बंद म्हणजे बंद


महाराष्ट्रात प्लास्टिकला बंदी जाहीर, प्लास्टिक बंदीचा तमाशा, मंत्र्यांना प्लास्टिकचा बुके, प्लास्टिक बंदी निवडणूक फंडासाठी, प्लास्टिक वापरल्यामुळे तीन लाखांच्या वर दंडवसुली, प्लास्टिक बंदी मुळे नोकऱ्या गेल्या, प्लास्टिक बंदीमुळे व्यवसाय बसला, प्लास्टिक बंदीमुळे व्यायाम बंद, प्लास्टिक बंदीमुळे बी पी शूट, प्लास्टिक बंदी मुळे कागद-कापडाला सोन्याचे भाव, प्लास्टिक बंदीमुळे गणपती बाप्पा चिंताग्रस्त...सगळीकडे हाहाकार माजला, लोकांना काय करावं, काय करू नये सुचेनासं झालं,
अमुकतमुक तर पार गोंधळून गेला. त्यानं ऐन पावसाळ्यात प्लास्टिकच्या पिशवीत कोंबलेली वह्या पुस्तकं भसाभसा बाहेर काढून पोरांना शाळेत पाठवलं. नव्या पिढीतली चुणचुणीत मुलं निमूट शाळेत गेली. कापडी-पिशवीतून आणलेल्या पेन्सिली आणि टाक वापरून शहाण्यासारखी अभ्यास करू लागली. कापडी पाण्याची बाटली आणून न झाल्याने टाकीवर पाणी प्यायला शिकली. ओली कच्चं दप्तरं घेऊन घरी आली. रिक्षेतून उतरताना त्यांच्या आईने रिक्षेवाल्याला ओल्या ओल्या नोटांचा गोळा दिला. रिक्षेवाला चिडला.
तेवढ्यात आईला दप्तरं ओली दिसली, आईने चिडून मुलांना दोन ओले रट्टे दिले. ओली पुस्तकं आणि ओल्या नोटा पंख्याखाली वाळत घातल्या.  विजेचं बिल वाढणार हे बघून अमुक तमुक ने जेवण सगळं घरी बनव असा फतवा काढला. ओल्या ओल्या भाज्या, आणते ताज्या ताज्या म्हणत बायको बाजारात गेली. भाजी झाली, जेवण झालं. अमुक तमुकची बायको खरकटं टाकायला बेसिनपाशी गेली, समोर प्लास्टीकची पिशवी आणि प्लास्टिकची पेटी पाहून जाम वैतागली. सरळ तो घेऊन तिनं घराचं दार जोरात उघडलं. त्या बरोब्बर गेल्या वर्षीचं थर्माकोलचं मखर माळ्यावरून धाडकन खाली कोसळलं. अमुक तमुक ने ताबडतोब ते पुन्हा माळ्यावर टाकलं. अमुक तमुकची बायको खालच्या कचरापेटीपाशी पोहोचली. पाहते तर काय तिथे कचरापेट्यांचा हा एवढा ढीग. तिने तिची ती बादली हळूच तिथेच जवळ ठेवली. शेजारणीने ती पाहिली आणि लगेच पोलिसांना फोन लावला. पोलिसांनी ते त्यांंचं कामच नाही असं सांगितलं. बायकोनं सुटकेचा निश्वास टाकला.
आता परत त्यांना कोsssणी फोन करीत नाही. सगळे गुणीजन प्लास्टिक बाहेरच फेकतात. अज्जिबात वापरत नाहीत. कचरा फक्त प्लास्टीकचाच. वापरणं अगदी बंद म्हणजे बंद. बिल्डींग अकरा मजली आहे. कचऱ्याचा ढीग तेरा मजली. पत्त्यामध्ये तेवढी जवळची खुण म्हणून तेरा मजली ढिगाच्या मागे असं लिहावं लागतं. बाकी सगळं उत्तम. बंद म्हणजे बंद!

टिप्पण्या