क्रीडाक्षेत्रातील नाविन्य
![]() |
Image credits - Daily Star |
तंत्रज्ञानाचा क्रीडाक्षेत्रात शिरकाव झाला आणि खेळाडूच नव्हे तर प्रेक्षकाचंही
जग बदलून गेलं. क्रिकेट या खेळाशी संबंधित अशीच एक गमतीशीर गोष्ट; १९९२मध्ये भारत
विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात
सर्वात प्रथम ‘थर्ड अम्पायर’ नियोजित केला गेला आणि त्याच्या पहिल्यावहिल्या
निर्णयामुळे सचिन तेंडूलकर या भारतीय खेळाडूला धावबाद व्हावं लागलं. पुढच्या काळात
रिप्ले तंत्रज्ञानामुळे कित्येक मित्रांमधली “अर्रर...नाही यार नव्हता आउट” असली
भांडणं सोडवली असतील. कोनमापक वापरून कितीक जण कोणता खेळाडू अधिक अंशाने बॉल वळवतो यावर चर्चा करीत असतील किंवा
त्यातून शिकत असतील. येत्या काही वर्षात स्नीकोमीटर हे पीचमध्ये बसवले गेलेले
सेन्सर निर्णय देण्यासाठी वापरले जातील ज्यात आजूबाजूचे आवाज वगळले जाऊन केवळ बॅट
आणि बॉल मुळे निर्माण होणाऱ्या आवाजाचे तरंग पकडले जातील. फुटबॉलच्या सामन्यात जी गोल लाईन टेक्नोलॉजी
वापरली गेली त्यामुळेही गोल पोस्टजवळची रेषा जी पूर्वी दिसत नसे ती टेलीव्हिजनच्या
सहाय्याने दिसू लागली व त्यामुळे खेळाचा निर्णय बिनचूक सांगता येऊ लागला.
प्रेक्षकांना देखील त्याचा आस्वाद घ्यायला मदत होऊ लागली.

या इनोव्हेटीव जगात आपण आपलं तांत्रिक ज्ञान वाढवत चाललो आहोत हे खरं पण आपलं
पटांगण आपण विसरत चाललो नाहीयोत नं, हेही थोडं विचार करण्यासारखं आहे बरं का!
पूर्वी आई खाली खेळायला गेलेल्या मुलांना संध्याकाळी हाक मारून दमत होती, आता मात्र
“अरे, किती वेळ त्या मोबाईलवर खेळशील? खाली खेळून ये जरा!” असं सांगू लागली आहे.
या लहान स्क्रीनवरचे खेळ आपला तात्पुरता आत्मविश्वास वाढवू शकतील पण खऱ्याखुऱ्या
पटांगणात multiplayer खेळ खेळलो तर hint वगैरे उपलब्ध नसतानाही खेळता येऊ शकतं हे आपल्याला कळेल. असं आपण केलं तर
काय माहित; कदाचित लगोरी किंवा डबडा ऐसपैस सारख्या खेळांची नवी नवी versions बघायला
मिळतील आणि शारीरिक क्षमता जोपासण्याचा खेळ तर आपण जिंकलेलोच असू.
जानेवारी २०१७ शिक्षणविवेक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा