out of the box अर्थात चाकोरीबाहेरचा
वेगळा विचार, वेगळी कृती, वेगळ्या वस्तूंची निर्मिती, नवीन काहीतरी देण्याचा व्यापारी
कंपन्यांचा प्रपंच चालू असतो. Drew Boyd व Jacob
Goldenberg यांच्या ‘inside the box’ या पुस्तकातून मात्र ते उलट्या
दिशेची ओळख करून देतात. या लेखकद्वयीचा असा विश्वास आहे की जगभरात ज्या नाविन्यपूर्ण
वस्तू, कृती किंवा पद्धती अस्तित्वात आल्या आहेत त्यांचा शोध हा एक प्रकारच्या
साचेबद्ध पद्धतीने लागलेला आहे. त्यांच्यातील हा साचा अभ्यासपूर्वक तपासले असता ओळखता
येऊ शकतो. केवळ उत्पादन व्यवसायातच नाही तर कलाक्षेत्रातही कित्येक दिग्गजांच्या लेखन
किंवा संगीत रचनांमधून हा साचा ओळखता येऊ शकतो.
Creativity (सर्जनशीलता) ही
पद्धतशीरपणे विकसित करता येऊ शकते असेही त्यांना वाटते. ‘बंदिस्त जगाचा विचार करत अस्तित्वात
नसलेल्या/ डोळ्यासमोर नसलेल्या गोष्टींचा विचार करण्याऐवजी जे हातात आहे , समोर
आहे त्याचा नाविन्यपूर्ण उपयोग करता येतो.’ याच तत्वावर माणूस अधिकाधिक सर्जनशील
होऊ शकतो असं त्यांचे मत आहे. याचं उदाहरण देताना त्यांनी अपोलो १३ या चित्रपटातील
एका घटनेचा उल्लेख केला आहे. ‘यानाचा एक भाग स्फोट झाल्यामुळे नाहीसा झालेला असतो,
ऑक्सिजनचा साठा पुढील काही तास पुरवठा होईल इतकाच शिल्लक असतो. ह्यूस्टनमध्ये मदत
मागितली जाते.’ परिस्थितीचा अभ्यास करून आता काहीतरी विलक्षण उत्तर त्यांना पाठवलं
जाणार या अपेक्षेने आपण पुढचा चित्रपट बघू लागतो. अगदी त्याच वेळी हे शास्त्रज्ञ अंतराळवीरांकडे
आता कोणत्या गोष्टी असू शकतील, त्या वापरून ते यातून कसं मार्ग काढू शकतील असा
कथाभाग समोर येतो. त्यांना जे यातून वाचण्यासाठी उत्तर मिळवावे लागते ते
नाविन्यपूर्णच असतं पण त्यासाठी ते जो विचार करतात तो मात्र जगावेगळा नसतो तर त्यांच्या
अगदी जवळचा समोरचा असतो.
अशा प्रकारे विचार करून अस्तित्वात
आलेल्या किंवा साचेबद्ध प्रकारात मोडणाऱ्या अनेक कंपन्यांची त्यांच्या उत्पादनांची
माहिती व निर्मितीप्रक्रियेचे वर्णन या पुस्तकात दिले आहे. एखाद्या वस्तूच्या
निर्मित्तीप्रक्रियेतील घटकांची वजाबाकी, विभाजन करून त्यांना काही पटीत वाढवून (गुणाकार
करून), कामाचे एकत्रीकरण करून किंवा दोन घटकांना एकमेकांवर अवलंबित करून पद्धतशीरपणे
नाविन्यपूर्ण विचार केला जाऊ शकतो असे या पुस्तकात म्हटले आहे. आपण पूर्वीचे कान
झाकून टाकणारे हेडफोन व आताचे ‘इयर बड्स’ डोळ्यासमोर आणले तर ही निर्मित्तीप्रक्रियेतील
घटकांची वजाबाकी दिसून येईल. पूर्वी शॅम्पू या सदरात मोडणारे शॅम्पू आज मात्र शॅम्पू
आणि कंडीशनर म्हणून विभाजित होऊन बाजारात उपलब्ध आहेत. कॅमेराचं ड्युअल फ्लॅश गुणाकार
करताना दिसतोय, एकाच वस्तूचा दोन वेगळ्या प्रकारे उपयोग होताना दिसतोय. मोबाईल हा
केवळ फोन न राहता तो खेळाचं साधन, करमणूकीचं साधनकरमणूकी, वर्तमानपत्र सगळं काही
बनलाय. कपड्यांची किंमत आणि ठराविक वेळेचं तापमान याचं संबंध साधत विक्री होताना
दिसते आहे.
विविध उदाहरणे देत मांडलेला विरोधी
विचार गळी उतरवताना लेखक पुष्कळच यशस्वी होतात. या लेखकांचा ही विचारसरणी विविध संस्थांमध्ये
उपयोगात आणली जाताना त्यांना जे अनुभव आले आहेत ते वाचण्यासारखे आहेत, कुठल्याही
नव्या गोष्टीला असलेला विरोध व अवहेलना त्यांच्याही वाट्याला आलेली आहे.
व्यवस्थापन किंवा अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावे असे हे
पुस्तक आहे.
मागणी
ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात सर्जनशील राहता येऊ शकतं का; आणि असलं तरी ते
कितपत दर्जेदार असू शकतं हे आणि असे प्रश्न स्पर्धेच्या युगात सतत पडत राहणार. या
पुस्तकात जे मार्ग दाखवले आहेत, ज्या पद्धती किंवा विचारसरणी सुचवली आहे; त्या
पद्धतशीर प्रकारे कदाचित ‘सतत काहीतरी नवीन हवं असणं आणि उपलब्ध होऊ शकणं’ या
दोन्ही माणसाच्या उर्मी जिवंत राहू शकतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा