करोना काळात आजूबाजूच्या बातम्या कशा तर... रूग्ण संख्या, हॉस्पिटलमध्ये असणारे बेड्स, मिळाल्या न मिळालेल्या लसी, कुणाचं वाढलेलं तापमान, कमी झालेला प्राणवायू, नक्की हवे की नको त्या गोष्टींची न करता आलेली यादी, गुगल वर आपोआप येण्याइतका... लॉ टाईप केलं की येणारा लॉक डाऊन… आणि असं बरंच काही… घराच्या आतल्या भिंती, सोफे, भांडी, कपडे आणि माणसं यांना येणारा कंटाळायुक्त सॅनिटायझरचा वास, तर घराबाहेर पॅसेज, लिफ्ट, गाड्या, रस्ता न् त्यावरून फिरत असलेल्या मास्क मागे दडलेल्या माणसांचा भीती आणि शंकायुक्त श्वास… अशा नकारात्मक पार्श्वभूमीला छेद देत मधुकोषच्या एका व्हॉट्स ॲप गटावर ऑडिओ स्पर्धेसाठीचा साधा सरळ सर्वसमावेशक सकारात्मक मेसेज येतो काय आणि मग त्या स्पर्धेत सहभागी झालेली मंडळी त्या दिशेने प्रवास करतात काय... सगळेच किती आशादायक…
खरंतर व्हॉट्स ॲपवर शेकडो मेसेजेस येतात रोज..त्यातले किती न वाचता ढकलले जातात, त्यात करोना किंवा इतर जाहिराती सोडून एखादा मेसेज वाचाय-बघायला मिळायचा म्हणजे विरळाच! पण अचानक त्या दिवशी ह्या ऑडियो स्पर्धेचा मेसेज आला... बरं त्या स्पर्धेला ना कुठली अट … ना वयाची, ना तांत्रिक बाबींची, ना फॉर्म भराभरी, ना चेहऱ्याची रंगरंगोटी… सरळ सोपा प्रत्येकीला सहभागी होता येईल असा उपक्रम… स्पर्धा जाहीर केल्यापासून नाव नोंदणी, ते निकाल या उपक्रमाची आखणी मात्र अगदी चोख आणि आटोपशीर.
माझ्यापुरतं बघायचं तर नाव देऊया हे वाटून गेलं अगदी मेसेज वाचल्यावर लगेचच… पण मग, माझी घरात बसून त्रस्त झालेली चिल्लीपिल्ली ...त्यांना सांभाळून करता येईल का रेकोर्डिंग… असा प्रश्न पडला. अखेर "उद्या सकाळनंतर नाव नोंदणी बंद करीत आहोत" असा मेसेज आला… नाटकाची आवड अस्वस्थ केल्याशिवाय राहात नाही हेच खरं … या मेसेज नंतर मी नाव दिलं… नाव नोंदवलंही गेलं आणि सोबत रेकॉर्डिंग साठी काही सूचनाही आल्या… टेक्नो सॅव्ही वगैरे असलो तरी मूलभूत चुका हमखास होऊ शकतात त्यामुळे ती यादी वाचून फारच बरं वाटलं.
स्पर्धेला नाव दिल्यावर प्रश्न सुटणार नसतो तर तो आणखी गहन होणार असतो… परीक्षेचा पेपर अजून यायचाच होता… एकीकडे कुठला असेल उतारा… जीभ वळणार तरी का धड असेही अनेक प्रश्न मनात नाचून गेले. मग ठरलेल्या वेळी स्वगताचे उतारे जाहीर झाले. एक वयाने तरुण गटासाठी आणि दुसरा मनाने तरुण गटासाठी… एक सून आणि एक आई … कोणती भूमिका निवडायची? बरं दोन्ही विषय अगदी सकारात्मक पद्धतीने आणि संयत हाताळलेले, भाषाही अगदी सहज...कुठे शब्दबंबाळ उपमा आणि यमक छंदांची गर्दी नाही… विचार आणि विषय अगदी स्पष्ट ...दोन्ही विषय भावले. नोकरी सोडण्यासाठी तयार नसलेली सून तिच्या कमाईतून गावातल्या चार जणींचं शिक्षण करतेय आणि त्यासाठी आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने तिची बाजू मांडतेय ही कल्पना मनापासून आवडली. आणि तो विषय नक्की करून टाकला.
आत्ताशी कुठे विषय निवडला… अजून वाचन... मग रेकॉर्डिंग... लैच काम बाकी होतं. वेळ काय जातच असतो … विषयाची निवड कळवण्याचा शेवटचा दिवस उद्या कि आमचा विषय आदल्या दिवशी ठरला… त्यापुढे काळ काम वेगाचं गणित न केलेलंच बरं. पण मग लगेच पहिलं वाचन मात्र करून बघितलं… दबक्या आवाजात… आणि जाणीव झाली कि कॉलेजचे दिवस जाऊन युगं लोटली आहेत… दिसली स्पर्धा कि द्या नाव भसकन असा आगाऊपणा करायचा काळ गेला… असो... तर थोडक्यात काय... प्रिंट आउट काढणे, अधोरेखन करणे यासारखा अभ्यास करायला हवा त्याशिवाय नुसतं वाचून बिचून काही होणार नाही हे कळलं, मग काय तेही बाळंतपण एकदाचं पार पडलं, तर दुसऱ्या दिवशी परांजप्यांनी स्लॅब चा घाट घातलेला… मग घराच्या ऍकॉस्टिकची परीक्षा घेत घेत दोन वेळा मोबाईलवर रेकॉर्डिंग केलं… वाह म्हणत ऐकायला घेतलं तर आमच्या धाकट्या चिरंजीवांचा “फुन फुन’’ असा टाहो त्यात रेकॉर्ड झालेला… त्यातून "तीन मिनिटाचा ऑडियो करायला एवढा वेळ" असा ताशेरा मारायला मोठा लेक पुढे सरसावला … माझ्या घरगुती रेकॉर्डिंग चे बारा वाजले… आपण काही हे पाठवू शकत नाही असं वाटायला लागलं... करोना आल्यापासून पांढरं निशाण दाखवायची लाज वाटेनाशी झालेली आहे त्यामुळे तात्काळ पराभव... शरणागती आणि पुढच्या कामाला सुरुवात…. गेला कि हो... तो ही दिवस … दिवस कसला आठवडाभर नुसताच गेला… कृतीशून्य…. मग नंतर आज रेकॉर्ड करूनच थांबायचं म्हणत एकदाचा ऑडियो तयार केला… थोड्याशा चुका स्वत:च कानाडोळा करून मग म्हटलं त्याला जरा नटवू… एक म्युझिक पीस त्याला जोडायला घेतला तर त्यानेही मारामारी करायला लावलीच तो भाग वेगळा… माझ्या ऑडियो पेक्षा म्युझिकचा आवाज मोठा… तो काही केल्या कमी व्हायला तयार नव्हता … शेवटी न ऐकणारी कार्टी आई-वडलांना जश्शी च्या तश्शी सांभाळावी लागतात तस्सा तो माझ्या ऑडियोला चिकटवून टाकला आणि एकदाचा सुटकेचा निःश्वासही टाकला… बरं सध्या ठरवणं आणि करणं हे वेळेचं गणित अतोनात चुकलेलं आहे… त्यामुळे मग नुसताच रेकॉर्ड केलेला पीस डाऊनलोड्स मध्ये जाऊन पडलेला होता… जेव्हा काही वेळानी तो पाठवण्यासाठी फाईल उघडल्या तेव्हा ५ फाईल तयार वडगाव बुद्रुक १, वडगाव बुद्रुक २, …. ते ५ … आता त्या शहाण्या ऍपला हे डिफॉल्ट नाव का बरं घ्यावंसं वाटावं आणि मी कुठल्याच पीसचं रिनेम का न करावं हे मुद्दे अलाहिदा… पुन्हा ऐकणं आलं … पुन्हा ऐकलं ना कि कुठलाच आवडत नाही आणि ती फेज फार गंभीर असते… करायचं आणि मोकळं व्हायचं तसलं नाही… पुन्हा पुन्हा करता येणं हा शापच असतो खरं तर ... असो तर मूळ मुद्द्याला येते… ऑडिओ रेकॉर्ड केला आणि हो तो वेळेत फॉरवर्डला सुद्धा… तुम्ही म्हणाल एवढंसं ते काम त्याला केवढी पाल्हाळ लावली … पण गेल्या वर्षभरात गेलेला हा इतका उत्साही काळ… थोडी गंमत, मज्जा, आणि शिकवणही देऊन गेला… नेहमीचाच मोकळा वेळ यकश्चित व्हायरसला नाव ठेवत घालवण्यापेक्षा नवीन अनुभव देऊन गेला…
याचं संपूर्ण श्रेय अर्थातच बगवाडकरकाका काकू तुम्हा दोघांचं, तुम्ही ही कल्पना प्रत्यक्षात आणून आम्हाला त्या प्रवासाचा अनुभव दिलात याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद!!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा