मला ना, बाबांच्या ऑफिसचा खूप म्हणजे
खूप राग येतो. काही वेळा तर वाटतं, ऑफिस बंदच पडलं तर किती छान होईल. बरोबर
खेळायला, फिरायला, गप्पा मारायला मारामारी करायला बाबा घरी. सारखं आपलं अरे बंडू,
त्यांना त्रास देऊ नकोस, ऑफिसला निघालेत, त्याला कशाला हात लावलायस अरे, ते ऑफिसचे
कागद आहेत. छे:! काही म्हणजे काही झालं हे ऑफिस, अरे, मोठ्यांना बोलू नको,
बाबांच्या सरांचा फोन आलाय. एक तर मला हवे
तेव्हा बाबा असतातच असं नाही, त्यांच्या वेळा ठरलेल्या आणि असतात तेव्हा हे सगळं. पण
तरी सगळ्यात जास्त कशाचा राग येतो ना मला तर ती म्हणजे बाबांची बदली. मला मात्र
सांगतात, एका जागी बसून खेळ, एका जागी बसून खा. पण एवढे मोठे ते, त्याहून मोठ्ठं
त्याचं ऑफिस. तरी एका जागी बसून काम कसं करता येत नाही? -एक
पेड
छोटा असलो म्हणून काय झालं? रोज जायचो
की मी शाळेत. गाणी, गोष्टी, खाऊचा डबा आणि जरासं रडू आलं की कडेवर घेणाऱ्या मावशी.
मस्तच होती माझी शाळा. माझा डबा सुद्धा एकदम मस्त होता. त्याच्यावर चित्र सुद्धा
काढलं होतं मी. पाणी लागून खराब झालं होतं तरीसुद्धा म्हणायचो, चालतं. असंच होतं
कायम. छोटा आहे ना मी. मला कळत नाही सगळं, कारण एक दिवस अशीच आमची शाळा चालू
असताना आई बोलायला लागली बाईंशी. त्यांचे मोठ्ठे झालेले डोळे आणि तोंडाचा ओ तेवढा
आठवतो. आईनी तिकीट बुक केलेली मग गडबडीने जाऊन शाळेकडून कागदपत्रं परत आणलेली
आठवतात. बाबांची बदली झाली ना तेव्हा. निघताना बाई म्हणाल्या, बंडूची मजा आहे. आता
बंडू मोठ्ठ्या शहरात जाणार विमानात बसून. मग काय काय नवीनवीन गोष्टी बघणार, काय
काय शिकणार? मी म्हटलं त्यांना. आई तुमचं पण तिकीट काढणार आहे. नेणारे मी तुम्हाला
सुद्धा. क्षणभर नुसतंच बघितलं त्यांनी आईकडे. ती पण एकदा माझ्याकडे न एकदा बाईंकडे
बघतच बसली नुसती. तिचा ना असा राग येतो एकेकदा, एरवी माझं जरासं काही चुकलं की, हे
एवढं बोलते आणि आता मात्र हो नाही काहीच नाही. की दोघी गप्प राहूनच बोलत होत्या
कुणास ठाऊक? -दुसरा
पेड
कुठे कुठेही गेलो ना तरी शाळेत जावं
लागतं म्हणजे लागतंच असं आई म्हणते. म्हणजे म्हणे मोठं होता येतं. पण त्यानंतर
ऑफिसात जावं लागतं ना, मग कशाला व्हायचं मोठंबिठ. मी बरा आहे की घरी. खेळ, खाऊ आणि
गोष्टीची पुस्तकं, धमालच की. पण माझं कोण ऐकतो, बाहेर दिसलो की लगेच लोक विचारतात,
काय याला शाळा वगैरे नाही का? आता त्यांना काय करायचं असतं. पण ते म्हणत असतात सतत
काही ना काही. बदली तरी अशा ठिकाणी व्हावी की नाही जिथे शाळाच नसते, पण असं नसतं,
शाळा असतेच. मग मलाही मिळाली पुन्हा नवी एक. एटूझी नावाची. गंमतशीर शाळा नंबर एक.
नुसता दंग, धुडगूस होता तिथे. खेळ, खाऊ तर भरपूर, गोड गोड. पण तिथे ना, दुपारी
झोपायचं असतं रोज म्हणजे रोज. सगळी मुलं झोपायची सुद्धा. मला काही झोप यायची नाही,
पण मग एक आयडीया केली आणि माझा आवडता खेळ घेऊन पांघरुणात शिरलो, खोटा खोटा झोपायला
लागलो. एकदम सकाळी जायचो शाळेत आणि यायला संध्याकाळ व्हायची. बापरे! एकदम मोठ्ठा
झालो होतो की काय मी? -
तिसरा पेड
बाबांची बदली सुद्धा ना एक गंमतशीर
असते की बासच! जरा कुठे एक शाळा आवडली की नवीन भेटायला येते. तशी ही आताची शाळा
आहे ना ती थोडीशी जुन्या शाळेसारखीच आहे. पण इथे मोठ्ठं ग्राउंड आहे खेळायला. सगळ्यात
गंमत अशी की घराच्या जवळ राहणारा एक मित्र पण आहे या शाळेत. आमच्या दोघांची टीम
आहे. बॅटमॅन आणि स्पायडरमॅन किंवा आयर्नमॅन, त्याचं सारखं बदलत असतं. पण माझा
बॅटमॅन आहे. मी तर बाबा आणि आई दोघांना बॅटडॅड आणि बॅटमॉम नाव ठेवलंय. आमची बॅट
फॅमिली झालीये बॅट फॅमिली. पण माहितीये काय झालं, त्या खेळात सारखी मारामारी
व्हायला लागली म्हणून बाईंनी सांगितलंय नो मोअर बॅटमॅन गेम. त्यामुळे खेळ बंद.
नुसतं लपाछपी, पकडापकडी, लिहा, वाचा की संपली शाळा. फक्त कंटाळा. पण कंटाळा आला
म्हणून शाळेला बुट्टी मारायला नॉट अलाउड. हो म्हणजे बाबांनी शनिवार रविवारची वाट
बघितली तर चालतं पण मला शाळा बुडवाविशी वाटली तर चालत नाही. मोठा झालो ना की
नुसत्या सुट्ट्या असणारी एक शाळाच सुरु करणार आहे. हवं तेव्हा या, जा बॅट स्कूल. - चौथा पेड
जिकडे बदली होईल तिकडे कायम आंबे
असतात असं नसतं काही. पण आत्ता परत आलो ना तिथे पुन्हा आंबे आहेत. पुन्हा शाळेची
शोधाशोध. मला कुठे जायचंय शाळेत. पण आई बाबा धावतायत. हे आपले सकाळी उठल्यापासून
शाळा शाळा खेळतायत. मग काय मिळाली आता त्यांना. मला म्हणतायत अरे जुनी शाळा तुझी,
जुने मित्र, जुन्या मावशीसुद्धा आहेत. मी जुना फोटो बघितला फोनवर. आहेत की त्यात ते
सगळे. पण मला फक्त मीच ओळखलो. पहिल्या दिवशी शाळेत जायला निघालो. घरी, गाडीवर आणि
शाळेच्या दारात खूप रडू येत होतं. आधीच्या शाळेत तर मी अजिबात रडायचो नाही. उलट
तिकडच्या बाई मला सांगायच्या, बंडू त्याच्याबरोबर खेळ, तो नवीन आहे शाळेत, आणि मी
आपणहून खेळायचो त्या मुलांशी. पण इथे रडूच येतंय. कोणीच माहित नाही मला. मी आईला
घट्ट धरून ठेवलं मग. तेवढ्यात त्या शाळेच्या बाई आल्या, म्हणाल्या, तू नाही ओळखणार
पण मी ओळखते की बंडू तुला. बाईंनी बोट धरून आत नेलं. माझी ओळख पण करून दिली. मी
मागे वळून पाहिलं, तर बाबांचा चेहरा हेल्मेटच्या मागे लपला होता पण आई बघत होती
माझ्याकडे आणि पाणी येत होतं तिच्या डोळ्यातून, गळला एक थेंब आणि चमकला; मी ठरवलं
मग की बाबांना सांगीन तिच्यासाठी एक चमकी करूया, कित्ती छान दिसेल! -
पाचवा पेड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा