तें दिवस

अगदी दिवाळीची सुटी सुरु होताना चार पुस्तकं हाती आलेली आहेत. आणि तीही विजय तेंडुलकर यांची. यापूर्वी तेंडूलकरांची नाटकं वाचलेली आहेत आणि सादर होताना पाहिलेली आहेत. ते नुसतं पाहता किंवा वाचताना निर्माण होणारी अस्वस्थता आणि अनंत प्रश्न यांत कितीतरी वेळ घालवलेला आहे. या लेखकाबद्दल आदर वाटतोच पण त्यांच्याबद्दल फार प्रश्न पडतात. का असं लिहिलं असेल यांनी? कितीकदा तर असंही वाटतं, आपल्यासारख्या पांढरपेशा माणसाला चौकटीबाहेर जे समाजात इतकं प्रखर काही घडत असत ते दिसतं तरी कि नाही, कि आपण हे काही मी बघितलं नाही म्हणून कानाडोळा करतो? माहित नाही, पण या प्रश्नांचा उत्तराकडे जाणारा प्रवास कदाचित या पुस्तकांच्या मार्गातून सहज घडू शकेल...बघूया माहिती नाही
तर हे तें दिवस... राजहंस प्रकाशनचं हे पुस्तक, अगदी सुरुवातीला मुखपृष्ठावर एक फुटकी पाटी आणि एक खडूचा तुकडा, एक गोणपाटाचा तुकडा.. किती बोलकं चित्र.. या चित्रानेही प्रश्न निर्माण केलेच... तेंडूलकर आणि प्रश्न हे एकदमच येतात..माझा समज पक्का. त्यानंतर आतल्या बाजूला तेंच्या डायरीतील लिखाण छापलेलं आहे, त्यांच्या लेखनातील वाक्य, खुणा, खाडाखोडी हे सारं त्यात आहे,.. अर्थात ते बघून पण प्रश्न पडलेच.. यानंतर मात्र दिलीप माजगावकर यांचं तें ना लिहिलेलं एक सुरेख पत्र. त्यात त्यांचं एका त्रयस्थाने, प्रकाशकाने आणि मित्राने केलेलं वर्णन वाचायला मिळालं आणि तेंची ओळख झाली, अर्थात नवी. काही प्रश्नांची उत्तरंही मिळाली बरं का त्यात.
एखादा लेखक जेव्हा इतकं खरं स्पष्ट, वास्तववादी लिहितो तेव्हा त्याच्या डोक्यात नक्की काय चालू असेल? त्याच्या आयुष्याची सुरुवात कशी झाली असेल? त्याला अनुभव कसे आले असतील? त्याच्यावर आईवडील आणि आजूबाजूच्या समाजाने काय संस्कार केले असतील? त्याला मित्र मैत्रिणी असतील का? हे न असे कित्येक प्रश्न समोर होतेच.... त्यातील काहींची उत्तरंही तें च्या बालपणीचं जे त्यांनी वर्णन केलंय त्यात मिळाली. काही बाबतीत मतं अगदी ठाम पण काही बाबतीत कुठलीच मतं नव्हती आणि आजकाल पिअर प्रेशर म्हणतो तसं ते वाहात गेले असतील याचं आश्चर्यही वाटलं. पुस्तकाचं वाचन आणि चित्रपटाचा आस्वाद घेण्याची आवड किंवा त्याचं निरीक्षण करण्याची ओढ का न कशी निर्माण झाली हे वाचायला मिळालं, त्यांची शाळा, आणि शिक्षक याबद्दलची गणित आणि त्यांच्या काळात आजूबाजूला असलेल्या परिस्थितीमुळे होणारी फरफट यातून नक्की काय ठेवायचं आणि काय गाळायचं हे तरी कसं समजलं असेल कोणास ठाऊक? लिखाण करून मनाची वाट मोकळा करणारा मनस्वी लेखक असा एक टप्पा आपल्याला वाचायला मिळतो, त्यांच्या पुढच्या कारकिर्दीबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि पुस्तक थांबतं...

पुन्हा एकदा अनंत प्रश्न सोबत ठेऊन आपण वेगळ्याच कोशात काही काळ तरी रवाना केले जातो....

टिप्पण्या