१९६७-६८ साली तेंडूलकरांनी ‘माणूस’ या साप्ताहिकासाठी
लिहिलेले हे सदर. कला क्षेत्रातील काही घटना, ठिकाणे आणि व्यक्ती यांवर लिहिलेले
हे ललित लेखन. एखादी घटना अनुभवून तिचा आपल्या मनावर पडलेला प्रभाव, त्यामुळे
निर्माण झालेली मनोवस्था म्हणूया किंवा त्या त्या घटनेबाबत, व्यक्ती वा थेट अगदी
चित्रपटाबाबत त्या त्या वेळी काय वाटलं हे यातून आपल्याला वाचायला मिळतं.
तेंडुलकरांचं ललित लेखन त्यांच्यातल्या डोळस नाटककराचं दर्शन घडवल्यावाचून राहात
नाही. कारण सर्वसामान्य माणूस एखादी घटना ज्या पद्धतीने बघेल, अनुभवेल आणि लेखनातून मांडेल तितकंसं सरळ हे लिखाण नाही. त्याला स्पष्ट विचारांचे आणि धारदार
निरीक्षणाचे अनेक पदर आहेत.

अर्थातच दुसऱ्याच लेखात लेखकाची लेखणी भावून जाते. आणि मग सर्कसवाले,
कलकत्त्याच्याच्या एका बारचं वर्णन, हंसाबाई वाडकर याचं व्यक्तीचित्रण असे एकसे एक लेख वाचयला मिळतात. मॅक्स कॉली या हिप्नॉटिस्ट वर लिहिलेला लेख वाचताना ही लबाडी
म्हणायची कि हुशारी हा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. बाबा आमटे यांच्यावर
लिहिलेला लेख त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाचं जसं दर्शन घडवतो तसंच
आजूबाजूच्या खोट्या छानछोकीचं दर्शनही टिपतो. विजया मेहता या एका उगवत्या नटीचं
व्यक्तीचित्रण तर सुलोचनाबाईंच्या चित्रपटसृष्टीतील ठशाचं वर्णन तेंच्या शब्दातून
वाचायला मिळतं. मध्येच एखादा डॉग शो सारखा लेख म्हणजे प्राण्यांचं खेळणं केलेल्या
माणसावर उपहासाच्या डागण्या. नाटककाराच्या शोधात सहा पत्रे, इथे ओशाळला मृत्यू, आणि
कम अँड गो या नाटकांची रसग्रहणं नाटकाकडे कसं बघावं हे शिकवून जातात. एवम्
इंद्रजीत चे परीक्षणही असेच, नाटकाकडे कसं बघावं किंवा नाटक कसं बघावं शिकवणारं.
लॉरेल आणि हार्डी बद्दलचा लेख फारच सुंदर, आपण सर्वांनी अनुभवलेला आणि त्यामुळे
आणखी जवळचा वाटणारा. सारा आकाश, खामोशी, रोमान्स फॉर अ ब्युगुल, सगीना महातो
यासारखी त्यांनी लिहिलेली चित्रपट परीक्षणं वाचून हे चित्रपट बघितल्याचा आनंद घेता
येतो. अखेरचा लेख आहे टू सर विथ लव्ह या चित्रपटाबाबत, मात्र हा लेख फक्त वाचून
थांबता येत नाही. थेट जाऊन आपण सिडने पोइशिए चा सर्च करतो आणि तो चित्रपट पाहून या
अभिनेत्याला आणि त्याच्या चित्रपटांना भेटवलंत म्हणून तें चे कायमचे आभारी राहतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा