20,000 Leagues Under the Sea

ज्युल्स गॅब्रीयल व्हर्न या फ्रेंच लेखकाने अठराव्या शतकात लिहिलेली ही विज्ञानकथा. याने विज्ञान कथेच्या विश्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली असं म्हटलं जातं. अर्थातच, अशाप्रकारच्या कथांच्या वाचक वर्ग हा प्रामुख्याने असतो तो कुमार वयोगट. अकरा-बाराव्या वर्षी साहसी, धाडसी, शोध-विज्ञान कथा आपल्याला वाचायला नक्की आवडतात. ट्वेंटी लीग्स अंडर द सी, जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ, किंवा अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज यासारखी त्याने लिहिलेली पुस्तके आजही क्लासिक म्हणून ओळखली जातात.
ट्वेंटी लीग्स अंडर द सी ही अशीच एक विज्ञान कथा आहे, एका  निसर्गवादी डॉ. आरोनॉक्सची ही अनुभव कथा आहे. कथाभाग थोडक्यात असा, 1866 च्या सुमारास समुद्र जवळच्या वसाहतीत आणि इतर जगभरात एका समुद्री राक्षसाबद्दल अफवा पसरली होती. कित्येक जहाजे या राक्षसाने गिळंकृत केल्याचे म्हटले जात होते. त्याच काळात डॉ. आरोनॉक्स या अमेरिकेत अभ्यास करून या प्रकारच्या राक्षसावर भाष्य करणाऱ्या शास्त्रज्ञाला, या राक्षसाचा शोध घेण्यासाठी पाठविल्या जाणाऱ्या एका अमेरिकन जहाजावर बोलावलं गेलं. हा डॉ. अगदी उत्साहाने तयार झाला. त्याने त्याच्या एका साथीदाराला कन्सेलला बरोबर घेतले; त्याचबरोबर नेड लँड हा एक उत्तम भालेपटु (मुख्यत: देवमाश्याची भाल्याने शिकार करणारा) हा ही त्याच्याबरोबर जहाजावर होता.
काही महिन्यांच्या अखंड शोधानंतरही त्यांना हा राक्षस दिसू शकला नाही, परंतु एक दिवस नेडला हा विचित्र प्राणी दिसला त्याने भला फेकला, तो त्या प्राण्याला लागला, तो प्राणी आणि जहाज यांची धडक झाली, डॉ., नेड आणि कन्सेल पाण्यात पडले, ते पोहत जाऊन जेव्हा त्या प्राण्याजवळ पोहोचले तेव्हा त्यांना कळून आले की, हा कुठलाही प्राणी नाही तर ही एक धातूची बोट आहे. त्या बोटीवरील माणसांनी त्यांना बोटीत नेले व एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवले. काही दिवसांनी त्यांची त्या बोटीच्या कप्तानाशी ओळख झाली, त्याचे नाव होते नेमो, आणि त्याच्या या बोटीचे नाव होते नॉटीलस. नेमोने या तिघांनी त्याच्या या समुद्री युद्धातील युद्धकैदी म्हणून पकडून ठेवले व त्यांना पुन्हा जमिनीवर जाता येणार नाही असे जाहीर केले. परंतु नॉटीलसवर मात्र त्यांना काही कमी पडणार नाही अशी खात्रीही दिली. यामुळे नेड वैतागला पण डॉ. मात्र समुद्राखाली राहून समुद्राचा अभ्यास करायचा या विचाराने हरखून गेला.
नेमोने या डॉ. आरोनॉक्सला बोटीची ओळख करून दिलीच, पण सोबत समुद्रातील अनेक रहस्ये उलगडून दाखवली. यात त्याच्या बोटीचं रोजचं राहणीमान सांभाळलं कसं जातं, समुद्री प्राणीजीवन कसं असतं, समुद्रातील कोळशाच्या खाणीतून ही बोट इंधन कशी मिळवते अशा कितीक गोष्टी त्यांना बघायला मिळतात. पण एकीकडे पुन्हा जमिनीकडे जाण्याचीओढ सतावत असते, नेड तर ही बोट सोडून पळून जाण्याचे रोज नवे नियोजन करीत असतो. एकदा तर ही बोट बुडता बुडता वाचते. नेमो सकट सर्व जण संकटाला अगदी जवळून पाहतात. या अनुभवानंतर मात्र नेड, डॉ. आणि कन्सील ही बोट सोडून पळून जाण्यात यशस्वी होतात. जेव्हा ते किनाऱ्याला लागतात आणि डॉ. गेल्या काही दिवसात त्याने कप्तान नेमो सह जवळपास वीस हजार लीग्स इतका प्रवास केला असल्याचं पाहतो तेव्हा त्याला कप्तान नेमो, बोट नॉटीलस आणि त्यासंदर्भातील कित्येक रोमांचक घटना मनात येतात, आता नेमो आणि त्याची ती विलक्षण बोट कुठे असेल याची कल्पना नसली तरीही तो सुखरूप असावा असं तो चिंततो आणि ही कथा समाप्त होते.
समुद्र हा मुळातच अनेक रहस्य त्याच्या उराशी बाळगून असतो, या विधानाला सार्थ ठरवणारी ही कथा. तशी साधी सरळ, यात काही युद्ध, मारामाऱ्या, चोरी, दंगल काही होत नाही. यात आपल्याला मनापासून अभ्यास करणारा डॉ. आरोनॉक्स, जीवाला जीव देणारा कन्सील, जिद्दीचा नेड आणि पृथ्वीवरच्या माणसांना सोडून निघून दूर जाऊ पाहणारा, हुशार, द्रष्टा, प्रसंगी हळवा, खराखुरा दिग्दर्शक कप्तान नेमो ही पात्र भेटतात. ती आपल्याला साधे साधे निर्णय कसे घेताना होणारी चलबिचल दाखवून देतात. आल्या प्रसंगाला धाडसाने सामोरं जाताना दिसून येतात. या पात्रांना भेटण्यासाठी आणि त्यांचे अनुभव वाचण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला हवं. मोठ्या वाचकांना कदाचित हे कंटाळवाणं वाटू शकतं पण विज्ञानकथेची आवड असणाऱ्याने हे पुस्तक आवर्जून वाचावं.

टिप्पण्या