परवा काय झालं, फोनवर बोलता बोलता एकीनं मला विचारलं,
जsssरा काही झालं.. की लिहायला हवं का? मी म्हटलं, हो, लिहायला हवं.
पावसाची चाहूल लागली की पाउल खिडकीपाशी वळायला हवं.
किती गप्प बसशील मना, बरसायचं कधी? हे आता तुला कळायला हवं.
जुन्या कागदांची पोतडी दिसली की तासभर तिच्यापास बसायला हवं.
बघू उद्या बिद्या; नाही! मना, आत्ताच्या आत्ता तुला हे जमायला हवं.
उत्सव, दसरा, दिवाळी आली की फराळाचं ताट सजायला हवं.
जगरहाटी रे मना, किमानपक्षी चार दिवस चारचौघांसारखं जगायला हवं.
कठीणच असतात प्रश्न सगळे, एखादं प्रश्नचिन्ह न लाजता ऑप्शनला टाकायला हवं.
विश्वाची चिंता करणं सगळं ठीक. पण मना, मुर्खांचं एक तरी लक्षण आपल्यातही
दिसायला हवं.
अन्याय, असत्य फिरत असतात वाटेत, त्यांनाही न घाबरता भेटायला हवं.
भीती, सहनशक्ती पुरे झालं, मना, तुला स्पष्टपणे व्यक्त व्हायला आता शिकायला
हवं.
तिचं म्हणणं, त्याचं वाटणं, चूक बरोबर खरं नि खोटं.... चालायचंच.
जिवंतपणाची लक्षणं ही मना. सद्सदविवेकबुद्धीशी तू आता नातं जोडायला हवं.
ढग, शब्द दोन्ही आता शांत. कामांची यादी, कुकरची शिट्टी,
उघड्या डोळ्यानं सहसा वास्तवच बघायला हवं.
जाता जाता एखादं कडवं मीटर सोडूनही लिहायला हवं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा