सिंह: हरणाला राजा केलं काय वेड बिड लागलं की काय? जंगलाचा राजा असतो केवळ
सिंह. आज हरीण आहे उद्या ससा बसेल राज्य करायला?
कोल्हा: अहो पण महाराज, गेली कित्येक युग तुम्ही राज्य केलं की,
सगळ्या प्राण्यांना आता भीती पोटी जगणं नको वाटतंय, जरा मोकळा श्वास घेता
यावा...
सिंह: प्रधानजी, अहो तुम्ही
आमचे मंत्री ना .. मग जे सांगितलं ते आणि तितकं केवळ करीत चला, उगाच मेंदूला ताण देऊ नका
अन्...
तरस: महाराज, सगळं तुमच्या
सल्ल्या नुसार झालंय. वाघ, शिकारी
कुत्रे, अस्वल आणि
बिबट्या सगळे जण तयार आहेत.
सिंह: शाब्बास, प्रधानजी
शिका जरा यांच्यकडून काहीतरी. राज्याचे सेवक सेवक म्हणून काही सेवा करता येत नसते.
राज्य करण्यासाठी मुळात काहीतरी घडवून आणणे गरजेचे असते.
कोल्हा: अहो पण महाराज, आपण जे आपल्या राज्यात प्रजेला देऊ शकलो नव्हतो ते आजचा राजा कसा देणार?
सिंह: ते त्याचं त्यानं ठरवायचं. तलावाची डावी बाजू सकाळच्या वेळी आणि
उजवी बाजू संध्याकाळी आमच्यासाठी राखीव हवी म्हणजे हवीच.
कोल्हा: महाराज, यामुळे इतर
प्राण्यांवर अन्याय होईल, त्यांना
प्रकाशाच्या वेळी...
सिंह: कित्येक प्राण्यांसाठी तलाव आधी पासून राखीव ठेवण्यात आला आहे, आम्हालाही आमची जागा हवी ..बस!
कोल्हा: पण त्यांना ती राखीव जागा
ते निशाचर असल्याने किंवा इतर प्राण्यांपेक्षा गरीब असल्याने दिलेली आहे, जर आता आणखी जागा राखीव
देण्यात आली तर इतर प्राण्यांनी काय करायचं?
सिंह: दुसऱ्या जंगलात जायचं.
कोल्हा: अहो महाराज, दुसऱ्या जंगलात आपल्या जंगलासाठी ठेवलेली राखीव जागा पुरेशी पडणार नाही.
सिंह: त्यांनीही मागावं मग आरक्षण... एकदाच काय ते करुन टाकावे तुकडे.
खोटं खोटं हा माझा तो माझा खेळ खेळण्यात अर्थच काय आहे. आणि आता तुमची गाऱ्हाणी
गाऊन झाली असली तर निघा तुम्ही, नक्की मोर्चात सामील होणार की नाही तेही ठरवा.
कोल्हा: कसला मोर्चा?
सिंह: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचा खरा अर्थ शोधणार
आहोत आम्ही. जे मागू ते मिळायलाच हवं.
कोल्हा: नाही मिळालं तर...
सिंह: आम्ही उगीच राजे नव्हतो प्रधानजी,
प्रजेला एका घासत गिळंकृत करण्याची शक्ती आहे आमच्याकडे.
कोल्हा: महाराज, कल्पनाही
करावीशी वाटत नाही. युगानुयुगे आपण सर्व प्राणिमात्र एकाच तलावा काठी नांदतो आहोत.
आरक्षण कुठे हो आवश्यक होतं तेव्हा?
तोच तलाव, तेच पाणी, तोच आपलेपणा
आणि तीच भूतदया. मग आता अचानक काय झालं?
प्राणीसंख्या वाढून तर किती काळ लोटला. आपण राज्य केलं
तेव्हाही हीच समस्या आली, पण तेव्हा
आपण म्हणालात, सबुरीने
घ्या. पण आता खुद्द आपणच वणवा भडकला जाईल याची आखणी करताहात...
सिंह: प्रधानजी, शब्दांचे खेळ
बंद करा. मागणी साधी सरळ आहे. आम्हाला आरक्षण हवे आहे. ते मिळाले तर बेहत्तर नाही
तर...
कोल्हा: ही आपली बिनबुडाची मागणी मान्य केली नाही; तर काय महाराज, आपल्याच प्राण्यांशी जंगलात
युद्ध, आपल्याच
प्राण्यांची हानी आणि त्याबद्दल मिळालेलं कायमच आरक्षण...ते घेऊन करणार काय? राज्य? कोणावर? या हाडा मांसाच्या ढीगा वर
की वाळलेल्या पाला पाचोळ्या वर?
सिंह: प्रधानजी, तुम्ही
भावनिक वगैरे कशाला होतंय? राजकारण आहे
हे, तिथे भावनेला
जागा नाही. पण प्रत्येक जागेला भावना आहे आणि तिला ती जिवंत ठेवायला हवी. त्याला
कोण काय करणार? तुम्ही
पुन्हा प्रधानजी म्हणून मिरवणार तेव्हा खुश व्हा,
शिकार खाण्याकडे लक्ष द्या,
कशी मिळवली त्याकडे नको... कसं हं!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा