वाढदिवसाचा सोहोळा

वाढदिवस साजरे करणे ही काही फारशी नवी गोष्ट नाही. शाळेत असताना म्हणजे चांगलं मोठ्ठं झाल्यावर ही टुम आयुष्यात आलेली आठवते. शाळेतल्या मैत्रिणी घरी येणार मग गप्पा, दंगा, भेटवस्तू आणि खाणे अशी ती संध्याकाळ वाया ? घालवायची म्हणजे वाढ दिवस साजरा करणे. हळूहळू कॉलेजमध्ये गेल्यावर वाढदिवस म्हणजे काही विशेष नाही अशी जाणीव होऊन हे वाढदिवस सुटसुटीत होत गेले, किमान आई साठी तरी, कारण उगीच गोंधळ, जेवणावळी बंद झाल्या. मित्र मैत्रिणी आपणहून घरी येत, वाटलं तर काही भेट देत, घरात असेल तर त्यांना खाऊ दिला जाई हे आणि इतकंच कौतुक, पुढे घरात आईने ओवाळणे ते लग्न झाल्यावर फोन वरूनच नमस्कार करणे इथपर्यंतचा प्रवास आठवला.
आता मुलगा शाळेत जाऊ लागलेला आहे, त्याला मित्र मंडळी आहेत आणि ती आताशे वर्षानुवर्षे समान आहेत, सगळेच माझे मित्र ते मला कुणीच मित्र नको आहेत यातून बाहेर येऊन आई आपण .... या या मित्रांना बर्थडे ला बोलवूया अशी आमची गाडी पोहोचलेली आहे. तर असा आमचा बर्थडे ठरला. पण नेमकी त्याच दिवशी तिमाही परीक्षा, मग काय सोईने हा बर्थडे पुढे ढकलण्यात आला, आणि शनिवार सुट्टी म्हणून तेव्हा ठरला. आता या मुलांना खाऊ काय आवडेल ते त्यांना रिटर्न गिफ्ट काय द्यायचं असं सगळं ठरविण्यात तिमाहीचा अभ्यास झाला.
केक घरीच करावा आणि पावभाजी करायला सोपी आणि मुलांना आवडेल म्हणून बेत ठरला. पुस्तकं आणि पेन्सिली रिटर्न गिफ्ट आणून झाल्या. ठरल्याप्रमाणे मुले आली. आणि जरा वेळ खेळून झाल्यावर खाण्याच्या पदार्थांकडे लक्ष गेले. घरी केक केलेला आहे, तर मग त्यात टूटी फ्रुटी नाही नं, केक मैद्याचा आहे, रव्याचा आहे की कणकेचा यावर त्यांची चर्चा झाली, हो मुलांची वये पाच ते सात... पण त्यांना या सगळ्याबद्दल भरपूर माहिती होती, माहिती कसली ज्ञानच, मग प्रत्येकाने स्वत:च्या पथ्यानुसार वगळावगळी करून केक खाल्ला. पाव भाजी मधला ब्रेड पोटात जाऊन त्याचा गोळा होतो, मैद्याने माणूस जाड होतो, त्यामुळे पचन होत नाही आणि पाव भाजी मधील भाज्या फ्लॉवर, बटाटा ई. या नवर फवारे मारलेले असून त्या वातूळ असल्याने त्या खाऊ नयेत यावर त्याचं एकमत झालं. गेलाबाजार वेफर्स सगळ्यांना आवडतात म्हणून मोजून चार घातलेले असताना त्यांच्या घशाची काळजी घेण्यासाठी त्यांनी त्यातील दोन खाऊन आमच्यावर दया केली. पाणी उकळलेले असल्याने व ते तेव्हाही गरम असल्याने त्याबाबत शंका नव्हती. बाकी वाढदिवस या प्रकारात इंटरेस्ट घेण्यासारखं उरतं काय तर या मित्राकडील खेळ, ते खेळण्यात काही वेळ गेला आणि दिलेलं रिटर्न गिफ्ट ‘हे रिटन गिफ्ट आहे?’ असा तुच्छ प्रश्न विचारून ही मंडळी घरी निघाली.

वाढदिवसाच्या दिवशी आपण मोठे होतो असे म्हटले जाते, ते खरेच असं वाटून गेलं आणि मुलाच्या वाढदिवसाने माझ्या ज्ञानात प्रचंड वाढ झाली. यापुढे या असल्या पार्ट्या सोशलायझेशनच्या नावाखाली कराव्या की करू नयेत हा प्रश्न आहेच, आताची पिढी भलतीच हुश्शार वगैरे आहे म्हणावं तर हे खात नाही, ते पचत नाही, ते चावत नाही च्या जगात बिचाऱ्यांना हुशार असण्यावाचून पर्याय नाही. अति सुरक्षित, अति काळजीपोटी हे लहान आजीआजोबा मोठे होऊन कसे होतील याबद्दल विचार करूनही पोटात गोळा येतोय. वत्सा तुजप्रद कल्याण असो च्या चालीवर आशीर्वाद द्यावे एवढंच काय ते आपल्या हाती.

टिप्पण्या