वीकेंड fantastic असतोच पण त्यातही तेव्हा जर खूप वर्षानी मित्र मैत्रिणी भेटायला आले,
त्यांच्याशी गप्पा मारल्या, उकरून उकरून जुनी
भांडणं केली की मग एकदम दिवस जिवंत वाटतात. दिवसाच्या शेवटी त्यांनी आपल्या आवडीचं
एखादं पुस्तक हातात द्यावं आणि सोबत मुलालाही आवडेल असं गिफ्ट, मग तर काही विचारायलाच नको. नवऱ्याला सुट्टी, मुलगा
खुशीत त्याच्या खेळात रमलेला असला रविवार असेल तर आनंदाची कडी. हा असा रविवार परवा
माझ्या आयुष्यात आला तो J.K. Rowling चं ‘Fantastic Beasts and Where to
Find them’ हे पुस्तक घेऊन.
पहिलं पान
उलगडलं आणि मोन्टाज असा शब्द वाचला; हे नुसतंच पुस्तक नाहीये तर हा आहे स्क्रीनप्ले याची
जाणीव तेव्हाच झाली. मग Ext अर्थात बाहेरील जागा,
O.S, ऑफस्क्रीन या सारख्या सूचना पूर्ण पुस्तकात येत गेल्या आणि
चक्क तो चित्रपट जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला. पात्र नसताना कोणता आवाज ऐकू
येईल, कॅमेराची जागा कोणती असेल असे बरेच बारीक सारीक तपशील
यात येत गेले. चित्रपट तयार होण्यापूर्वी या प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो,
त्यानुसार पटकथा लिहिली जाते. हे ऐकून होते; ते
प्रत्यक्षात वाचायला मिळालं. तो स्क्रीनप्लेही अशा लेखिकेचा जिच्या कल्पनेतून हॅरी
पॉटर वर्ल्ड तयार झालं.
ही गोष्ट
आहे न्यूट नावाच्या जादुगाराची जो अशा जादुई प्राण्यांचा अभ्यासक आहे. त्यांच्या
शोधात तो युरोपमधून अमेरिकेत आलेला आहे. तेव्हा अमेरिकेत आल्यावर येथील इमिग्रेशन
ऑफिसर पासून बँकेतील कर्मचाऱ्यापर्यंत तो सगळ्यांना कसं समोरा जातो त्याचं वर्णन
करीत कथेला सुरुवात होते. अमेरिकेतील मेरी लो नावाची परोपकारी महिला आपल्या जगात
काही जादुगार आहेत हे पटवून द्यायचा प्रयत्न करीत असते ती त्याला भेटते. ती सांभाळ
करीत असलेला अनाथ मुलगा क्रीडेन्स ज्याला स्वत:च्या जादुई शक्तींची अजून जाणीव
झालेली नाही. त्याच्या या परिस्थितीचा फायदा उठवत ग्रेव्ह हा जादुगार त्याची मदत
घेत जगावर जादूचं साम्राज्य पसरविणाऱ्या एका अदृश्य प्राण्याचा शोध लावायचा
प्रयत्न करतो. सामान्य माणसांपेक्षा जादूचं जग वेगळं आणि सामर्थ्यवान असल्याचा
त्याला अभिमान आहे व ते दाखवून देण्याचीही इच्छा आहे. या सगळ्या पात्रांचा
एकमेकांशी संबंध येतो तो टीना या पात्रामुळे जी पूर्वी अमेरिकेतील जादूच्या
मंत्रालयात काम करणारी ऑरर आहे. जॅॅकोब हा जादूशी काहीही संबंध नसलेला सरळ साधा
माणूसही या कथेत आहे. तो या जादूच्या जगात कसा गोवला जातो, त्याची
न्यूटकडे असलेल्या चित्रविचित्र प्राण्यांशी कशी ओळख होते, या
प्राण्यांमुळे शहरात काय धुमाकूळ होतो यातच ग्रीन्डेलवाल्ड
या शक्तीशाली जादुगाराचा प्रवेश कसा होतो हे सगळं या कथेत आहे.
जादूच्या
जगात वावरायला ज्यांना आवडतं त्यांना हे पुस्तक आवडू शकेल. अर्थात पूर्वीच्या
पुस्तकांच्या इतकं हे तुम्हाला भारावून टाकू शकत नाही. जुन्या पुस्तकांशी तुलना
केली जाते, जुनी पात्र पुन्हा एकदा यात भेटायला हवी असंही वाटून
जातं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा