इरावती कर्वे
यांचं ‘युगान्त’ हा आहे महाभारत कथेवरील शोधग्रंथ. महाभारतातील विविध पर्व कथा
उलगडत जाते ती या कथेतील पात्रांच्या मदतीने. इरावती कर्वे या कथेतील रूढार्थाने प्रसिद्ध
झालेल्या कितीक पात्रांची काहीशी नवी ओळख करून देतात आणि त्याबद्दलचे संदर्भ आणि
त्याचं तटस्थपणे केलेलं विश्लेषण सादर करतात.
प्रत्येक पात्राबद्दलची त्यांची भूमिका थोडक्यात सांगायची तर थोडसं कठीणच आहे पण तरीही
प्रयत्न करते. ‘शेवटचा प्रयत्न’ हा लेख आहे भीष्मांविषयी. भीष्माला एका शापित जीवाचं दुर्दैवी
जीवन जगावं लागलं. स्वत:च्या प्रतिज्ञेच्या दडपणाने आणि असामान्य त्यागाने त्याने
आजन्म आपल्या कुळाला जपण्याचा प्रयत्न केला. परंतु धर्माची बाजू घ्यायची असूनही
केवळ राज्याच्या सिंहासनाचा मान ठेवीत जगावे लागले. त्याच्याच अर्ध्या कुलाचा नाश
डोळ्यादेखत पाहावा लागला. इतर शुरांसारखे मरणही त्याच्या वाट्याला आले नाही.
त्यामुळे आदरणीय भीष्माने आयुष्यात साध्य काय केले हा प्रश्नच राहिला. दुसरे
प्रकरण ‘गांधारी’. अंधळ्या नवऱ्याला स्वीकारूनच नव्हे तर त्याच्यासाठी स्वत:ही पूर्ण
आयुष्य डोळ्यावर पट्टी बांधून घालवणारी ही राजकन्या ही आणि अशी प्रतिमा आपण मनात
ठेवून गांधारी वाचू लागतो. पण तेव्हाच इरावतीबाई आपल्यासमोर वेगळेच विचार ठेवतात
ते म्हणजे ‘तिच्या अशा वागण्याने उघड्या डोळ्यांनी अंधळ्या नवऱ्याला न स्वीकारणारी
आणि स्वत:च्या पुत्राचे मुखही बघू न इच्छिणारी ही पतिव्रता नक्की कोणत्या
मनस्थितीत जगली असेल?’ ‘कुंती’ ची व्यक्तिरेखा ही अशीच. लग्नापूर्वीच एका मुलाला
जन्म दिलेली, लग्नाच्या पतीला शापापासून वाचविण्यासाठी त्याच्यापासून दूर राहणारी परंतु
राज्याला राजा मिळावा यासाठी तीन महापुरुषांना जन्म देणारी, सवतीच्या
मुलांना काकणभर अधिक प्रेमाने वाढवणारी, मुलांना अपमान विसरू नका युद्धाला सामोरे
जा म्हणून बजावणारी खरीखुरी क्षत्रिय निश्चीयी आई.
‘पिता-पुत्र’ या
लेखात आपण भेटतो तो आपल्या मनातील शंकेला. धर्म राजा आणि विदुर या जोडीला. संपूर्ण
महाभारतात विदुराचे युधिष्ठिराविषयीचे अथवा धर्माबद्दलचे प्रेम लपून राहत नाही.
पांडवांना सुरुवातीला दुरून आणि नंतर स्पष्टपणे पाठींबा द्यायला तो मागे-पुढे पाहत
नाही. युधिष्ठीर यक्षधर्माचा मुलगा म्हणून त्याला धर्मज असे नाव पडले, तसेच विदुर
हा एक शापित यमधर्म होता तर मग धर्म हा विदुराचा मुलगा तर नसेल अशी शंका उत्पन्न
होऊ शकते व त्यांच्या स्वभावगुणांमुळे या विचाराला
पुष्टीही मिळते. ‘दौपदी’ ही खरे पाहता या महाभारताची नायिका. पाच भावांत वाटणी
केली गेलेली, भरल्या दरबारात पतीनेच द्यूतात गमावली गेलेली,
कृष्णावर भक्तिभावाने माया करणारी, धृतराष्ट्राने तीन वर देऊ
केल्यावरही त्यातील दोनच वर मागून प्रतिष्ठा मिळवणारी ही स्त्री युद्धासाठी अपमानाचा
बदला घेण्यासाठी तिच्या नवर्यांना तयार करते मात्र युद्धाच्या अखेरी साऱ्या
उपपांडवांच्या हत्येला सामोरी जाते. पूर्ण आयुष्य ती एकापाठोपाठ एक संकट झेलत
राहते. ‘द्रोण आणि अश्वत्थामा’ ही ब्राह्मण पितापुत्रांची एकमेव जोडी क्षत्रिय की
अक्षत्रिय या पेचात टाकते. सेनापती बनून त्वेषाने लढत राहणारा द्रोण आणि डोहात
लपून बसलेल्या दुर्योधनालाही बाहेर ये आणि पांडवांशी लढ म्हणून आग्रह करणारा
अश्वत्थामा मोह आणि नाशाची कारणं दाखवून देतात. मी सूतपुत्र नाही तर मी कोण? या
प्रश्नाचं उत्तर क्षत्रिय आहे असं मिळविण्यासाठी ‘कर्णाने’ त्याचं अख्खं आयुष्य
घालवलं. जेव्हा उत्तर मिळालं तेव्हा ते स्वीकारून युद्ध टाळता येणार होतं तरीही मैत्रीच्या
ऋणापोटी तेही गमावलं. भर युद्धात रथाचं चाक जमिनीत अडकून बसलं तरीही अर्जुनाने बाण
रोखला नाही तेव्हा कर्णाने त्याच्याकडून धर्मयुद्धाची अपेक्षा केली. तेव्हा मात्र श्रीकृष्णाने
त्याला कृपाने पूर्वी विचारलेला प्रश्न तू कोण पुन्हा विचारला आणि कर्ण त्याच
प्रश्नाचा उलगडा न करता नाश पावला. साक्षात कृष्ण वासुदेव प्रेम करतो, सूड उगवतो, आनंदाने नाचतो पांडवांसाठी युद्धात
उतरतो, दु:खाने हळहळतो परंतु कोणातही गुंतत नाही. तो नुसता
गीता सांगत नाही तर गीता प्रत्यक्ष जगतो. महाभारताबरोबर द्वापारयुगाचा अंत झाला
खरा, त्यातील काही गोष्टी नष्ट झाल्या परंतु काही गोष्टी
आजही घडताना दिसून येतात. मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी
जीवन विफलच असते असेही काही वेळा वाटून जाते, कितीतरी गोष्टी मनाला चटका लावून
जातात पण प्रत्येक व्यक्तीच्या जगण्याची अटळ निष्ठा दिसत राहते.
महाभारतातील
कथेला तटस्थपणे वाचायला शिकवणारं हे पुस्तक जरूर जरूर वाचावं असंच.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा