
चित्रपटात पु.लं आणि सुनिताबाई यांची भूमिका अनुक्रमे सागर देशमुख आणि इरावती
हर्षे यांनी साकारली आहे. दोघांनीही त्यांच्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत, आणि त्यामुळे पु.लंच्या प्रतिमेला कुठेही धक्का बसू दिला
नाही. इतर कलाकारांनीही त्यांना मोलाची साथ दिली आहे.
पु.लंच्या व्यक्ती चित्रणात त्यांनी लिहिलेले शब्द किंवा त्यांच्या कथाकथनात
त्यांनी वाचलेले शब्द यांची मनावर इतकी पकड आहे की, त्यामुळे परिच्छेदाचे संवाद करताना वाढवले गेलेले संवाद कित्येकदा
कानाला खटकतात, पण असह्य होत नाहीत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेले दोन-तीन कौटुंबिक
प्रसंग साधारणपणे आहे मनोहर तरी हे पुस्तक ज्यांनी वाचलेले नाही त्यांना अचंब्यात
टाकू शकतात. पण या प्रसंगांनी चित्रपटाचा आलेख जराही वर खाली होत नाही. त्यात
शेवटी एक भीमसेन जोशी, कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे मैफल
आहे, ती ऐकताना नव्हे बघताना आजूबाजूला, अरे हा हा अजय पूरकर,
हं स्वानंद किरकिरे आहे का हा.. तिसरा माहित नाहीये, हेच अधिक ऐकू येत होतं, यात
ही जवळपास दहा मिनिटे चालू राहणारी मैफल चित्रपटाचा भाग म्हणून न घेता शेवटी
नावांबरोबर घेतली असती तरीही चाललं असत, चित्रपटात एकतरी गाणं हवं या हट्टापायी ती
घेतल्याचा भास झाला. बाकी नसल्या तरी चालल्या असत्या अशा इतर अनेक भानगडी चित्रपटात
दिसून येतात.. परंतु त्यावर काय लिहावे...आपण सुज्ञ असा.
भरीत भर अजून कथानक अर्धवटच असल्याने दुसरं तिकीटही काढावं लागणार, एवढा मोठा माणूस,
त्यांचं कार्य एका चित्रपटाच्या वेळात मावण्यासारखा नाही,
त्यामुळे एडिटिंग धड करता आलेलं नाही असं वाटलं तर मनाची समजूतही काढलेली आहे.
याव्यतिरिक्त, मला पण पु.लं व्हायचं आहे, असं म्हणत आमचे चिरंजीव एक तांब्या, एक मफलर, एक पुस्तक घेऊन
कथाकथन करायला टेबलपाशी उभे राहून ‘अरे ए गटण्या...’ वगैरे खेळ म्हणून खेळत आहेत.
त्यामुळे पु.लंची आठवण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल इतपत या चित्रपटाचं यश आहे असं
म्हणूया.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा