कॅलिफोर्निया ... २

कॅलिफोर्नियाला गेला तर सॅनफ्रॅन्सीस्को मधील गोल्डन गेट ब्रिज आणि गोल्डन गेट पार्क आवर्जून बघावी अशी दोन ठिकाणं. आपण जर 'पार्क मध्ये काय बघण्यासारखं असणारे, किंवा असून असून पार्क किती मोठीशी असणारे, अशा संकल्पनेत या पार्कमध्ये गेलो तर आपली निश्चित फजिती होऊ शकते. या पार्कची जागा इतकी प्रचंड आहे की आपण ही पार्क काही तासात वगैरे बघून पूर्ण करू शकत नाही. त्यातच तिथे गुलाबाच्या फुलांची एक बाग आहे, एक जपानी पद्धतीची बाग आहे, एक कॉन्झर्व्हेट्री ऑफ फ्लॉवर म्हणून मुद्दाम तयार केलेले म्युझियम आहे.

तिथे पर्यटक म्हणून तर जावंच पण बॉटनी विषयाचा अभ्यास करीत असाल किंवा माहिती घेण्याची आवड असेल तर जरूर जावं अशी ही जागा आहे. पाण्यात येणारी झाडं, मातीच्या कुंडीत लावलेली, पावसाच्या कमी अधिक प्रमाणानुसार येणारी झाडं तशाप्रकारचे हवामान कृत्रिमरीत्या तयार करून लावलेली आहेत. कुठे अचानक खूप जास्त दमट हवा तर कुठे थंड हवा, कुठे सतत चं वाहत असलेलं पाणी तर कुठे प्रकाशाचा कमी अधिक परिणाम, तर कुठे चक्क संगीत आणि त्याबरोबर निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज या सर्वाचा समावेश केला गेला आहे. त्या दालनात मुद्दाम उल्लेख करावा असे एक दालन होते, ज्यात निरनिराळ्या प्रकारची फुलपाखरे होती. विविध रंगी, विविध आकाराची, निरनिराळ्या वनस्पतींमधून मध घेणारी, शक्यतो बिनविषारी अशी कित्येक. त्यात त्या फुलपाखराच्या जीवनाचे आळीपासून कोष आणि त्यापासून बनणारे फुलपाखरू असे टप्पेसुद्धा बघायला मिळाले. ते फुलपाखरू होते मोनार्क बटरफ्लाय नावाचे. हे गडद  केशरी रंगाचे फुलपाखरू असून त्याचा कोष हलक्या पोपटी रंगाचा असतो. ह्या दालनात फुलपाखरू या विषयावर अभ्यास करणारे काही संशोधक, कोष कसा तयार होतो, त्याला विकसित होण्यासाठी किती काळ लागतो व या कोषाच्या आत त्या फुलपाखराचा जन्म होताना त्या द्रव्यापासून हळूहळू त्याचे अवयव कसे विकसित होत जातात याविषयी माहिती देत होते. आपण कितीकदा फुलपाखरं बघत असतो, पण आपल्या शहरात असं एखादं म्युझियम का नाही, अशी खंत मनात उगीचच वाटून गेली.

माझा त्याविषयी चा विशेष अभ्यास नाही त्यामुळे वनस्पतींची शास्त्रीय नावं काही लक्षात नाहीत पण अगदी आपल्यासारखं जास्वंद, कमळ, ऑर्किडचे तर अनंत प्रकार हे अगदी सहज ओळखू आलं. फुलाच्या वासाची मात्र जी मजा आपल्या देशात आहे ती पल्याडच्या देशात थोडी कमीच. घटपर्णी सारख्या कीटक भक्षण करणाऱ्या वनस्पतीसुद्धा तेथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या आहेत. आपण वनस्पतीमधील मांसाहारीपणाचं दर्शन त्यामुळे घेऊ शकतो. 

