The Golden Gate


पुस्तक वाचायला हवय यार एखादं! नवं काहीतरी, वेगळं काहीतरी वाचायला हवंय असं कितीतरी वेळा वाटत असतं. तेच तेच विचार आणि त्याच त्याच चौकटीबाहेर पडण्याचा पुस्तक हा फार जवळचा मार्ग वाटतो मला. एककल्ली आणि फक्त बरोबर वाटणारे विचार धुवून पुसून आपली पाटी कोरी करण्यासाठी या लेखक कवींचे आभार मानावे तितके कमी आहेत. अशीच ही वाचनतल्लफ वर्षातून एकदा तरी येतेच. मग सगळी अतिशय महत्त्वाची कामं, तंगड्या पसरून पुस्तक वाचत पडलेलं आपलं निर्लज्य ध्यान बघून आजूबाजूचे काय म्हणतील हे आणि असले सगळे विचार बाजूला ठेवून मग या पुस्तकांची कव्हरं थोडीफार दुमडू लागतात.
बघ आवडतंय का, वेगळं आहे म्हणत नवरा पुस्तक घेऊन आला. द गोल्डन गेट, नावं वाचून आधी मला वाटलं की, अमेरिकेशी संबंधित भारतीय माणसाने लिहिलेलं पुस्तक म्हणजे त्याचे तिथे जाऊन कसा स्थिरस्थावर झालो, असं काहीतरी असणार. माणसाने एक तर पुस्तक वाचायच्या आधी नावावरून कसं असेल असलं काही ठरवू नये किमान हे असं लिहू तरी नये, असो, दोन्ही गोष्टी अशक्य झाल्याने लिहितेय..असो.
पुस्तक उघडलं आणि आ वासून बघत राहिले. साधंसरळ पुस्तक नव्हतंच ते. संपूर्ण पुस्तक एका काव्याच्या स्वरूपात लिहिलेलं. सगळ्यात आधी विक्रम सेठ या लेखकाविषयी माहिती घेतली. त्याचं हे पुस्तक १९८६ मध्ये लिहिलेलं आहे हे कळलं. एकुणात पुस्तक वाचायला पुष्कळ उशीर झालाय आणि एका कमाल लेखकाचं हे गाजलेलं पुस्तक आपल्या हातात आलंय हेही कळलं.
हे संपूर्ण पुस्तक इंग्लिश सोनेट म्हणजेच सुनीत या काव्यप्रकारात लिहिलेलं आहे. त्यात अतिशय सुंदर आणि चपखल यमकं साधली जात एक गोष्ट उलगडत जाते. काव्याच्या माध्यमातून एकीकडे या साहित्य प्रकाराला सहजी पेलवत हा कादंबरीकार आपल्याला संवेदशील अशी एक कथा सांगत जातो. प्रेम, राग, लोभ, उत्कंठा, तिरस्कार ज्या म्हणाल त्या भावभावना या शब्दांच्या जादुई रचनेतून भेटत जातात.
ही कथा आहे साधारण ८०च्या दशकातली. सॅनफ्रॅन्सिस्को शहरातील हुशार, सुशिक्षित आणि स्वत:ची मतं असणाऱ्या तरुणाईची. जॉन सिलिकॉन व्हॅली मध्ये काम करणारा एक एक्झीक्यूटिव्ह आहे, त्याची जुनी मैत्रीण, प्रेयसी जेनेट कलाकार आहे, लीझ ही अतिशय हुशार अशी त्याची दुसरी मैत्रीण स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी मधून कायद्याचं शिक्षण घेतलेली आहे, तिचा भाऊ एड संगीत क्षेत्रात काही करू बघतोय, धर्म-अधर्म, पाप-पुण्य, मानसिक, शारीरिक समाधान ओढ अशा एक वेगळ्याच चक्राचा शोध तो घेतोय. जॉन चा एक जवळचा मित्र आहे, फील, त्याला त्याची बायको सोडून गेलेली आहे, आणि त्याच्याबरोबर त्याचं मुलगा राहतोय. आयुष्यात चढउतार झाल्याने त्याने नोकरी सोडून अँटीन्युक्लीअर रॅलीतून विविध निषेध मोर्चात भाग घेण्यास सुरुवात केलेली आहे.
