नोव्हेंबर १९९२ ते मे १९९३ या काळात 'रामप्रहर' हे सदर विजय तेंडूलकर यांनी लोकसत्ता दैनिकासाठी लिहिले. या पुस्तकात त्यातील निवडक ललित लेखांचे संकलन केलेले आहे. रातराणी आणि कोवळी उन्हे यातील ललित आणि रामप्रहर मधील ललित यात प्रचंड तफावत दिसून आली. एखाद्या पत्रकाराच्या संवेदनशील मनाने अनुभवलेले वास्तव यात प्रत्ययास आले. कधी कधी ते पचले, कधी कधी वाचून पटले तरीही ते मान्य करण्याचा धीर झाला नाही.
या सदराला पार्श्वभूमीही तशीच आहे राम-जन्मभूमीचा गदारोळ, मुंबईतील बॉम्बस्फोट, हिंदू-मुस्लीम यांच्यातील तणाव आणि या सगळ्यात संतापलेला, भरडलेला, गोंधळलेला, दिशाहीन झालेला सामान्य माणूस. हिंदूची आणि मुस्लिमांची बाजू तटस्थपणे समोर ठेवून नक्की घडलं काय आणि कशासाठी, मुद्दाम घडवलं गेलं की ते घडणारच होतं या साऱ्याचा उहापोह ते करतात अगदी सध्या सरळ सर्वांना कळू शकेल अशा शब्दात. पक्षसमर्पित नसल्यामुळे त्यांच्या लेखणीची धार जराही बोथट होत नाही किंवा तिला शब्दांची चणचण जाणवत नाही. धर्माची भीड न बाळगता ते त्याचा समाचार घेतात. या अनुषंगाने येणारे काही लेख अंगावर काटा उभा करतात, बॉम्बस्फोटातून वाचलेला एक जण आपल्या घरी सुखरूप असल्याचं सांगतानाचा प्रसंग, राजकारण्यांची सामुदायिक आणि चक्री उपोषणे,
यापेक्षा वेगळे विषय तर वाचायला मिळालेच. निरनिराळे बंद, अभिप्राय, पुतळे, पूर्वजांच्या गोष्टी किंवा आदिमानवाच्या काळाचं वर्णन, आत्महत्येचे गूढ, सौ.वीणा सहस्रबुद्धे यांच्या मैफिलीचे अनुभवकथन, जीवनाचं एकमेव सत्य: मृत्यू, किंचित-कर्ण, स्वामी कृष्णानंद यांच्या आत्मचरित्रातून एका ब्रह्मचार्याचे अनुभव, हे आणि असे कितीक लेख त्यांच्या वेगळ्या विषयाबरोबरच वेगळा विचारही घेऊन आले आणि त्यांनी बंद पडलेल्या मनाची दारं किमान किलकिली तरी उघडी केली.
तेंडुलकरांचं हे सदर वाचून तेव्हाच्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत फारसा काहीच बदल घडलेला नाही असंही जाणवून गेलं, हिस्ट्री रिपीट्स म्हणतात तसं असेल कदाचित, त्यांचे ते विचार आजही लागू पडतील. तोच हाहाकार, तोच गोंधळ, तिच धर्मांधता आजही आहे पण तेंडुलकर म्हणतात तशीच या सगळ्याबरोबर जगण्याची सवय होऊ लागते...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा