पॉटर वेड ... to be continued.


Deathly hallows या पुस्तकाचा शेवट वाचून होताना ‘हॅरी पॉटर संपलं वाचून!’ असं तर वाटतंच होतं; पण तितकेच प्रश्न पडत होते, पुढे हॅरी काय करेल? त्यानी त्याच्या आयुष्यात कुठल्या क्षेत्रात काम करायचं ठरवलं असेल? हर्मायनी काय करत असेल? रॉन इंटरनॅशनल क्विडीच खेळला असेल का? त्यांची मुलं जेव्हा परत हॉगवर्ड मध्ये येतील तेव्हा काय होईल? त्यांच्या या तिघांच्या गोष्टी त्यांना वाचायला मिळतील का? ते कुठल्या house मध्ये select होतील? त्यांचे शिक्षक कोण असतील? मॅगोनिगल असेल का? ती काय शिकवेल? हॅरी मुलगाही तिच्या क्लास मध्ये उशिराच पोहोचेल का आणि पहिल्याच तासात तिची बोलणी खाईल का?
अर्थात हे सगळे प्रश्न डोक्यात आले खरे! पण एकदाही अशा जादुई दुनियेला वाचवणाऱ्या त्यांचा देवच बनून गेलेल्या या हॅरी पॉटरच्या मुलावर त्या मसीहा पणाचं दडपण असू शकेल आणि त्या दडपणाखाली तो त्याचा आदर करेल की त्याच्यापासून लांब पळायचा प्रयत्न करेल हा मात्र विचार केला नव्हता. अगदी याच मर्मावर जे. के. रोलिंग हिने या (पुस्तकात) नाटकात हॅरी, हर्मायनी आणि रॉन यांच्या पुढच्या पिढीची गोष्ट रंगवली आहे. धीट, हुशार आणि प्रसंगावधानी त्रिकुट आपल्याला या नाटकातही पुन्हा भेटतं. जे. के. रोलिंग चे हे हिरो जसे भेटतात तसाच तिचा ही व्हिलन वॉल्डेमॉट पण भेटतो. ह्या वॉल्डेमॉटचा अतिमहत्त्वाकांक्षी वंशज यात आहे. हॅरीसारखाच त्याचा धीट काहीसा एकाकी मुलगा अल्बस, ड्रेको मॅल्फॉयचा त्याच्या अगदी विरुद्ध गुणी शांत मुलगा स्कॉर्पियस हाही या कथेत आहे. कथाभाग time turner या संकल्पनेच्या आधारे पुढे सरकतो. नाटकातील प्रवेश पुस्तकासारखेच हळूहळू उलगडत जाणारे आणि उत्कंठा वाढवत नेणारे आहेत. लेखक म्हणून पूर्वीच्या पुस्तकातून जे. के. रोलिंगने जे जादुई विश्व आपल्या समोर मांडलय ते नाटक वाचताना आपल्याला सहजी कल्पनेत येतं आणि त्या नाटकातूनही आपला त्या विश्वाचा प्रवास होतो.
अल्बस या नावामुळे एक आठवण झाली. पूर्वीची हॅरी पॉटर सेरीझ वाचतानाही मला वाटायचं, ही सगळी नावं, बारीक सारीक गोष्टी कशी काय सुचत असतील; हो! कारण यातलं सगळं जरी काल्पनिक असलं तरी त्याला अर्थ आहे, उत्सुकतेपोटी मी पूर्वी या कथेतलं माझं सगळ्यात आवडतं पात्र अल्बस डंबलडोर याविषयी वाचलं होतं; हे नावं का द्यावसं वाटलं तर अल्बस हे लॅटीन नाव आहे ज्याचा अर्थ जे पांढरा दगड किंवा पांढरे कपडे आणि dumbledore म्हणजे bumblebee म्हणजे गांधीलमाशी, ती म्हणते ते पात्र त्या शाळेत गुणगुणत फिरत असेल असं कल्पनेत होतं. हा चित्रांचा नुसता देखावा नाही यामागे विविध भाषांचा, संस्कृतीचा, खेळाचा, गणित-शास्त्राचा अभ्यास आहे आणि तरीही हे सगळं किती विलक्षण कल्पनारम्य आहे; अगम्य, काही प्रमाणात अतार्किकसुद्धा आहे पण तरीही किती आकर्षून घेणारं, वेड लावणारं आहे.  
जितके वेळा मी पुस्तकातून, चित्रपटातून आणि आता या नाटकातून या जादुई विश्वाच्या जवळ गेलेय, प्रत्येक वेळी मला त्या जगाचा भाग व्हावं असं वाटत आलेले आहे. ती सॉर्टिंग हॅट माझ्या  डोक्यावर ठेवली तर ती मला कुठल्या house मध्ये टाकेल? माझ्यासाठी ऑलिव्हरकडे कुठली वाँड असेल? त्यातला पोशन टीचर स्नेप वर्गात येईल तेव्हा पूर्ण वर्ग चिडीचूप होईल की त्याला त्यासाठीही एखादी स्पेल वापरावी लागेल? असली स्वप्न तर मी मुद्दाम पाडून घेते. पुन्हा जर शाळेत जायला मिळालं नं तर ही शाळा पाहिजे यार....बास!!! 

टिप्पण्या