पाऊस असा, पाऊस तसा

रिम झिम, रिपरिप, सरसर-सरसर पाऊस आला
पाऊस ऊन, ऊन पाऊस, आषाढ-श्रावण वाद झाला

पाऊस आला, पाऊस आला, भजी झाली भात झाला
गर्दी झाली, सर्दी झाली, कौतुक झालं, सेल्फी झाला

पाणी वाढलं, धरण भरलं, ट्रॅफिक जॅमला उधाण चढलं
चिखल राडा, तुंबलं गटार, खड्ड्यात कुणी कायमचं पडलं

नुसता कंटाळा, हवा दमट,ओले कपडे, वास कुबट
आला दिवस, गेला दिवस, चिघळत चाललेत प्रश्न चिवट

वीज नाही, गडगडाट नाही, मेलोड्रामा चा पत्ताच नाही
कोसळ कोसळ मांड व्यथा, चाललीये नुसतीच रडकथा

धो धो पाऊस, घराला ओल, झाडाला वाळवी, पोकळ खोड
पायात सुरवंट, नसता घोर, नवऱ्याची भुणभुण, त्रागा सोड

फुटक नशीब,गळकी छत्री, रिक्षा नसणार! ही खात्री
गैर सोय व्हावी हाच छंद, भरीत भर महाराष्ट्र बंद

उकळा पाणी, भरा पिंप, साथीला रोग, दुधाचा संप
काम बाजूला, कवितेला पूर, करपली भाजी, सुटला धूर

काय ती सुरुवात आणि कवितेचा शेवट तरी कसा
पाऊस असा, पाऊस तसा, दर वर्षी पडतो जसा

टिप्पण्या