कृत्वा नवदृढसंकल्पम्.......
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रसन्नता, चैतन्य. पाहावं तिकडे उजेडाचं, प्रकाशाचं, तेजाचं साम्राज्य. अशा दिवसांत संध्याकाळी अंधार पडला की घराघरातून डोकावणारे सूर्याची ही लहानशी प्रतिकं बघितली की मला कायम एका शास्त्रज्ञाची आठवण येते. तो म्हणजे थॉमस एडिसन; ज्याने इलेक्ट्रिसिटीवर चालणारा बल्ब शोधून काढला. याच शास्त्रज्ञाची आणखी एक गोष्ट, त्याने त्याच्या घराचं गेट म्हणे बागेत पाणी घालणाऱ्या एका पंपला जोडलं होतं. जेणेकरून जेव्हा जेव्हा त्याच्याकडे कोणी पाहुणे येत तेव्हा येताना व जाताना बागेला आपोआप पाणी घातलं जाई. किती वेगळा विचार आणि किती कमालीचा हा उर्जेचा वापर.
आजच्या काळात लोकसंख्या
ज्या प्रमाणात वाढतेय त्याच प्रमाणात उर्जेची गरज वाढतेय. ऊर्जानिर्मितीच्या
क्षेत्रात पारंपारिक , अपारंपरिक उर्जास्रोत वापरून विविध प्रयोग केले जात आहेत. पेट्रोल,
डीझेल सारख्या इंधनावर चालणाऱ्या गाड्या न राहता इलेक्ट्रिक कार जगभर वापरल्या
जाव्यात यासाठी प्रयत्न केले जाताहेत. कमीत कमी वीजेवर चालणारी उपकरणे शोधली जात
आहेत. वीज वितरणातील गळती कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
डोंगररांगांवर उभ्या
असणाऱ्या पवनचक्क्या वापरून निर्माण केलेली पवन उर्जा कितीक गावांना विजेचा पुरवठा
करीत आहेत. शेतावरील उपकरणे त्यावर चालविली जाताहेत. कित्येक संस्था त्यांच्या सामाजिक
सेवेचा भाग म्हणून किंवा कार्बन क्रेडीटच्या उद्देशाने मुद्दाम काही जमिनींची
खरेदी करून त्यावर हे पवनउर्जा निर्मितीचे प्रकल्प स्थापन करीत आहे. लाटांच्या कमीअधिक होत जाणऱ्या उंचीचा वापर करीत स्थितीज
उर्जा तर पाण्याच्या प्रवाहापासून गतिज उर्जा निर्माण करीत लाटांपासून उर्जानिर्मिती
केली जात आहे. सोलारसिटी सारखी एखादी कंपनी अशी आहे जी सौरउर्जेवर संपूर्ण शहराचा वीजेचा
कार्यभार सांभाळला जाईल असे स्वप्न बघत आहे. घरांच्या भिंती, छप्पर यावर सौर उर्जा
निर्मिती करणारी वीजवाहक तारांची जाळी वापरून वीज निर्माण करणे व ती विविध घरे,
सोसायट्याच नाही तर संपूर्ण शहरामध्ये वाटून देणे हा या संस्थेचा उद्देश आहे.
आपण प्रत्येकजण उर्जेच्या
निर्मिती प्रक्रियेत सहभाग घेऊ शकत नाही मग आपल्या परीनं काय करू शकतो? तर ती
उर्जा वाचवू शकतो. आपण वापरत आहोत ती उपकरणे कितीही कार्यक्षम असली तरी त्यांची संख्या
वाढतच आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेचा विजेच्या बचतीसाठी उपयोग होऊ शकत
नाही. प्रत्येक माणसामुळे वापरली जाणारी उर्जा तेवढीच राहते. अशा वेळी आपण विजेचा
वापर काळजीपूर्वक करून ती वाचवू शकतो जसं टीव्ही, संगणक वापरत नसताना बंद ठेवणे,
मोबाईल चार्ज झाल्यावर चार्जर काढून ठेवणे, घरातून बाहेर पडताना घरातील सर्व दिवे
बंद करणे ई. पण याबरोबरच आपण आजूबाजूला जरा उघड्या डोळ्यानं बघितलं तर तुमच्या
लक्षात येईल आज उर्जेची निर्मिती आणि तिचा वापर करून किती निरनिराळ्या गोष्टीतून केला
जातोय, सकाळी हातात घेतलेला ब्रश लहानश्या बॅटरीवर चालू आहे, स्कूटरच्या उर्जेवर पीठ
दळलं जात आहे, फुटपाथवर चालताना उर्जा
निर्माण होतेय जिच्यामुळे फुटपाथवर दिवे जळत राहू शकताहेत, इतकच काय तर प्रकाशसंश्लेषण
याच तत्वावर कृत्रिम पानं असणारं एक झाड अस्तित्वात येऊ शकलं आहे
जे तेलाची निर्मिती करू शकत आहे.
हे सगळं वाचताना भन्नाट
वाटतं नं, मग आपणही या प्रकाशमान दीपावलीचं स्मरण ठेवत आपल्यातल्या कल्पनेचा बल्ब उजळूया
किमान तसा संकल्प तरी करूया. चालताना, धावतानाच काय बोलताना सुद्धा किती प्रकारची उर्जेची
रूपं आपल्याला भेटतात मग तिचा योग्य तो उपयोग नको का करायला?
नोव्हेंबर २०१६ शिक्षणविवेक
नोव्हेंबर २०१६ शिक्षणविवेक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा