डास मर्दन

फार पूर्वीच्या काळी म्हणे गॉड ऑफ क्रीएशन ची मुलगी इव्ह आणि गॉड ऑफ डिस्ट्रक्शनचा  मुलगा ऍडम यांच सगळं काही चांगलं चाललं होतं … म्हणजे साधरणतः गोष्टीच्या शेवटी “अँड दे लीव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर’’ कि काय तसलं .. हो पण सुरुवातीपासूनच…  मग झालं इव्ह गेली माहेरपणाला वडिलांकडे, चार दिवस राहिली आणि निघताना म्हणाली “हे काय बाबा, तुम्ही मला काहीच दिलं नाही’’, ते म्हणाले, “तुझ्याकडे सगळंच तर आहे… मी काय देऊ तुला?”… तर तेवढ्यात या पोरीला एक बॉक्स दिसला म्हणे… विचारलं लगेच.. घेऊ का? ..एकुलती एक मुलगी वडील बिचारे हो म्हणाले… ''पण''… येस्स अशा सगळ्या गोष्टीत पण असतो…. पण शिवाय गोष्ट कशी तयार होणार… हं तर … “पण हा बॉक्स कधीही उघडू नकोस…” त्या बॉक्समधून एकसारखा गुणगुण आवाज येत असे... एखादी गोष्ट करू नका म्हटली की ती कर्तोच कि नी आपण.. तस्सच या बिचाऱ्या कुतुहलानी पार बेचैन झालेल्या इव्ह ने न राहवून हा बॉक्स उघडला… तर त्यातून कीटक बाहेर पडले म्हणे… समोर हा ऍडम सफरचंद खात बसलेला तर त्याच्या सफरचंदात चक्क आळी… इव्ह आणि ऍडम एकदम शॉक्ड ….  तोवर कीटक नव्हतेच नं जगात …. (आता इथे एखादा ऑ वगैरेचा स्मायली बरं का) तर त्या बॉक्सला पँडोराज बॉक्स असं म्हणून ओळखलं जातं... इसापनीती आणि अकबर-बिरबल यांच्या जशा असलेल्या-नसलेल्या अंनत कथा वाचतो नं आपण त्यातलीच ही एक…  

पण मुळात मुद्दा हा नाहीचे… या पँडोराच्या बॉक्समधले सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडलेले डास बहुधा आम्हालाच भेटायला आल्यासारखे सदैव दर्शन देतात, त्यामुळे न राहवून एका पद्याचं विडंबन केलंय...  

डास मर्दन …   

टाळ्याही वाजल्या, रॅकेटी कडाडल्या, दशदिशा थरारल्या 

उघड्या बाल्कनी समोर मत्त डास दिसला, मत्त डास दिसला… 

वाखुल्या दाखवित कुर्निसात देउनि, 

प्रलयकाळ तो सूक्ष्म डास निघे तेथुनि,

उगारुनि रॅकेट भिंत, दार, खुर्च्या हादरल्या 

उघड्या बाल्कनीतुनि मत्त डास घुसला, मत्त डास घुसला…

डास चालला पुढे, अफाट सैन्य मागुति,

डास, डासी, पोरडास ही रांग लांब लांबली,

डासधाड ही निघे निद्रानाश करावया, 

डायनिंग टेबलासमोर मत्त डास पाहिला, मत्त डास पाहिला… 

मधुकोष फेज थ्री माय महान्मंगला,

राऊळात अधमडास मित्रांसह पोहोचला,

रॅकेट  भंगली मनात दुकानदार हासला,

स्टडी टेबलावरी मत्त डास बैसला, मत्त डास बैसला… 

सावधान हो सखे वैऱ्याची रात्र ही,

डास येतसे समीप साध तूच वेळ ही, 

घेऊनि नवी रॅकेट तोषवी भगवतीला,

दिवसरात्र छळुनी मत्त डास वाचला, मत्त डास वाचला… 

श्रवणी तप्त तैलसे मालकास वृत्त पोहोचले,

रक्त तापले उरी न रॅकेट सिद्ध जाहली,

मर्दण्यास डासांसी मालक सिद्ध जाहला,

उघड्या बाल्कनीसमीप मत्त डास मारिलाsssss, मत्त डास मारिलाssss… 

 

मंडळी, पँडोरावर चिडू नका, तिनेच पाठवला का काय करोना पण… असेल बुवा … पण

सगळ्यात शेवटी  याच बॉक्स मधून होप फेरी नावाची एक आशेची परी सुद्धा बाहेर पडली …

देव करो न कुठलीही परिस्थिती आली तरी ही परीराणी आपल्या पाठीशी राहो इतकंच…  

 

ता.क. 

इथे या पद्याची किंवा पद्याशी निगडित कोणाचीही मानहानी करायचा हेतू नाहीये.. कळावे ..लोभ असावा हि विनंती  

बांधकामकर्त्यांना पाणी का साठवलंयत इतकं… साफ करा ते… असा प्रश्न किंवा सल्लाही द्यावयाचा नाहीये

अजून घरात राहायलाही न आलेल्या शेजाऱ्यांचा दुःस्वासही तर त्याहून करायचा नाहीये

हेतू फक्त आणि फक्त डासांचा खात्मा इतका आणि इतका च…


टिप्पण्या