आहे मनोहर तरी

8 मार्च, जागतिक महिला दिवस, हातात ‘आहे मनोहर तरी’ पुस्तकाचं शेवटचं पान आहे. नामी दिवस मिळाला आहे या पुस्तकाविषयी लिहायला. तशी या पुस्तकाची आणि माझी फार जुनी ओळख आहे. परंतु ती ओळख जरा नकारात्मकच असल्याने मी कधी या पुस्तकाकडे कधी वळले नाही. पुस्तक जेव्हा बाजारात आलं, तेव्हा सुनीताबाईनी लिहिलंय यापेक्षा पुलंच्या बायकोने लिहिलेलं पुस्तक म्हणून आधी गर्दी लोटली. माझ्या आजीनेही उत्साहाने पुस्तक वाचायला घेतलं. एकटाकी वाचून काढलं. बाकी कुठलीही पुस्तकं वाचली, की आजीला चैनच पडत नसे, ती मुलांना, आम्हा नातींना पत्रातून, फोन करून म्हणा, काही ना काही त्याविषयी बोलणार, काय आवडलं सांगणार, अगदीच राहवलं नाही तर चक्क तीच पुस्तक विकत घेऊन थेट पाठवून देणार की, हे नक्की वाचा.
या पुस्तकाच्या नशिबात तसं काहीच नव्हतं. आजी, कसं गं लिहिलंय सुनीताबाईंनी? यावर आंबट्ट चेहरा करून, वाचायची काही गरज नाही अशासारखी प्रीतीक्रिया मिळाली. आता सार्वजनिक क्षेत्रात इतकं असामान्य काम-लेखन करणाऱ्या व्यक्तीची बायको होण्याचं नशीब मिळालंय तर ही बाई त्याच्यासाठी सारखं चहापाणीच कसं करावं लागलं हयाचंच कौतुक करतेय. डाळिंबाच्या दाण्याचं निमित्त झालं न या बाईने चक्क मुल न होऊ देण्याचा निर्णय घ्यावा. रोजच्या स्वयंपाकाचं कोणी कौतुक करतच नाही. तेव्हा आजीकडून आलेले हे शब्द ऐकून त्या वाटेला कधी गेलेच नाही. कदाचित तेव्हा वाचलं असतं तर पटलंही असतं तिचं. आता मात्र आजीसारख्या कर्तृत्ववान बाईला या पुस्तकातील स्पष्टपणा, खरेपणा आणि वास्तवाची चीड का यावी? ते नकोसं का वाटलं असेल? कदाचित काही गोष्टी बदलणार नाहीत म्हणून तिने स्वीकारल्या असतील म्हणून असेल....
काय आहे या पुस्तकात? आत्मचरित्र? आयुष्याचा जमाखर्च? पु.लं. माझ्याशी असे का वागले म्हणून रडारड? असं काही नाही. सुनीताबाई म्हणतात तशीच ही साठा प्रश्नांची कहाणी आहे. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी जी वळणं लाभली, त्या त्या वेळी त्यांना भेटलेल्या व्यक्ती, त्यांचा सहवास आणि त्यांच्याबद्दल सुनीताबाईंना मनात आलेल्या भावना यांची ही एक उजळणी आहे. स्वत:चे निर्णय स्वत: घेऊन ठेचकाळणाऱ्या आणि पुन्हा ताकदीने उभे राहताना त्यांना जे काही अनुभव आले त्याचं त्या तटस्थपणे वर्णन करतात. कोणावरही संशय घेत नाहीत, त्या त्या व्यक्तींच्या वर्तनाचा दोष त्यांना देत नाहीत, कितीकदा परिस्थिती, घरादाराची परंपरा, संस्कृती, आणि संस्कार यावरच त्या येऊन थांबतात. कितीकदा तर विचारात रमून जातात आणि त्यांची लेखणी कॅनव्हासवर नवनवीन चित्रे रेखाटावी तशी रंग भरू लागते. बौद्धिक आणि वैचारिकाच्या प्रांतातून ती सहज विहार करते आणि वास्तवात येऊन धाडकन आदळते. त्या प्रश्न करतात तशीच उत्तरेही देतात. पण त्या उत्तरांना आपण वाचक म्हणून मान्य करावं याचं बंधन घालत नाहीत. त्यांच्या उत्तरांनाही वयाचं भान असतं, आत्ता मला असं वाटतंय पण काही काळानंतर काय वाटेल कोण जाणे असही त्या सहज म्हणतात. चुकलेल्या गोष्टी कबूलही करतात आणि चुकीच्या माणसांचा समाचारही घेतात.
त्यांचे अनुभव कोणत्याही सर्वसामान्य बायकोचे असावे तसेच आहेत. कोणत्याही कौतुकाची अपेक्षा न करता राब राब राबणाऱ्याच एका य:कश्चित स्त्रीचंच त्या प्रतिनिधित्व करतात पण फक्त तेवढंच करून त्या थांबत नाहीत, तमाम पुरुषप्रधान संस्कृतीचे झेंडे डोलवणाऱ्या आणि सुसंस्कृतपणाच्या पडद्याआड स्वत:चा घाबरटपणा लपविणाऱ्या समस्त जनमानसाला एक निखळ स्वतंत्र विचारांची तलवार घेऊन बेनकाबही करतात.
राष्ट्रसेवा दलाचं काम करताना जीवाची बाजी लावयला तयार झालेली, सगळे करतात म्हणून ‘लग्न करायचं असल्या बुळचट गोष्टीला न मानता प्रेमाला प्राधान्य देऊ बघणारी, त्याच आस्थेने घरात लोणी कढवून तूप बनवणारी, नवऱ्याला लेखनासाठी प्रोत्साहन देत त्याच्या यशाचे मार्ग आखण्यात आनंद मानणारी, स्वत:च्या पदरी आलेले लोकांचे रोष आनंदाने पचवणारी ही मनस्वी बाई नक्कीच वाचायला हवी. या पुस्तकाने पु.लंच्या प्रतिमेला धक्का पोहोचावा इतकी त्यांची प्रतिमा तकलादू नाही आणि सुनीताबाई तसं कुठे म्हणतही नाहीत. 
सुनीताबाईंचे काही दशकांपूर्वीचे अनुभव आजही तसेच आहेत. आजची स्त्री जर स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ पाहत असेल तर तिला कोण साथ करतो? कोणीही नाही. तिने स्कॉलरशिप मिळवली, नोकरी मिळवली, पैसा मिळवला, तिला फॉर व्हीलर चालवता येऊ लागली हे सगळं करत करत तिने स्वयंपाकही केला, पोरंही वाढवली सगळं केलं तरीही त्याचं विशेष असं काहीच नसतं कारण तिच्यासाठी संस्कृतीने काही ग्रह योजून ठेवलेले असतात. तिचं नशीबच न बोलता न मागता काम करीत राहावं यासाठीच असतं, काही म्हणजे काही बदललेलं नसतं... अहो अगदी आजची एकविसावं का काहीतरी शकत नं हे, त्यातली सासू सुनेला मासिक पाळीसाठी वापरलेले पॅडस घरातल्या कचरापेटीत न टाकता बाहेर टाकून ये सांगते, सासरे घराच्या बाहेरून जे आलेले असतात त्यांनी स्वत:चं वागणं आणि राहणं बदलायचं असतं असं सांगतात, आजकालच्या आयांचीही मुलं लग्न करतात पण आई-वडलांच्या घरात कपाटाला स्टीकर लावण्याचीही त्यांना परवानगी घ्यावी लागते...हीच असेल का ती संस्कृती? ...आज हा महिला दिन, त्यात हे पुस्तक त्यामुळे हे सगळे विचार गर्दी करत असतीलही कदाचित... पण सुनीताबाई म्हणतात तशी ही संस्कृती खरं तर खूप मौल्यवान गोष्ट असणार, पण ती प्रत्येक सामन्याला कुठली हो पेलायला... क्वचित एखाद्याला पेलेल पण बाकीचे जे काही करतात ते म्हणजे ही संस्कृती लादली गेल्याने जगावे लागणारे ढोंग...
तस्मात्, जागतिक महिला दिन येत राहणार... आणि जात राहणार... आज सुनीताबाईंची आठवण निघालीच आहे तर त्यांना आवडणारी पद्मा गोळे यांची ही एक कविता, आवर्जून वाचावी आणि ऐकावी अशी,
चाफ्याच्या झाडा...चाफ्याच्या झाडा...
पानात, मनात खुपतंय नां...
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय, कळतंय नां...
चाफ्याच्या झाडा...चाफ्याच्या झाडा...
हसून सजवायचं ठरलंय नां,
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये नां...



टिप्पण्या