इलेक्ट्रोनिक्स चं क्षेत्र हे
खरं तर रोजच्या बदलांचं किंबहुना सातत्यानं बदलत प्रगत होत माणसासमोर आव्हान
निर्माण करणारं. स्वत:च तयार केलेल्या एका वस्तूला आणखी प्रगत आणखी सोईस्कर, आणखी
आरामदायी कसं बनवता येईल, यासाठी आज कितीक नैसर्गिक मेंदू प्रयत्नांची पराकाष्ठा
करीत आहेत. हे तंत्रज्ञान अतिशय सहजी आपल्या आयुष्याचा भाग बनून जातं. याचं एक
उत्तम उदाहरण म्हणजे 4 जी. अधिकाधिक वेगाने वायरलेस सेवा मोबाईल किंवा विविध डेटा
टर्मिनलपर्यंत पोहोचविण्यासाठी अस्तित्वात आलेलं हे तंत्रज्ञान आपापल्या मोबाईलवर
केवळ 4 जी एल टी ई चा टॅब अॅक्टीव्हेट करून आपण वापरायला सुरुवात केली. माहितीचा
प्रसार एका ठिकाणावरून दुसरीकडे होण्यासाठी एक क्षण सुद्धा आता मोठ्ठा काळ होऊन
बसला आहे.
नैसर्गिक बुद्धीमत्तेइतकंच
मशीनच्या बुद्धीला मिळालेलं हे महत्त्व आहे. मशीनच्या बुद्धीमत्तेला आजच्या काळात
AI अर्थात आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) म्हणून ओळखलं जातं. संगणक
शास्त्रातील हा सध्याचा परवलीचा शब्द. एखाद्या गोष्टीचं शिक्षण घेणे किंवा एखाद्या
प्रश्नाचं उत्तर शोधणे या सारख्या गोष्टींसाठी मशीनचा वापर होऊ लागलाय. या AI चा
वापर आता प्रत्येक क्षेत्रात केला जातो, अगदी आजकालचे फोन, मोबाईल, टीव्ही, फ्रीजच
नाही तर अगदी दिवे, खेळ, किंवा संरक्षण क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा खुबीने
वापर केला जातो.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात
प्रगती होत असताना आपणही अवधानाने-अनवधानाने त्याचा भाग बनून गेलेलो असतो. आपल्या
मोबाईलवर जर एखाद्या गोष्टीचा शोध घेतला, तर पुढच्या वेळी त्या विषयाबद्दल
आपल्याला नोटीफीकेशन येऊ लागतं. आपण जर एखाद्या वस्तूची अॅमेझॉनसारख्या माध्यमातून
खरेदी केली तर तुम्हाला त्या वस्तूशी संबंधित इतर अनेक गोष्टींची जाहिरात सतत समोर
येऊ लागते. व्हॉट्स अॅप किंवा फेसबुकवरून तुम्ही तुमचे विचार मांडत असाल तर हे
तंत्रज्ञान अगदी तुमच्या मेंदूचं विश्लेषण करून तुमच्या मानसिक आणि बौद्धिक
स्तराबद्दल मत देऊ शकतं. आज कित्येक कंपन्या एखाद्या व्यक्तीला नोकरी देताना
त्याचा सोशल नेटवर्क वरील सहभाग आणि त्याच्या विधानांना इतर लोकांनी दिलेले प्रतिसाद
यासारख्या गोष्टींना महत्त्व देतात.
बायोमेट्रिक्स हे असेच आणखी
एक उदाहरण. प्रत्येक व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी एक पत्रक, त्यावर फोटो, त्याचे
नाव, पत्ता, आणि सही याच्या कितीतरी पुढे जाऊन आज त्या प्रत्येक माणसाची ओळख
त्याच्या बोटांचे ठसे, त्याच्या डोळ्यांचा रंग, डोळ्यावरील पडदा, चेहरा किंवा
हातावरील रेखा, त्याचा डीइनए ते अगदी त्या व्यक्तीचा एक विशिष्ट गंध इथपर्यंत जाऊन
पोहोचलेली आहे. व्यक्तींची महत्त्वाची कागदपत्रे गोपनीय राखण्यासाठी आज या
गोष्टींचा वापर केला जात आहे. वाय फाय सारखंच नव्याने येऊ घातलेलं लाय फाय हे आणखी
एक उदाहरण. इलेक्ट्रोमॅग्नेटिक अडथळे आल्यामुळे निर्माण होणारे दोष लाय फाय चा
वापर केल्याने कमी करता येऊ शकतात. हॉस्पिटल, विमानाची केबीन किंवा वाहतुकीसाठी
वापरली जाणारी वाहने यासाठी हे वापरले जाईल. यामध्ये एलईडी लाईट च्या माध्यमातून
माहितीचं आदान प्रदान आणि संवाद साधला जाईल.
दिवसेंदिवस प्रगतीचे नवनवे
पैलू दृष्टीस आणून देणारं हे तंत्रज्ञान माणसाला रोज नवा प्रश्न पाडेल आणि रोज नवं
उत्तर शोधायला भाग पाडेल यात शंका नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा