स्लॉट, व्हॅक्सिनेशन आणि ब्रह्मगाठ


नोव्हेंबर ते मार्च सारं काही सुरळीत बसवायच्या नादात दुसरी लाट आली आणि बरोबर लॉक डाऊन सुद्धा आला. एप्रिल बंदोबस्तात गेला. जरा परत सगळं मोकळं होईल म्हणतोय तोच मे चे १५ दिवसही लॉक डाऊन घोषित झाला. अवसान गळून पडलं आणि जैसे थे परिस्थिती समोर आली. लाटेचा जोरही होताच तसा पण त्याचबरोबर व्हॅक्सिनेशनचं प्रमाणही वाढत होतं.

टप्प्याटप्प्याने मंडळी व्हॅक्सिनेशन घेत होती. तेवढ्यात ‘मला पण मला पण’ म्हणणारी लहान मुलं घाई करतात काहीसं तसंच १८-४४ वयोगटाचं व्हॅक्सिनेशन १ मे पासून होणार असल्याचं जाहीर झाला. मला मातोश्रींचा ताबडतोब मेसेज आला. रजिस्टर करा, त्याच्या तारखा वेळा हे…  ते सगळं… हे आई-वडील नं खरंच सगळे मेसेजेस वाचतात … पूर्ण… त्यावर रिप्लायणे आणि फॉरवर्डणे हा भाग तर वेगळाच… मुद्दा तो नाहीये… तर एकदा २४, मग २८… असं करत करत एक दिवस खरंच मी नाव रजिस्टर केलं. बिचारा तो आरोग्य सेतू एवढ्या अचानक आरूढ झालेल्या प्रजेमुळे कोलमडायच्या बेतात होता. पण कोविन ने त्याला सांभाळून घेतलं आणि मे च्या पहिल्या आठवड्यापासूनच लोकांचे व्हॅक्सिनेटेड प्रोफाईल पिक्स झळकायला लागले. काही जण 'लेट्स सी इफ इट वर्क्स विदाउट फोटो' असंही म्हणत होते. एकुणात काय लोकांना अपॉइंटमेंट स्लॉट बुक करता येत होते इतकंच नाही तर व्हॅक्सिन सुद्धा मिळत होते. मी आपलं एखाद दोन वेळा प्रयत्न करून तो नाद सोडून दिलेला होता. मग कोण म्हणाले रात्री ठीक ८ वाजता हे हॉस्पिटल, सकाळी ठीक ६ वाजता ते हॉस्पिटल म्हणून तसंही करून बघितलं. पण कसचं काय, समोर ७-८०० चा आकडा नुसता यायचा आणि आम्ही टाईपेपर्यंत शून्य. संगणक अशिक्षित वगैरे आहोत कि काय असा कॉम्प्लेक्स पण आला थोडा फार. तोवर दुसरा लॉक डाऊन जाहीर झाला. तेव्हा मग अपॉइंटमेंट बुक करण्याचे सतराशे साठ मार्ग मिळेल त्या सोशल मीडियावरून सर्वदूर पसरत गेले. साधी अपॉइंटमेंट घ्यायची त्याचा इतका अभ्यास का करावा लागतोय, आणि इंजेक्शन घेण्यासाठी आपण इतका आटापिटा का करतोय याचं सतत आश्चर्य वाटत होतं तो भाग वेगळाच. 

अखेरीस १ जून ला, आज काही झालं तरी स्लॉट बुक करायचाच असा चंग बांधला आणि दुपारपासून एक कॉम्प्युटर, दोन मोबाईल सगळीकडे कोविन उघडून बसलो. व्हॅक्सिनस्लॉट डॉट कॉम या साईट वरून ओपन झालेल्या प्रत्येक स्लॉट साठी प्रचंड आवाजात अलार्म वाजत होता. दर १० मिनिटांनी नवा ओटीपी घेण्यासाठी बाल्कनीतून बाहेर जा आला की आत या, मग सिक्रेट कोड टाका आणि एंटर… सॉरी स्लॉट अन ऍव्हेलेबल… जवळपास १२०० स्लॉट हातचे गेले… शेवटी ६:१५ वाजता तो क्षण आला आणि शाश्वत झाला… सुटलो म्हणतेय तोवर नवऱ्याने सांगितलं फक्त त्यालाच मिळाला. अरे देवा … पुन्हा स्लॉट बुकिंग, वाढलेलं बीपी, त्याहून मोठा तो अलार्म, कुकरच्या चुकलेल्या शिट्ट्या, जास्त उकळल्यामुळे तळाशी गेलेली आमटी, संध्याकाळी गॅलरीतून आत बाहेर केल्यामुळे आत घुसलेले डास, ह्या सगळ्यामुळे जाऊ दे तो स्लॉट म्हणावसं वाटत होतं, पण तेवढ्यात व्होडाफोन ची रेंज, कोविन चा ओटीपी, आणि लालवाणी चा स्लॉट या सर्वानी माझ्यावर कृपादृष्टी दाखवली आणि आम्ही एकदाचा तोही स्लॉट बुकला. आत्ताशीक कुठे स्लॉट बुक झाला होता, त्यापुढे व्हॅक्सिन, त्यापुढे साईड इफेक्ट, मग पुन्हा हे सगळं परत छे छे … इट्स सो मच गंभीर … दुसऱ्या दिवशी मग लालवाणींच्या कृपाछायेत २८४ वा नंबर लागला आणि दोन तास उभी आणि बैठी प्रतिक्षा केल्यानंतर त्या लशीचा साक्षात्कार झाला. बाहेर पडता पडता खिरापत वाटावी तसं नर्स ताईंनी क्रोसिनच्या १० गोळ्यांचं एक पाकीट सुहास्य वदने सादर हाती दिलं. मी ही गुणी बाळासारखं ते घेऊन घरी आले. स्लॉट बुकिंग च्या त्रासापुढे व्हॅक्सिन चा साईड इफेक्ट काहीच नव्हता. वाढतं व्हॅक्सिनेशन, कंटाळलेली प्रजा, मागे पडू बघणारी अर्थव्यवस्था आणि आकडेवारीत गुंडाळलेला पॉझिटिव्हिटी रेशो घेऊन पुणं लेव्हल ४ कडून ३ कडे असं लढायला सज्ज झालं आणि लॉक डाऊन थोडा थोडा म्हणत बराचसा शिथिल झाला. 

लोकं घराबाहेर पडली, व्यायामशाळा भरू झाल्या, रिक्षा बसची संख्या वाढताना दिसली, भाजीवाले आणि दुकानदार न घाबरता विक्री करू लागले, ऑन लाईन  शाळेच्या फिया आणि टाईम टेबल जाहीर होऊ लागली, आजी आजोबा या मुलाकडून त्या मुलाकडे जाऊ लागले, नातवंडांना उन्हाळ्याच्या सुटीतले आजोळ पावसाळ्यात का होईना गाठता आले, मी लगेच नवऱ्याला सांगितले, गुरुजींना फोन कर… बघ मुहूर्त आणि त्यांची ऍव्हेलेबिलिटी बघ… कुणाचं काय तर कुणाचं काय… 

२०१९ च्या मे  महिन्यात म्हणजे करोनापूर्व काळात कार्यालय बुक केलं होतं मुंजीसाठी २०२० मे मध्ये होणाऱ्या मुंजीसाठी. वह तो होनेसे रही… म्हटलं आता ही घरातल्या घरात साधी सुटसुटीत मुंज तरी वेळेवर करूया. गुरुजींनी मुहूर्त आणि वेळा कळवल्या. त्यांनी वेळ असल्याचं कळवलं आणि आमच्या लेकाची मुंज यंदा पार पडू शकेल अशी चिन्ह दिसू लागली. सामानाच्या याद्या आल्या. कार्यालयात हात हालवत जाऊन फक्त कार्य करणाऱ्या पुणेकरांना साक्षात सामानाची यादी म्हणजे फारच झालं. करोनाटक असल्यामुळे गुरुजींनी बऱ्याच गोष्टी सोप्या करून टाकल्या होत्या. प्रतीकात्मक असं म्हटलं की सुशिक्षित (किंवा आळशी) लोकांना आवडतं .. तसेच आम्हीही खूष झालो. मातृभोजनाला वरण भात आणि प्रसादाचा शिरा सुद्धा पुरे झाला… अहाहा ...व्हॉट लाईफ!! 

मग शुक्रवारात काळे आणि कंपनी कडे यादी घेऊन गेले, हल्ली एक बरं झालंय, दुकानदार एकदम प्रोऍक्टिव्ह असतात, नुसतं मुंज म्हणताच सगळं सामान समोर हजर केलं त्यांनी आणि शिवाय त्यांच्याच कडची एक यादी मला अजून काही राहिलेलं असेल तर बघा म्हणत हातात ठेवली. (हल्ली मुलाच्या शाळेच्या वह्या पुस्तकांचं पण असंच असतंय, नुसतं शाळेचं नाव आणि इयत्ता सांगयची ..समोर गठ्ठा हजर… गलती की गुंजाईश की काय ती नाहीच) घरी येईपर्यंत ते पावसात दंड घेऊन चाललेलं माझं ध्यान बघून लोक काय म्हणाले असतील म्हणोत बापुडे.. पण मी आपलं तो दंड कुठे पडू बिडू नये तुटू नये म्हणून गाडीच्या कॉर्नर ला बांधून ठेवला… ब्रह्मदंडच तो, माझं कसलं ऐकायला जरा उजवीकडे डावीकडे वळायची सोय नाही, फक्त सरळ हँडल ठेवून प्रवास करायचा… कार्याची सगळी तयारी करून घरच्या घरी उपनयन सोहोळा करण्यासाठी मंडळी सज्ज झाली. आजीआजोबांनी कोड कौतुक करून नातवासाठी रेशमी सोवळं, उपरणं, पगडी, भिकबाळी सगळी जय्यत तयारी केली. हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, ह्याला कशाला धरायचं, ह्याच्या आत खरंच देव असतो का, अशा प्रश्नांना उत्तरं देत देत गुरुजींनी आमच्या चिरंजीवांना गायत्री मंत्राची दीक्षा दिली. जानवे घातले त्यातील ब्रह्मगाठ समजावून सांगितली, संध्या कशी करायची ते सांगितले आणि इथून पुढे विद्या आणि व्यायाम ही दोन उद्दिष्ट असेही बजावले. त्यांनतर आमचा बटू आम्हालाच छोटंसं प्रभावळ घेऊन हिंडत असल्यासारखा तेजस्वी दिसत होता. एकुणात काय तर असा आमचा हा छोटेखानी सोहोळा यथासांग पार पडला. 

पण खरी मजा चालू होतेय ती त्यांनतर. ‘ब्रह्मगाठ आहे ती, आत्मा असतो तिच्यात’, ‘बघ हं तू गुरुजींना प्रॉमिस केलेलं आहेस’, ‘आता हवं तेच घे पानात, टाकायचं नाही’, ‘अरे मागायचं नाही काही, आम्ही जे देऊ तेवढंच घ्यायचं आणि समाधानी राहायचं’ असं चिडवता चिडवता परवा चिरंजीवांनी ऐकवलं, ‘ए आई, हे मी नाही करणार, आतापासून मी सूर्याचा मुलगा आहे.’ यावर काय बोलायचं ह्याचा शोध तूर्तास चालू आहे…


चित्रकार: सायली भगली - दामले (मुंजीच्या पत्रिकेसाठी तिने काढलेले हे चित्र)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा