सेक्शन फाईव्ह, मोअर स्पीड, फोर सेव्हन ... अशी
भरभक्कम आवाजात दिलेली आज्ञा, मोठमोठाली यंत्रे, त्यांचे मोठमोठाले गियर्स, ते
गिअर एकमेकांत गुंफले जात असताना होणारा घणाघाती आवाज, आणि त्या यंत्रांसारख्या यांत्रिक
हालचाली करणारे अनेक कामगार हे चित्र आहे चार्ली चॅप्लीन यांच्या मॉडर्न टाईम्स या
अमेरिकन विनोदी चित्रपटातलं. त्या काळी जनजीवनावर आणि आर्थिक परिस्थितीवर औद्योगिक
क्रांतीचा जो परिणाम झाला त्याची ही एक झलक आहे. तो काळ होता 1760 ते 1840
चा, तेव्हा विविध प्रकारच्या उत्पादन किंवा निर्मिती प्रक्रियेत मानवी श्रमांना
यांत्रिक मदत लाभत होती. नवनवीन प्रयोग केले जात होते त्यांना यशही मिळत होते पण आजच्या
औद्योगिक विकासाचा वेग मात्र तेव्हा पेक्षा कितीक पटीने अधिक आहे.
आजच्या निर्मितीप्रक्रियेचा मूलमंत्र आहे
ऑटोमेशन अर्थात स्वयंचलन. पूर्वी जे काम करण्यासाठी माणसांची गरज होती तीच कामे आज
यंत्रांच्या सहाय्याने केली जातात. या स्वयंचलनाचा डोलारा उभा असतो तो माहिती
तंत्रज्ञानाच्या पायावर. कारखाना कार्यक्षम पद्धतीने चालविण्यासाठी त्याचे विविध विभाग
विविध प्रकारची कामे करीत असतात. यामध्ये रोजच्या कामाचे नियोजन, ते काम पार पाडणारे
यंत्र चालविणे, त्याची देखभाल करणे, पूर्ण झालेले काम/वस्तु यांचे योग्य प्रकारे पॅकेजिंग
करून त्याचे वितरण करणे ई. कामांचा समावेश करता येईल.
या सर्व कामांमध्ये प्रत्येक टप्प्यावर कितीतरी
वेगवेगळ्या पद्धतीची माहिती अतिशय वेगाने निर्माण होत असते. ही माहिती माणसांच्या
मार्फत, यंत्रांच्या मार्फत आजकाल कंप्युटरच्या मार्फत साठवली जाते व आवश्यक
तेव्हा उपलब्ध करून दिली जाते. ‘क्लाउड कम्प्युटिंग’ ही संज्ञा अशा प्रकारे
त्वरीत, हव्या त्या वेळी आणि हवी ती माहिती उपलब्ध देण्याच्या संदर्भात वापरली
जाते. जसजसे या कारखान्यातील विविध कामांचे कंप्युटरायझेशन झाले तसतशी प्रत्येक कामातील
‘पारदर्शकता’ वाढली, त्यातील लहान सहान चुका लक्षात येऊ लागल्या आणि त्या दुरुस्त करता
येऊ लागल्या. याचबरोबर मिळालेल्या माहितीचं ‘विश्लेषण’ करणे आणि त्या विश्लेषणातून
विविध प्रकारचे निर्णय घेणे ही प्रक्रिया उदयाला आली. कोणा एका व्यक्तीच्या कल्पनेपेक्षा
हाती आलेल्या अनेक निरीक्षणांची, निष्कर्षांची जोड निर्णयाला मिळाली. सातत्याने
एकाच गुणवत्तेचे उत्पादन करणे शक्य झाले. यंत्रातील बिघाड यंत्रानेच सूचित करावा
आणि त्यावरील पर्यायही यंत्रानेच सुचवावा असे अनपेक्षित बदल घडले.
‘थ्री डी प्रिंटींग’ अस्तिवात आल्यावर तर औद्योगिक
क्षेत्राला कलाटणीच मिळाली. प्रत्येक गोष्ट एखाद्याला हवी तशी, कमी वेळात, कमी
खर्चात बनू लागली. आजच्या घडीला एकाच वस्तूची निर्मिती करणारे 40 देशातील 40
कारखाने भौगोलिकदृष्ट्या जरी निरनिराळे असले तरी त्यांच्यातील नेटवर्कचे जाळे आणि
त्यांच्या विविध कार्यपद्धती मात्र अगदी एकसारख्या असतात आणि त्या कुठूनही
नियंत्रित केल्या जाऊ शकतात. याशिवाय ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ ही आणखी एक विलक्षण
गोष्ट. भौतिक वस्तु, वाहने, घरगुती यंत्रे, सेन्सर आणि इतर अनेकविध गोष्टी
इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांना जोडून त्यांचा एकमेकांशी होणारा संवाद आणि
त्यानुसार केली जाणारी कामे; याच्या माध्यमातून तर एखाद्या कारखान्यात एखादे काम
घेतले जाऊन ते एखाद्या यंत्राकडून करवून घेतले जाईल व ग्राहकाला पोहोचविले सुद्धा
जाईल. आता यातून तंत्रज्ञान माणसाचं काम सोपं करेल की त्याला निष्क्रिय बनवेल हे
मात्र काळच ठरवेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा