तंत्रज्ञान: कालच्या कल्पना आणि आजच्या वास्तवाला जोडणारा दुवा

उन्हानं करपून टाकलेल्या जमिनीवर वळवाचे थेंब पडू लागतात आणि तीच जमीन कात टाकावी तशी नवी कोरी दिसू लागते. मातीचा सुगंध दरवळतो, हवेतला ओलावा पानापानातून दाटून येतो. त्या पावसानं सारं वातावरण बदलून जातं, निसर्गाच्या मनात अचानक नवनवीन कल्पनांना धुमारे फुटू लागतात. ढगांची गडबड उडून जाते, काळे-पांढरे ढग गरजू लागतात, विजा कडाडू लागतात, पावसाच्या  सरी कोसळू लागतात, पत्रे वाजू लागतात, कुठे खिडक्या बंद-उघड करण्याची धडपड सुरु होते, वाळत पडलेले कपडे ओले होतात, गाड्या बंद पडू लागतात, दुकानात उगीचच शेड साठी प्रचंड गर्दी होऊन दुकानं ओसंडून वाहू लागतात, नेमके तेव्हाच लाईट जातात, सिग्नल काम करेनासे होतात, ट्राफिक जॅम होतात, वर्षभरानंतर वापरायला काढलेल्या रेनकोटची चेन लागेनाशी होते, तेवढ्यात आपल्या पांढऱ्या शुभ्र कपड्यावर फर्रर्रर्र करून चिखलाची नक्षी उठवत शेजारची गाडी भरधाव निघून जाते, आणि आपली उन्हाळ्यातून पावसाळ्यात एन्ट्री होते.
      तुम्ही म्हणाल, पहिल्या पावसानी वर्षानुवर्ष हेच होत आलंय तर यात नाविन्य ते काय? ते ही खरंच! पण ही अशी कुठलीही धावपळ न होता ही पावसाचं स्वागत अगदी शांतपणे करणारेही आजकाल कित्येकजण बघायला मिळतात. घरातून बाहेर पडताना त्यांनी केवळ आजचा नाही तर चार दिवस पुढचाही हवामानाचा अंदाज मोबाईलवर वाचलेला असतो. त्यावरून त्यांनी ऑफिसमध्ये जाण्या येण्याची वेळ निश्चित केलेली असते, कोणत्या रस्त्यावर कितपत गर्दी असू शकेल हे बघून ते प्रवास करायला निघतात, अॅमेझॉनसारख्या अॅप वरून रेनकोट छत्री हवी तिथे ऑर्डर करून मागवून घेतात, हवा बदलणार म्हणून वेळेच्या आत फ्लू चं इंजेक्शन घेतात, कव्हर केलेल्या स्विमिंग पुल मध्ये पोहायला जातात, इतकंच काय तर गावातल्या नारळी-पोफळीच्या झाडांना ज्या पंपाने पाणी पुरवलं जातं त्याला मेसेज करून पावसाच्या प्रमाणानुसार कमी-अधिक पाणी पुरवठा सुद्धा करतात.
      निसर्गाच्या अनियमिततेवर काही प्रमाणात का होईना मात करीत आजचा मानव खूप काही वेगळं करू लागलाय. पूर्वी माणसाला ज्या केवळ कल्पना वाटल्या असतील त्या आज वास्तवात उतरताना दिसत आहेत. एखादी सुरी, चाकू, चाक, आग, पेपर, रंग, छपाई, असे अनंत शोध लागत गेले आणि माणूस शिकत गेला. टेलीफोन, मोबाईल, कंप्युटर आणि इंटरनेटसारखे शोध लागून तर त्याच्या प्रगतीचा वेग वाढतच गेला. आजच्या काळातील विनाड्राईव्हरची कार, हाताच्या बोटाच्या ठशावरून उघड-बंद होणारे बँकेचे अॅप, गुगल होम, 360 अंशातून फोटो घेणारा कॅमेरा किंवा इतर कित्येक उदाहरणातून या प्रगतीचा सूत्रधार असणारे तंत्रज्ञान आज कोणकोणत्या क्षेत्रात कशाप्रकारे वापरले जाते व त्याचा वापर आपण कशप्रकारे करतो याची माहिती आपण या सदरांतून घेणार आहोत.

टिप्पण्या