतर तांत्रिक सुसज्जता हे सगळं स्वप्न वाटून गेलं. नाटकाचं
सादरीकरण ‘प्रयोग’ असतो असं का म्हटलं जातं याचा पुन:प्रत्यय आला आणि पुन्हा एकदा
खूप काही शिकायला मिळालं. नाटक झाल्यावर कौतुकही झालं आणि काही रोखठोक टीकाही त्यामुळे
आपल्यातली थोडीफार कला जिवंत असल्याचा आनंदच अधिक झाला हा भाग वेगळा.
स्पर्धेसाठी नाटक करतानाचा अनुभव आणि त्यासाठी केलेलं जीवाचं रान, करंडकासाठी
केलेली धडपड आठवली. या वेळचा अनुभव त्यापेक्षा वेगळा होता. नाटकात काम करणारा प्रत्येकजण
स्वतःचा job, घर, मुलं या सगळ्यातून वेळात वेळ काढून स्वतःची आवड जपत होता.
त्यामुळे या प्रक्रियेमध्ये ठेहराव होता, समजूतदारपणा होता आणि थोडी प्रगल्भताही होती.
निरपेक्ष, निखळ आनंद आणि आठवड्यातले काही तास चौकटी आयुष्याला भेदत मिळवलेला
निवांतपणा होता.
शिक्षण पदवीने मोजायचं, नोकरी पैशाने, कुटुंब घराच्या आकाराने अश्या संकुचित
विचारसरणीला छेद देत कलेची आवड असणारे चार जण एकत्र येतात. एकमेकांच्या विचारांची
देवाणघेवाण करतात आणि एका छानश्या
कलाकृतीची निर्मिती करतात. यातून मिळणारा मोजता न येणारा ‘अनुभव’ खूप काही शिकवून
जातो आणि नवं काहीतरी करण्याचं बळ देऊन जातो.
All Photo Credits: +Yuvraaj Kelkar
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा