आजीचा कवितेचा गाव

काही दिवसांपूर्वी संसदेत भाषण करताना आपले पंतप्रधान मोदी यांनी शायर निदा फाजली यांच्या काही ओळी वाचून दाखवल्या,
सफरमे धूप तो होगी, चल सको तो चलो| सभी है भीड मे तुम भी निकल सको तो चलो|
यहाँ कोई किसी को रास्ता नहीं देता, मुझे गिरा कर तुम संभल सको तो चलो|
यही है जिंदगी कुछ ख्वाब चंद उम्मीदे, इन्ही खिलौनोसे तुम भी बेहेल सको तो चलो|
हे ऐकून होतय तोवर गुगल सर्च वर ‘अटलजी कविता’ टाईपही करून झालं, अर्थात त्यांच्याच आवाजात त्यांच्या काही कविता ऐकल्या. असं काही आवडलेलं निश्चितपणे जिच्याशी शेअर केलं असतं अशा आजीची नितांत आठवणही आली. सुंदर कविता, लेख, पुस्तक वाचून त्याबद्दल बोलण्यासाठी आजीचा आलेला फोन आठवला. लहान असताना तिने कवितेच्या ओळी वाचून दाखवल्या, पत्राने लिहून पाठवल्या आणि पुढे तिच्याबरोबर कित्येक कवितांची पुस्तकं बरोबर घेऊन रात्री जागवल्या. कवितेच्या माध्यमातून भाषेचा आस्वाद घ्यायला तिनं शिकवलं. कविता या विषयावरील आजीची एक कविता शेअरकरतेय. सोबत तिच्या या कवितेच्या आवडीची किंवा वेडाची एक आठवण.
रविवार हक्काची सुट्टी म्हणून उशिरापर्यंत झोपलेल्या नाती तिला कधीही आवडल्या नाहीत. मग काय काहीतरी खोड्या काढत उठवायला सुरुवात. तिची एक आवडती म्हण होती, ‘तरण्या झाल्यात बरण्या नि म्हाताऱ्या झाल्यात हरण्या’ असलं काहीतरी ऐकून झोपेतून, आळसातून जाग न येईल तरच नवल. मग काय बरणी विरुध्द हरणी असं एखादं भांडण व्हायचं पण सकाळी लवकर उठवून ठेवणे या तिच्या कार्यात ती यशस्वी. ‘काय गं आजी?’ म्हणत आदळआपट केली तरी परिणाम शून्य; उलट झोपलेला मेंदू जागा करणारा एखादा प्रश्न आ वासून उभा. प्रश्न असा की ‘ज्यात पक्ष्यांची नावं आहेत अशी गाणी सांगा?.’ अरे काय हे.. कबुतर जा जा जा वगैरे फालतू गाणं फेकावं तर ते हिंदी म्हणून बाद केलं जायचं. अर्थात ज्या अर्थी प्रश्न आलाय त्या अर्थी तिच्याकडे दहा-बारा गाणी आठवून तयार असणारच याची खात्री होती. मग हातात एक कागद यायचा, त्या दिवशी सकाळी तिने आठवून लिहून काढलेल्या गाण्यांची यादी. चिऊताई चिऊताई दार उघड, एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख, नाच रे मोरा, पैल तो गे काऊ, घार उडते आकाशी अशी चांगली लांब लचक यादी असायची, आणि गरूड किंवा जटायू यांवर काय गाणी असतील असला विचार चालू आहे असंही दिसायचं. 
हे तिचे उद्योग ७९व्या वर्षी केवळ हाताला व्यायाम म्हणून चालायचे. एवढ्यावरच ती थांबलेली नव्हती तर दुसऱ्या दिवशीचा विषय नव्या पानावर लिहून तयार असायचा..’ शरीरातील अवयवांचा उल्लेख झालेला आहे अशी गाणी.’ म्हणजे एका दिवसाची सुंदर सुरुवात झालेली असतेच शिवाय दुसरा दिवस सहर्ष स्वागत करायला ही सज्ज.
तिच्या वागण्याबोलण्याचा सहवासाचा भास होतोच पण तो प्रतिसमयी काहीतरी वेगळं घेऊन येतो. या तिच्या आठवणीने तिच्यासारखी ही सुंदर अभिरुची जपता यावी असं नक्की वाटतंय. तिच्याबरोबर प्रत्येक वेळी वाचलेली ही एक कविता आठवतेय, बा. भ. बोरकर यांची, ‘येई न मरणा इतुक्या लवकर’
रात्री समईशी वाचावी, ज्ञानेशाची अमृतओवी|
कविता स्नेहे वात जळावी, उजळीत मनाचा द्वैतपणा|

टिप्पण्या