टीनटीन एक भन्नाट दोस्त
विसाव्या शतकात
जॉर्ज रेमी या सुप्रसिद्ध बेल्जियन कार्टूनिस्ट ने ‘हर्ज’ या टोपण नावाने लिहिलेली
‘द ऍडव्हेंचर्स ऑफ टीनटीन’ ही पुस्तकांची मालिका हा लहान मुलांसाठीचा एक
विलक्षण खजिना आहे. ही पुस्तके
चित्रकथेच्या स्वरुपात असल्यामुळे मुलांना वाचायला नक्कीच आवडतील अशी आहेत.
या कथांचा हिरो
अर्थात सूत्रधार आहे ‘टीनटीन’, अगदी फास्टर फेणे, ह्कलबेरी फिन यांची आठवण करून देणारा हा
अतिशय स्मार्ट, हुशार, धाडसी असा हा गुप्तहेर टीनटीन
भल्याभल्यांना चांगला धडा शिकवताना दिसून येतो. प्रत्येक पुस्तक एकेका एकेक कथाभाग
उलगडून दाखवते आणि आपण ते हातात घेतल्यापासून संपे पर्यंत वाचून झाल्याशिवाय
बाजूला ठेवूच शकत नाही.
यामध्ये
टीनटीनच्या साथीला सदैव असणारा स्नोई हा कुत्रा हे सुद्धा या कथांचा अविभाज्य घटक
बनलेलं आहे. त्याचबरोबर कॅप्टन हॅडॉक हा एक इरसाल बोट कप्तान आणि प्रोफेसर कॅल्क्यूलस
हा हाफसेंट माईंडेड पण हुशार शास्त्रज्ञ कित्येक कथांचे मूलाधारही आहेत आणि त्या
कथांना तडीस नेण्यासाठी टीनटीनची सच्ची साथ देणारे त्याचे जिवलग मित्रही. थॉमसन
आणि थॉम्पसन ही शासकीय गुप्तहेरांची एक जोडगोळी कथेतील विनोदाला कारण ठरते.
यातील विविध
पुस्तके त्यांच्या कथांमधून आपल्याला अनेक देशांची ओळख करवून देतात. त्या देशातील
शहरे,
रस्ते, गाड्या, लोकांची वागणूक, पोशाख
आणि काही वैशिष्ट्यपूर्ण स्थळे आपल्याला भेटून जातात. परंतु त्याचं मध्यम असतं,
टीनटीनचं एक नवीन आव्हान, एखादा गुन्हेगार, एखादी बेकायदेशीर मालाची आयात-निर्यात करणारी टोळी,
एखाद्या नव्या जागेचा शोध, खजिन्याचा शोध, वैज्ञानिक शोधाची होऊ घातलेली चोरी ते अगदी पळवून नेले गेलेला राजपुत्र
किंवा एखादा उद्योगपती.
प्रत्येक कथा
भन्नाट वेगाने पुढे पुढे जाते आणि आपण ‘आता पुढे काय होणार’ असं म्हणत ते लहान
मुलाचं पुस्तक त्यांच्या इतकंच मन लावून वाचत राहतो. त्यातली कितीतरी माणसं आपल्या
लक्षात राहत नाहीत कदाचित पण मुलं मात्र “अग, तो नाही का ‘टीनटीन इन अमेरिका’
मध्ये त्याला भेटलेला, तो परत येतो या पुस्तकात, मग त्याला चांगलाच पकडलाय टीनटीननी”, अशी
आठवण नक्की करून देऊ शकतात.
24-25
पुस्तकांचा हा संच वाचत असताना आपणही काही काळ लहान होऊ शकतो हा भाग झालाच पण
किमान आपल्या मुलांच्या संभाषणात ‘हिला काहीच माहिती नाहीये, जाऊ दे रे’ अशी वेळ न येऊ
देण्यापासून तरी वाचू शकतो. त्यामुळे मुलांनीच नाही तर मोठ्यांनीही जरूर वाचाव्या
अशा या साहसकथा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा