जी जात नाही ती ....


बरं असतं लहानपणी विशेष काssही कळत नाही
जात धर्म पंथ यातला फरक बिरक वळत नाही
सगळेच असतात मित्र मित्र, सगळेच असतात आपले आपले
खराss तो एकची धर्म म्हणत, घालत असतात साकडे-बिकडे

हळूहळू मग मनावर संस्काssर वगैरे होऊ लागतात
कळत नकळत;
“त्यांच्या बाप्पाला नसतात तीन डोकी”
“त्यांच्या बाप्पाचा रंग निळा नसतो”
“त्यांच्यात चालतं असलं खाल्लेलं”
हे आणि असं काय काय आपण पाठ करू लागतो.
‘पानी’ नाही रे ‘पाणी’ म्हण म्हणत हमखास जात काढतो.
जेवताना पाणी घेतलं नाही की तिचा उद्धार करतो.

आता आपण लहान बिहान नसतो, आपल्याला कळायला वगैरे लागलेलं असतं
आपण शाळेच्या चौकटीतून कॉलेजच्या चौकटीत घुसणार असतो.
एव्हाना टक्क्यांची भाषा करता करता , जात आडवी यायला लागलेली असते.
आडवी जाणारी मांजर निघून तरी जाते,
जात काही जाssता जात नाही.
मोर्चे, बंद, दंगल-बिंगल केली म्हणून काही कॉलेजात प्रवेश मिळत नाही.
आरक्षण नावाच्या राक्षसाची भीती बसायला तसा वेळ लागत नाही.

रडतखडत मिळेत त्या कॉलेजातून शिकून बिकून आपण रियालिटीमध्ये पाउल टाकतो.
तिथे तर आपल्याला कधीच दुरुस्त करता न येणारी चूक कळून येते.
कारण आख्खे शिक्षणच आपण इंग्लिश मिडीयममधून घेतलेले नसते.
अनवधानानं आपण ग्रॅमॅटिकली करेक्ट बिरेक्ट बोलून जातो.
पुन्हा नव्याने तीच चूक परत परत करून जातो.

रियालिटीला असलं काही चालत नाही.
तिथे आपण फार परफेक्ट असून चालत नाही.
कंपनीमध्ये काम बीम केलंत तर आपली गत नाही.
सोडून कुठे जाणार? कुपमंडूक आपण; मग तिथेच चिखल चिखल खेळू लागतो.
लंगडी पेटंट, डेझीग्नेशनचा चेकमेट आणि क्वालिटीचा खोखो
असं सगळं खेळत खेळत हळूहळू रुळायला लागतो.
या सगळ्या खेळानंतर आपण खरे मोठंबिठं होत असतो.
ग्लोबलाईझ की काय तेही व्हायला शिकत असतो.
व्हिसा नावाच्या जातीत मग अलगद पदार्पण करतो.
नाव गाव व्हिसा बिसा यातच जगायला शिकतो.
असलं सगळं होत राहतं रंग लपता लपत नाही.
जातीचा नाग रंगाचा फणा काढून डसल्याशिवाय राहात नाही.
ग्लोबल बिबल पटलावरही विशेष काssही बदलत नाही.
जगात कुठेही काहीही वेगळं चाललेलं नाही
असलं काही कळायला फारसा वेळ लागत नाही.   




टिप्पण्या