करो ना करो म्हणत म्हणत गुढीपाडव्याचा मुहूर्त पुढे जात जात २६ जानेवारीवर पोहोचला आणि आमची नवी बिल्डिंग प्रजासत्ताक झाली. जुन्या मालकांनी नव्या घराच्या चकचकीत किल्ल्या आणि घरावरच्या नावाच्या पाटीचा फोटो तात्काळ व्हॉट्स अपला आणि मंडळी जुन्याच्या नवलाईत रमून गेली.
पूर्वी अगदी मुख्य रस्त्यावर असणारी आमची बिल्डिंग सर्वांची लाडकी होती. स्वारगेट, स्टेशन, डेक्कन, टिळक रोड असल्या सगळ्याच्या टप्प्यात म्हणून असो, थेट महामार्गावर म्हणून असो, बसचे अनेक थांबे होते म्हणून असो...जाता येता घरावरून जाणं होई म्हणून असो...लोकांचं पटकन येणं जाणं होत असे. ती आहे अजून त्याच जागी पण आता बिल्डरच्या कमर्शियल कॉम्प्लेक्स च्या मागे दडून गेलेली आहे. अजून पहिल्या पावसाची चव ही न चाखल्याने चांगलीच खुलूनही दिसतेय. बाकी बिल्डरच्या त्या कॉम्प्लेक्सचं घोंगडं अजून भिजत पडलेलं आहे त्यामुळे त्याच्या सामानाचे झोपाळे वरून खाली कधी उडी घेतील सांगता येत नाही. त्याचा सिक्युरिटी गार्ड...क्या कहां जाना हैं… कौनसा फ्लोअर असे प्रश्नही विचारतो… घाबरवत नाहीये… येताना कडेकडेने आणि गाडीचे पार्किंग मिळण्यासाठी त्याच्या प्रश्नांच्या सरबत्तीवर मात करून यायचं… अरे माझंच घर आहे लेका… असले लाड नाहीत… तो बिचारा ड्युटी करतो त्याची...असो तर उतारावरून आत आलातकी नवं कोरं गेट दिसेल. आत सिक्युरिटी कॅमेरा पण आहे… वर्कींग … म्हणजे काय कौतुक आहे…. कुठे आमची आधीची बिल्डिंग आणि कुठे ही मिस नूतन
जिना आहे पण तो काही वापरावा लागत नाही, आता लिफ्ट… हवं तिथे नेणारी. जिन्याने जाताना काही वेळा हवेनकोसे कितीक चेहरे, परिस्थिती, प्रसंग टाळण्यासाठी हा बेस्ट मार्ग आहे नां … जुन्याशी तुलना केली जातेय बाकी काही नाही…. पूर्वी कसं नेमक्या रिझल्ट लागल्याच्या दिवशी कोणी आज्जीबाई भेटणार, किल्ली घरात विसरली की ताबडतोब घरात बोलवून फोनाफोन्या करण्याची ताकीद मिळणार, पॅसेजची बंद ट्यूब, गळका नळ, पान-तंबाखूच्या पिचकाऱ्या, हे सगळं गायब… धोशा एकच लाईट गेले तर काय..किंवा मेंटेनन्स मेज्जर वाढणार…पण स्वच्छतेसाठी मेंटेनन्स आणि आयुष्याला वेगात गाठण्यासाठी लिफ्ट हवीच…
हं येते मुद्द्यावर, एरिया किती मिळाला वाढवून… काही विशेष नाही. लहान घराचं मोठ्ठ होतं तेव्हा त्या वाढलेल्या एरियाचं कौतुक. आधी घर मोठंच होतं त्यामुळे त्यात वाढलेले पाच पन्नास स्क्वे.फूट कुठे विरघळून गेले असतील कळलंही नाही. पण डिझाईन मात्र पूर्णतः बदललेलं आहे.
पूर्वीची खोल्यांची आगगाडी आता जरा बेतशुद्ध पद्धतीने आखीव रेखीव झाली आहे. अमेरिकन स्टाईल किचन आणि ड्रॉईंग रूम समोरासमोर आहेत. त्यामुळे किचनमध्ये काम करणाऱ्या बाईला आपण केवळ तेवढंच काम करण्यासाठी या घरात राहात नाही याची जाणीव होऊ शकते. पूर्व पश्चिम दोन प्रशस्त गॅलऱ्या आहेत ज्या भलताच भाव खाऊन जातात. ग्रह, तारे आणि वारे यांची सहज संगत त्यांना लाभलेली आहे. पण ...अर्थात तिथेही पण आहेच का… हो मग काय… या गॅलरीवर माणसांच्याही आधी अतिशय हुशार अशा कबुतर पक्ष्याने स्वतःचा हक्क प्रस्थापित करू इच्छिल्याने त्या गॅलऱ्यांना जाळी लावली लागलेली आहे…त्या निमित्ताने भेटलेला इसम “मी रोज २५ जाळ्या लावतो’’ असे सांगतो तेव्हा हा काही सुपरहिरो पेक्षा कमी नाही असंच वाटून जातं. उंच उंच इमारतींवरून झुल्याने खाली येऊन या जाळ्या बसवणारा हा पिजन मॅन थोरच आहे म्हणायचा. पुढच्या काळात बिल्डर पिजन नेट सकट घरं देणार किंवा कबुतर हा पक्षी लयास जावा यासाठी बैठका बसणार.छान छान घरात जुनं सामान कशाला? म्हणून नव्या फर्निचरने खोल्या सजवल्या आहेत. सोस नाही पण सोय म्हणून असलेल्या चार सहा गोष्टींनी घराला घरपण आलं आहे.
त्यामध्ये आयकियातून आलेला लेगो लावण्याचा अनुभव काही निराळाच. तर… सगळं एकदम तय्यार आहे. घराला आता फक्त गरज आहे ती माणसांची. जुन्याच पत्त्यावर पूर्वीसारखी माणसांची रीघ लागली की घर खूष. जेवणावळी ऐवजी कोरडा फोटो, कडकडून शुभेच्छा देण्याऐवजी वा: चा मेसेज, समोर जाऊन उभं राहण्याऐवजी शॉर्ट अँड स्वीट फोन कॉल, ग्रेट चा अंगठा सेंड करण्याच्या करोनोत्तर काळात घराचं कोडकौतुक कसं आणि किती लवकर करता येईल याची वाट बघणंच फक्त हातात आहे. एकदाचा करोना इतिहासाच्या पुस्तकात सिलॅबसारुढ होवो आणि आपल्याला वर्तमानाचा यथेच्छ उपभोग घेता येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!!
एकदम मस्त. तुझ्या डोळ्यांनी घरभर फिरवून आणलंस त्यामुळे प्रत्यक्ष पाहण्याची उत्कंठा वाढवली.निदान फोटो ज टाक.दुधाची तहान ताकावर.
उत्तर द्याहटवाहो हो नक्की पाठवते... प्रत्यक्ष भेट होईल लवकरच... बघुया...
उत्तर द्याहटवा