आजच्या खेळा यश द्या देवा!

किती समर्पक ओळी आहेत ना या! खरंच एखाद्या कलाकृतीसाठी कलाकारांनी केलेले अथक परिश्रम, त्या कलेची साधना प्रेक्षकांसमोर केवळ काही वेळ सादर करायची, त्यावरून त्या कलाकृतीला दाद मिळणार की नाही याची वाट बघायची, किती कठीण काम, पण याच प्रयोगाला खेळ म्हणून त्यासाठी रसिकप्रेक्षकांच्या आशीर्वादासाठी घातलेलं हे गोड साकडं. चित्रपटगृहात आज ‘बापजन्म’ या चित्रपटाच्या निमित्ताने हे शब्द पडद्यावर वाचले.

चित्रपटाची सुरुवात अगदी अनपेक्षित अशी होते, चित्रपटाचा नायक, ‘भास्कर पंडीत’ यांचा मृत्यू झालेला आहे. परंतू त्याची मुले त्याच्या मृत्यूनंतरही त्याला भेटायला आलेली नाहीत, अशी ती सुरुवात. त्यानंतर महिन्याभरापूर्वी या नायकाला ब्रेन कॅन्सर झालेला असल्याचं समजलेलं असतं हे कळतं. नायकाच्या रिटायरमेंट नंतरच्या आयुष्याचे साथीदार असतात, त्याचा एक कुत्रा ‘टायगर’ आणि ‘माउली’ त्याचा घरगडी. त्याचं या दोघांशी अगदी सलोख्याचं नातं आहे. सख्खी मुलं असूनही ती बरोबर नाहीत म्हणून तो जराही खचलेला नाही, तो खंबीर आहे एकटा असला तरीही आणि मरण अगदी जवळ येऊन ठेपलेलं आहे तरीही. पण त्याला एकदा त्याच्या मुलांना भेटायची इच्छा मात्र आहे. मुलांवर प्रेम असणाऱ्या, स्वत:च्या कामावर निष्ठा असणाऱ्या, आत्मविश्वास असणाऱ्या एका विलक्षण नायकाची, वडिलांची, मालकाची आणि दोस्ताची ही गोष्ट आहे.


बापजन्म नावाच्या या चित्रपटातील बापाची भूमिका सादर करणारे बाप नायक ‘सचिन खेडेकर’ त्यांची भूमिका उत्तमरीत्या वठवतात. हावभाव, आवाज, हालचाली यातून त्यांनी उभा केलेला ‘भास्कर पंडित’ आणखी कसा बरं असला असता असे कुठलेही प्रश्न मनात येत नाहीत. सहज सुंदर, ओघवता, रांगडा, निरागस, आणि खरा माउली 'पुष्कराज चिरपुटकर' याने साकारलाय, त्याला तोड नाही. त्याच्या खुसखुशीत विनोदामुळे चित्रपटातील घटना अगदी नाटकासारखी समोर घडतेय असं वाटून जातं. 

चित्रपटात कुठेही नवखेपण जाणवत नाही, एक प्रामाणिक अभिव्यक्ती जाणवते. थोडासा वेगळा विचार घेऊन त्याची आखीवरेखीव बांधणी करून ती खुमासदार शैलीत समोर येते. हे कौशल्य दिग्दर्शकाचं, 'निपुण धर्माधिकारी' याचं. त्याचबरोबर कथाभाग पुढे घेऊन जाणारं ‘देवानी दिधली लोचने, तुला पाहण्या|’ हे गाणं, चित्रपटाच्या नायिकेची जागा भरून काढतं. ते गाणं या चित्रपटातील पात्रांना एका सुतात ओवून ठेवतं. काहीतरी मनापासून सहज सुंदर उत्कटतेनं बाहेर यावं तितकंच सुंदर गायलेलं 'दीप्ती माटे'च्या आवाजातील हे गाणं नक्की लक्षात राहतं.  

या चित्रपटाचे निर्माते नीरज बिनीवाले, अमृत आठवले, केयूर गोडसे, यांच्या सिक्सटीन बाय सिक्स्टीफोर या कंपनीची निर्मिती असलेला हा पहिला चित्रपट. पहिला चित्रपट असल्याचं जाणवतही नाही. मित्रहो, कम्माल मजा आली. विषय वेगळा, खरं तर थोडासा जड, थोडासा जिकडे तिकडे बघायला मिळणारा पण तरीही तो तुम्ही उत्तम सादर केलाय.

तुम्हाला अशाच भन्नाट कल्पना सुचत राहाव्या आणि त्या वेगवेगळ्या स्तरावर सादर व्हाव्या यासाठी खूप खूप शुभेच्छा!


टिप्पण्या