मृदुला....

आठवणी कायम गोड छान मनापासून जपाव्या जगाव्या अशाच असतात अशी ठाम समजूत असते आपली, जिवंतपणे जगलेले कितीक क्षण उराशी बाळगून एकेक नवा दिवस उगवत असतो आणि तोही नव्या ताज्या उमेदीनं जगायचं बळ देत असतो. पण एखादा दिवस असा असतो जो माणसाला खाड्कन जमिनीवर नेऊन आदळतो. तुझ्या हातात काहीही नाही, काही असेलच तर तो फक्त हा आताचा क्षण हे जाणवून देतो.
असं असहाय्य, दु;खी, हतबल करणारा दिवस आला नव्हता आयुष्यात. असा क्रूर अनुभव इतकं भयंक वास्तव कसं सहन करतात?
अचानक एक दिवस एका मैत्रिणीचा मेसेज येतो. अगं, आपली मृदुल गेली....हे असले शब्द ..कळायचे तरी कसे? गेले काही दिवस हे खरं आहे हे मान्य करण्यातच गेले...अजूनही लिहिताना मागच्या पुढच्या वाक्याचा काही संदर्भ तरी लागतोय की नाही कुणास ठाऊक.
मृदुल, आठवणींचा पूर येऊन घश्याला शोष पडावा आणि आवंढा गिळत गिळत तुझ्याबद्दल असल्या काही आठवणी लिहाव्या हे माझंच दुभाग्य! असं केल्यानं काय होतं मनातले विचार दूर जातात की आणखी जवळून त्या व्यक्तीला आपण भेटून येतो कोणास ठाऊक?
अनवधानाने भेट झाली आपली, छात्र प्रबोधन च्या कार्यालयात मराठी भाषा, मासिक त्याबरोबरच प्रबोधिनी या सगळ्या नवीन गोष्टींची ओळख करून घेणारी मी आणि दादा नवाथे यांच्या त्रिमितीय प्रतिकृतींचं वेड घेऊन आलेली तू. मी ठरवत होते इंजीनियरींग करायचं का, कुठे, कसं आणि तुला समोर दिसत होतं बारावीचं वर्ष, हातात घेतलेलं हे पुस्तकाचं काम. एकेक प्रतिकृती हातावेगळी करून त्याची कृती, करण्यासाठी लागलेला वेळ लिहून काढणं. प्रत्येक कृती मराठी आणि इंग्लिश भाषेत लिहिणं, त्याचं प्रुफ तपासणं, येत नव्हते तरी मराठी फॉन्ट वापरत दुरुस्त्या करणं, आकृत्या, त्याची मापं, पुस्तकाचं डिजिटल रूप येईपर्यंत केलेले कष्ट आणि दिलेला वेळ याचं सार्थक झालं ते पुस्तक पूर्ण झालं तेव्हा. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती, हे करताना पुस्तक तयार व्हायला हवं ही तुझी जबरदस्त इच्छा. ... कितीतरी लहानसहान आठवणी आहेत ....त्यासाठी निवडलेली कविता ....देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे....
नेतृत्व कसं असावं, जबाबदारी घेणं आणि उत्तमतेचा ध्यास असणं म्हणजे काय याचं उदाहरण तुझ्यारुपात माझ्या समोर होतं. प्रबोधिनी म्हणजे मृदुल असं समीकरण होतं, असा एखादा मित्र,मैत्रीण असला की आपण स्वत:ला फार श्रीमंत समजू शकतो, अगदी फ्रॉकचे दोन्ही खिसे आणि गळ्यात अडकवलेली छोटीसी पर्स भरून भाजलेले दाणे आहेत अशा अविर्भावात मिरवत असतो. तसे दिवस तू मला दिलेस. आजही भय्याजींशी ओळख करून देत अगं यांना भय्याजी म्हणतात असं सांगणारी मृदुल डोळ्यासमोर येतेय. तुझ्याकडे बघून मला कायम या शाळेबद्दल कुतूहल वाटत आलंय. प्रबोधिनीच्या उंबरठ्यावर वाकून नमस्कार का करायचा, किमान वास्तूत येताना पूर्ण पोशाख घालायला काय हरकत आहे, बोलताना एकही शिवी न वापरणं ते पूर्ण वर्षभर जमत नसेल यायला तर दल घेऊ नये यावर आपण तेव्हा कित्येक तास बोललो असू. यातल्या कित्येक गोष्टी काळाच्या ओघात पुसल्या गेल्या, बदलल्याही. पण त्या वेळी जे बोललो त्यामुळे कदाचित विचार करायला लागलो, मत मांडायला लागलो आणि जे पटत होतं ते वागायला शिकलो असू असं नक्की वाटतं. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात आपल्याला वेगवेगळी माणसं भेटत जातात आणि त्यांच्या असण्याचे आणि जगण्याचे आपल्या आयुष्यावर कित्येक पडसाद उमटलेले असतात. तुझं असणंही असंच होतं. प्रत्येकवेळी हा ‘होतं’ शब्द येतोय आणि मनात चर्रर होतय... पटत नाहीये ...यावर काय करावं तेही सुचत नाहीये.
किती वर्ष झाली आपण भेटून ... जेव्हा कधी गप्पा मारू तेव्हा मनसोक्त बोलणं, हसणं आणि काही न सांगता समजून घेत दुसऱ्याला प्रोत्साहन देणं, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला नक्की विसरणं, चुकून उगीच hello mam... busy? असा मेसेज करून कित्येक महिने गेल्यानंतर उत्तर आलं तरीही संवाद सुरळीत होणं, अशी ओळख होणं, त्या नात्याची घट्ट वीण जाणवत राहणं....हीच असेल नं मैत्री कदाचित; ज्यात कुठलीच अपेक्षा नसते केवळ असणं सोडून ...
आणि आज हे काय होऊन बसलय, तुझं चेहरा आणि कितीतरी आठवणी मनात येताहेत काय लिहू किती लिहू .....जूनमध्ये भेटलो तेव्हा माच्ची माच्ची म्हणत घरभर हिंडत असलेला भार्गव डोळ्यासमोर येतोय, बाकी घरातल्या इतरांशी तर काय बोलू? 
देवा, या सगळ्यांना हे दु:ख सहन करण्याची आणि त्यातून सावरायची ताकद दे हीच मनापासून इच्छा.

टिप्पण्या