गीतेच्या गाभाऱ्यात



भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय पाठांतर, ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली तुम्ही निदान वाचा तरी असं आजीनी आवर्जून सांगितलेलं, टिळक जयंती निमित्त शाळेत झालेल्या निबंध स्पर्धेत लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला हे न विसरता लिहायचं म्हणून लक्षात ठेवलेलं ही आणि इतकीच काय ती गीतेविषयीची माहिती.
या असल्या पायावर बाल होणार आहे तर बाळकृष्णावर लिहिलेलं आवर्जून वाच, असं सांगितलेलं आठवतंय त्याच बरोबर ‘गीतेच्या गाभाऱ्यात’ ही राम केशव रानडे यांनी लिहिलेली दोन पुस्तके मिळाल्याचंही आठवतं. निमित्त म्हणीन का होईना, बघू तरी काय म्हणते गीता असं म्हणत ‘गीतेच्या गाभाऱ्यात’ या पुस्तकाला हात लावला.
ही पुस्तके रा.के.रानडे यांनी पत्रांच्या स्वरुपात लिहिली आहेत. गीतेतील प्रत्येक अध्याय आणि त्याचा अर्थ असं या पुस्तकाचं स्वरूप अजिबात नाही. या पत्रात संवाद आहे रानडे पती-पत्नींचा. पत्नीने गीतेचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे आणि त्या वाचनातून, ऐकलेल्या कीर्तनातून, आजूबाजूच्या समाजाच्या चिंतनातून तिला अनंत प्रश्न पडतात आणि ती ते प्रश्न तिच्या नवऱ्याला विचारते. रा.के. रानडे स्वत: संस्कृत, गणिताचे अभ्यासक, लौकिकार्थाने न्यायाधीश आणि आवडीने श्रीकृष्णाचे, गीतेचे भक्त, गीताविषयक व्याख्याने देणारे म्हणून प्रसिद्ध. ते स्वत: नवरा म्हणून त्यांच्या पत्नीच्या प्रत्येक प्रश्नाचं त्यांच्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतात.
या उत्तरांत कितीक अध्यायांचा सारांश, कृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद होत असतानाची
त्यांची मनस्थिती, प्रत्यक्ष महाभारतातील कितीक गोष्टी यांचा ते संदर्भ देतात. त्याच बरोबर ज्ञानेश्वरी, गीता रहस्य यांचा तौलनिक अभ्यास दाखवत त्यांच्यातील भेदाभेद स्पष्ट करतात. तुकाराम रामदास, एकनाथ, नामदेव यांच्या संतसाहित्यालाही स्पर्श करून जातात. त्यांची ओळख करून देतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या उत्तरांतून भारता बाहेरील कितीतरी विचारवंतांचे गीतेबद्दलचे आणि धर्माविषयीचे विचार ते आवर्जून उर्धृत करतात. त्यामुळेच की काय त्यांची गीतेवरची भक्ती किंवा श्रद्धा आंधळी न वाटता डोळस आणि अभ्यासपूर्ण वाटते.
एखाद्या भक्ताच्या तोंडून त्याच्या दैवताचा गोडवा आळवताना ऐकणं हा एक हृदय अनुभव असतो. गीतेच्या गाभाऱ्यात वाचताना रा.के रानडे यांची कृष्णभक्ती पदोपदी आपल्याला भारावून टाकते.
अध्यात्मातलं काही कळत नाही त्यामुळे वाचावंसं वाटत नाही, खरोखरी युद्ध चालू असताना श्रीकृष्ण अर्जुनाला गीता कसा काय सांगत बसला असेल असल्या आपल्या भौतिक प्रश्नांना कर्म, भक्ती आणि योगाची सांगड घालत आनंद मिळवत जगण्याचं तत्वज्ञान रा.के.रानडे सहज सोप्या भाषेत सांगून जातात.

टिप्पण्या