२०१९ च्या निवडणुका आल्या...

सकाळ आला, मोदी-राहुल गांधी यांचे चेहरे दिसले, पानभर निवडणुकांचे टप्पे पाहिले, जुन्या आठवणी जाग्या झाल्या, मतदार संघ, याद्या, उमेदवारांची नावे, त्यांची चिन्हं, त्यांची पत्रके, कर्णे लावून हिंडणाऱ्या रिक्षा, जाहिरातीचे बोर्ड अंगभर बाळगलेले टेम्पो, उमेदवारांच्या चिन्हांचे झेंडे/पट्टे/ दुपट्टे (त्याला काय म्हणायचं कोणास ठाऊक) गळ्यात बांधून हिंडणारे रिकामटेकडे कार्यकर्ते अचानक कामाला लागलेले आठवले, तुमच्या मतदार संघातून जिंकून दिलंत, याही वेळी नाव लक्षात असू द्या म्हणणारे एकदाच बघितलेले नेते आठवले, वेगळ्याच यादीत आलेलं नाव आठवलं, चुकीचा छापलेला पत्ता आठवला, नाव माहित नाही पण चिन्ह माहिती आहे म्हणून दिलेलं मत पण आठवलं, रंगवलेल्या बोटांचे फोटो आठवले, नावच नाही म्हणून चिडून लिहिलेली मैत्रिणीची पोस्ट आठवली, निवडणुकांचा भूत-भविष्य काळ आठवला, मोदींची लाट का काय ती आठवली, मग ती लाट मोदींची की मिडियाची याचा वाद आठवला, जिंकल्यानंतरच्या आणा-भाका आठवल्या, नोटांच्या रांगा, सी एस टी चा फुल फॉर्ममधला चाबूक, सर्जिकल स्ट्राईक आठवला, रागा चा नरेगा फियास्को आठवला, स्मृती इराणी आणि निर्मला सीतारामन यांची भाषणं आठवली, बापरे..बरंच काही घडून गेलं की या काळात, बरंच बरं...
परवा एकजण त्याने उन्हाळ्याच्या सुट्टीचे बुकिंग केल्याचं सांगत होता, म्हटलं अरे मतदानाची तारीख जाहीर होऊ दे मग कर बुकिंग. तर म्हणे, काही काय? तिकीट महाग होतील. आज पेपर बघितल्यावर विचार आला म्हटलं; लेका, आता २०२४ पर्यंत सरकार, महागाई, पेट्रोलचे भाव, कुठलंही धोरण, बंदी, कर, इतकंच काय स्कॅम, रेड टेप आणि काहीही याबद्दल थोबडातून अवाक्षर काढशील तर बघ!!!
अहो, शाळेत वार्षिक परीक्षेचं वेळापत्रक आलेलं नाही अजून आणि लोकांचा सिंगापूरच्या स्विमिंग पुलच्या गर्दीबद्दल विचार चालू आहे, नाही, नको कोण म्हणतंय पण तेवढा दिवस द्या देशसाठी तेवढंच जन्माच्या कर्मी नोंदवा, शिव्या द्यायचा अधिकार मिळवायला मत द्यायचं कर्तव्य तरी बजावा.
कॅशच घेतो असे म्हणणारे किराणा भुसार दुकानदार सोकावलेत, कॅश भाडी घेणारे आणि देणारे भाडेकरू आणि घरमालक लबाडी करतच आहेत, राखीव जागा बहुतेक आता शेकडेवारी च्या सुद्धा परे जाणारेत, गावाकडून लोक शहराकडेच येत राहणारेत, गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच राहणारे, स्वच्छता आणि प्लॅस्टिकबंदी सोईनी पाळली जाणारे, डायमंड घेऊन लोक पळून जाणारेत, जागांचे, संख्यांचे, बँकांचे घोळ होणारेत, हे सगळं असलं तरी याला नागरिक नाही सरकारच जबाबदार असणारे...कारण सरकारला नावं ठेवणं सोप्पं नसतं का, म्हणून!

तेव्हा आपण या देशाचे जबाबदार नागरिक आहोत म्हणून जर थोडंफार करण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर किमान मतदान करा. यादीत नाव आलं का हे मतदानाच्या दिवशी बघण्यापेक्षा आजच पाहा, उमेदवाराचं नाव, चिन्ह वगैरे माहिती करून घ्या, जाता जाता इतर सुशिक्षित अजाण बालकांना निवडणूक साक्षर करता आलं तर उससे बेहत्तर!! “माझं नं आईनी यादीत नावच नाही दिलं मी अठरा वर्षे होऊन तीन वर्ष झाली तरी” अशा सर्व युवक-युवतींनो एव्हाना तुमचे दुधाचे दात पडले असतील, तर आता स्वत:च जाऊन मतदानासाठी लागणारा अर्ज भरा आणि कच्च्या यादीत तरी सामील व्हा. हम भारतीय है असलं म्हणण्याचा तेवढा एकच दिवस तुमच्या हातात आहे हे लक्षात घ्या. राहून राहिलेले अनिवासी भारतीय, तुम्हीही भारतातील घडामोडींवर सोशल मिडियामार्फत प्रचार-प्रसार करण्यात मागे नाही तेव्हा तुमचंही मत शिंपडा; ही नम्र विनंती.

टिप्पण्या