गाडी जर पार्किंग मध्ये पार्क केली; तर रस्त्याच्या दुतर्फा गाडी पार्क करायला जागा असली तरी ती आपल्या नशिबात असेल की नाही याचा विचार करीत बसावं लागत नाही, पण त्या पार्किंग पासून मुख्य पार्कपर्यंत पोहोचण्यासाठी थोडं चालावं लागतं. अर्थात तिथून आपण जी काही व्यायामाला सुरुवात करतो ते संपूर्ण पार्क ला फेरफटका मारेपर्यंत करीतच असतो.

हा इतका स्वच्छ मोकळा आणि हिरवागार निसर्ग बाहेरच्या वाहनांच्या प्रदुषणातही तितकाच नीटनेटका आणि प्रसन्न कसा काय राहू शकतो याचा पदोपदी प्रश्न पडतो. आपला देश सोडून सगळे लोक अमेरिकेत निघून जात आहेत, ते योग्य नाही असले विचार सतत येत असतात परंतू हा निसर्ग, शांतता, शिस्त, ऑक्सिजन यांच्या शोधात लोक भटकत तिथे पोहोचत असतील का असंही वाटून जातं.


अमेरिकेत रस्त्यावर गाडी लावून विकलं जाणारं खाणं खायची वेळ कधी आली नव्हती. या दिवशी तोही प्रकल्प पूर्ण झाला. शाकाहारी हॉट डॉग नावाचा प्रकार खायला मिळाला आणि त्याबरोबर आईस्क्रीम. मातोश्री अंडे सुद्धा खात नसल्यामुळे मुळात नावातच हॉट डॉग असलेली ही वस्तू कशी काय मान्य करतील असं वाटत होतं पण तिनेही त्यावर आक्षेप न घेतल्याने आम्ही स्वस्तात मस्त खाऊन पुढची फेरी मारायला पुढे निघालो. आजूबाजूला आमच्याच वयाची किंबहुना आमच्याहून मोठी माणसं पळत होती, सायकल चालवत होती ते बघून 'लाज' म्हणजे काय याची पुनश्च जाणीव झाली. पण 'आळस' हा फार जुना मित्र असल्याने अशा गोष्टी फारशा मनाला लावून न घ्यायला जमतात.  
हिरवीगार उंचच उंच झाडं, स्वच्छ निळाशार आभाळाचा रंग, हवेतला थोडासा गारवा आणि दिवसभर पडलेलं ऊन यामुळे आमची पार्क ची सफर फार सुंदर पार पडली. तिथे मधेच एक मोठ्ठं ओपन एयर थिएटर दिसलं, तिथे कुठलासा प्रवेश सादर होत होता, काही जण त्याचा आस्वाद घेताना दिसत होते. कुठेही अनावश्यक गर्दी, रेटारेटी, आवाजाचा कोलाहल नव्हता. शांतता आणि अधिक शांतता बरोबर होती.
  
त्यानंतर गोल्डन गेट ब्रिज या जवळपास एक मैल लांबीच्या सस्पेन्शन ब्रिज बघायला पुढे निघालो. हे स्थळ फोटोग्राफीसाठी प्रसिध्द असे ठिकाण आहे. अर्थातच तिथून पुलाच्या दोन्ही बाजूंना पसरलेला अवाढव्य पॅसिफिक महासागर बघून हरखून जायला होतं.  तिथे पूर्वी केवळ लहान लहान बोटींच्या आधारे प्रवास केला जात असे परंतू हा पुल बांधून झाल्यापासून समुद्राच्या पलीकडील शहरं सॅनफ्रॅन्सीस्कोला जोडली गेली.




महाप्रचंड देश, त्यातील महाप्रचंड जागा, महाप्रचंड रस्ते आणि तसाच अजस्त्र आणि दणकट पुल. आणखी एक नक्की बघावं असं हे स्थळ, सृष्टीसौंदर्य आणि भव्यता यांचं एक प्रतिक. 







टिप्पण्या