कवितेच्या नादात....

कवितेचा जन्म व्हायला हातात पेन असावंच लागतं
टेबलवर डायरी आणि कॉफीच्या मगाला स्थान लागतं

ऋतूनीही बदलायचं असतं, कधी ऊन कधी पाउस
हवा-पाणी बदलावं लागतं नुसती पुरत नाही हौस

खूप काहीतरी घडावं लागतं अपघातानं वा आग्रहानं
किंवा भांडणही पुरतं सुचतं बरंच मानापमानानं

स्मृतींच्या आडवळणी रस्त्यात मग मनाला सोडायचं
मार्ग दिसावा म्हणून नाही थोडं मुद्दाम चुकवायचं

भिरभिरलेलं कासाविस कोकरू ते, नाती शोधू लागतं
पानगळ झाली म्हणूनही धायमोखलून रडू लागतं

प्रतिभेचा होतो खेळ मन मात्र पुरतं विस्कटून जातं
कवितेच्या नादात कोरडं पान ओलसर होऊन जातं 

खुषीत सुरु झाली म्हणून कविता हसत संपत नाही
ओरखाडे काढल्याशिवाय ना तिची तहान भागत नाही  

कागद-पेन लागतं, ऋतू बदलतात असलं काही नसतं
कविता सुचायला कारण नाही फक्त ओलं मन लागतं   

टिप्पण्या