सुभाषितमाला:१

संस्कृत ही आपणा भारतीयांची प्राचीन भाषा. आपली संस्कृती संस्कृताश्रित आहे असं आपण म्हणतो. प्राचीन वेद वाड़मयाचा पाया रचला गेला तो संस्कृत भाषेतून. संस्कृतभाषेतील व्याकरणाचे नियम संगणकासाठीही योग्य ठरतील इतके काटेकोर आहेत. संस्कृत भाषेत दंडी, भारवी, कालीदास यासारख्या साहित्यिकांनी रचलेली काव्ये म्हणजे तर या भाषेचा अभिमान.
संस्कृत भाषा आवडू लागली आणि ती लक्षात राहू लागली याचं कारण मला कायम वाटतं ते म्हणजे सुभाषित. शाळेच्या पाठ्यपुस्तकात असलेली सुभाषितमाला पूर्ण वर्ग म्हणू लागला की सगळ्यामध्ये असणारी एक लय एक ताल मंत्रमुग्ध करून टाकायचा. या पाठांतराचे कधी कष्ट पडले नाहीत उलट संधी समास आणि व्याकरणातून उलगडत जाणारं संस्कृत दिवसेंदिवस आवडत गेलं आणि त्याबद्दल उत्सुकताही वाटत राहिली.
या ब्लॉगच्या निमित्तानं त्या पाठ्यपुस्तकातील संस्कृतला पाठ्येतर भेटण्याचा हा एक प्रयत्न. नवनवीन सुभाषित संचय करणे त्याचा यथाशक्ती अर्थ लावणे व तो शेअर करणे.
आजचं सुभाषित अर्थातच सुभाषितांचा आणि संस्कृत भाषेचा गौरव करणारं.

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती|
तस्याहि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्| 

अनेक भाषांतील सर्वात महत्त्वाची आणि अतिशय गोड भाषा म्हणजे दिव्य भव्य देववाणी अशी संस्कृत भाषा होय. त्यातही संस्कृतभाषेतील काव्य हे अधिक रसाळ असते आणि त्या काव्यांतील सुभाषित हे आणखी मधुर.

टिप्पण्या