गोष्टीची सुरुवात होते ती जॉन आणि जेनेट च्या नात्यापासून, हळूहळू हे नातं तुटत जातं आणि जॉन त्याच्याच विषयीची एक जाहिरात पेपर मध्ये देतो. त्याकाळी कॅलिफोर्नियामध्ये जे वास्तवात घडत होतं तसे प्रियकर आणि प्रेयसी चा शोध घेण्याचे छापील जाहिराती सारखे मार्ग हा तरुण वापरतो. लीझ या तरुणीचं त्याला उत्तर येतं, आकर्षक आणि हुशार अशा या तरुणीच्या तो पुन्हा एकदा प्रेमात पडतो. जॉन, लीझ, फील आणि एड यांची ओळख होते. स्वत:च्या लैंगिक प्रवृत्ती बद्दल साशंक असलेला एड आणि सहानुभूतीची गरज असलेलं फील एकमेकांना आधार देऊ बघतात, तेव्हा धर्मअधर्म, पाप-पुण्य याविषयी वैचारिक गोंधळाबद्दल ही पात्र संवाद साधतात. वेगळे विचार असले तरीही ते ऐकून घेण्याची पटवून घेण्याची तयारी असलेली लिझ आणि काहीसा एकांगी, स्पष्ट पण कठोर विचारांचा जॉन याचंही नातं जुळता जुळता त्याला वेगळीच कलाटणी मिळते. फील आणि लीझ एका अवधानाने अनवधानाने जन्मोजन्मीच्या नात्यात गुंततात आणि जॉन पुन्हा एकटा पडतो. तो पुन्हा जेनेटकडे जातो, त्यांच्या प्रेमाचे सूर नव्याने जुळू बघतात, मोकळ्या विचारांची  जेनेट मैत्रीमध्ये पडलेली फुट भरून काढण्यासाठी फील आणि लीझ यांना तिच्या एका प्रदर्शनासाठी निमंत्रित करते. तेव्हा त्यांच्या आणखी एका मित्र-मैत्रिणीच्या गाडीचा अपघात होऊन मृत्यू होतो. फील आणि लीझ त्यांच्या बाळासाठी जॉन ची ‘गॉडफादर’ म्हणून निवड करतात आणि तशी चिठ्ठी त्याला पाठवतात.
ऐंशीच्या दशकातील अमेरिकन समाज जीवन, त्यांची बदलत गेलेली संस्कृती याची आपल्याला या कथेतून ओळख होते. तिथल्या समृद्धीची, बुद्धीमत्तेची चव चाखलेल्या, स्वावलंबी, स्वतंत्र शहरी तरुणांची ही गोष्ट थोड्या फार फरकाने आजच्या आपल्या देशाचंही प्रतिबिंब दाखवून जाते. विविध नातेसंबंधातून उभा राहणारा, कधी कोसळणारा तर कधी सावरणारा कथानायक त्याच्या भावनांच्या जाळ्यात अडकलेला असताना कधीतरी खूप एकटा वाटून जातो. यश, पैसा, प्रतिष्ठा यांच्या इतकीच किंबहुना त्याहूनही महत्त्वाची सहवासाची मानवी गरज कणखर माणसाला कमकुवतही बनवू शकते आणि एखाद्या दुर्बळाला आत्मविश्वास देऊन उभंही करू शकते.
जाता जाता हलके फुलके उपहासात्मक विनोद करणारं, धर्मावर भाष्य करणारं, प्रेमाला मैत्रीला ओळखताना अपराधी, निराश होणारं,  तर कधी मायेनं लहानग्याचे लाड करणारं हे सुनीत. ज्यांना कविता आवडते त्यांच्यासाठी, ज्याला कादंबरी आवडते त्यांच्यासाठी, ज्याला प्रेमकथा आवडते त्यासाठी, ज्याला ट्रॅजीडी आवडते अशा सगळ्यांसाठी आहे. 

टिप्पण्या