Tom Sawyer आणि Huckleberry finn च्या जगात


The adventures of Tom Sawyer हे एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे. अगदी लहान मुलांची पुस्तक हातातून बाजूला जातात तेव्हा इंग्लिश पुस्तकाचं वाचन करणाऱ्या प्रत्येकाने सहावी सातवीत हे पुस्तक नक्की वाचलेलं असणार. मराठी वाचकांचा जसा फास्टर फेणे आवडीचा असतो तसा अमेरिकन कुमार वयोगटातली मुलं भेटतात ती Tom Sawyerला. मार्क ट्वेन या लेखकाचं हे पुस्तक आहे अठराशे च्या शतकात लिहिलेलं.
ही गोष्ट आहे एका बारा वर्षाच्या मुलाची जो त्याच्या काकूबरोबर अमेरिकेत मिसुरी येथे राहत असतो. हा मुलगा अतिशय खोडकर, खट्याळ, घरात किंवा शाळेत साधरणत: सगळ्यांची बोलणी खाणारा, उनाड खरं तर उडाणटप्पू म्हणावा असा आहे. अगदी चित्रात दिसतंय तसा मित्रांकडून स्वत:ची कामं सहजपणे करून घेत तो त्यांची गंमत बघू शके असा आहे. त्याचे दोन मित्र आहेत जोई हार्पर आणि हकलबेरी फिन्स. हा tom उनाडक्या करीत असला तरी संवेदनशील सुद्धा आहे. त्याच्या या मित्रांबरोबर त्याने चक्क एक खून होत असताना बघितला आहे. या प्रसंगामुळे त्याच्या आयुष्यात काय घटना घडत जातात आणि तो त्यांना कसा सामोरा जातो याचं  लेखकाने केलेलं वर्णन उत्कंठा वाढवत राहतं. त्यातून मार्ग काढताना तो एखाद्या गुप्तहेरासारखा कसा विचार करतो आणि न घाबरता खरं बोलून प्रसंगी मोठ्या माणसांनाही त्यांच्या चुका दाखवतो. तेव्हा मात्र हा tom कुठेतरी आदर्श tomही बनून जातो. त्याच्या मित्रांना आवडता होतो आणि श्रीमंती, गरीबी या सगळ्यापेक्षा मोठ्या जातीची माणुसकीची शिकवण देऊन जातो.
The adventures of Huckleberry Finn हे पुस्तक आहे Tom चा मित्र Huckleberryचं. हा मुलगा आहे अतिशय गरीब,  घराबाहेरच वाढलेला, कधीही शाळेत न गेलेला, स्वतः काहीबाही काम करून पैसे मिळवणारा. पण त्याच्या नि tom च्या आयुष्यात एका खुनाचा साक्षीदार बनल्यानंतर काही अनपेक्षित बदल घडलेत. त्याला घर मिळालंय, शाळा अभ्यास सुरु होऊ लागलाय, पण त्याबरोबर त्याला शिस्तबद्ध जगावं लागतंय, चांगल्या सवयी लावल्या जाऊ लागताहेत. त्याचं हे बदललेलं आयुष्य त्याच्यासाठी काही पैसाही घेऊन आलंय ज्यावर त्याच्या व्यसनाधीन वडलांचा  डोळा आहे.
हे सगळं कितीही चांगलं असलं तरी त्याला याची सवयही नाही आणि कुठेतरी बंधन आल्याची जाणीवच अधिक आहे. त्यामुळे या सगळ्यातून सुटण्यासाठी त्यानी ते गाव सोडायचं ठरवलंय आणि त्यात महत्प्रयासाने तो य्शस्वीसुद्धा झालाय. नंतर तो एका बेटावर जाऊन पोहोचलाय तर तिथे नेमकी त्याची भेट त्याच्याच घरातून पळून गेलेल्या एका जुन्या नोकराशी jimशी झालेली आहे. त्यानंतर आपण कोणाच्याही हाती लागू नये म्हणून त्या दोघांनी  एका ठिकाणाहून दुसरीकडे जो प्रवास केलाय त्याचं रोमांचक वर्णन या कथेत आहे. त्या प्रवासात त्यांना कसे लोक भेटतात व ते त्यांना कसे फसवतात याची ही गोष्ट आहे.
अमेरिकेत असणारी एकोणिसाव्या शतकातील परिस्थिती यात दर्शवलेली आहे. त्या काळातील वर्णद्वेष, त्यानुसार वागणारी समाजयंत्रणा याचं स्पष्ट चित्रण दिसून येतं. त्याबद्दल या कथेचा नायक huckleberry सुद्धा विचारच नाही तर पर्यायही काढण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या नोकराला मित्रासारखा वागवतो. कथेच्या शेवटी huckleberry ची भेट पुन्हा एकदा tom शी होते आणि ते दोघे पुन्हा एकदा प्रचंड कष्ट करून या jim ला न्याय मिळवून देण्यासाठी, त्याला त्याच्या कुटुंबाकडे पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. tom च्या काहीश्या पुस्तकी किंवा काल्पनिक नियोजन व त्याप्रमाणे त्याला सहाय्य करणारा huckleberry; jim ची सुटका करता करता कसे स्वतःच वेगळ्या एका संकटात अडकतात आणि त्यातून सहीसलामत कसे बाहेर पडतात याची ही एक रंजक कथा आहे.
प्रत्येकाला लहान असताना गुप्तहेर व्हावं, काहीतरी गुन्हा पकडून द्यावा आणि त्यातून हिरो बनावं असं वाटत असतं तशा प्रत्येकातल्या दुसऱ्या मी च्या या गोष्टी आहेत नक्की वाचाव्या अशा. 
  
                                                                                 

टिप्पण्या