लेहर समंदर रे...

 



         सुमित्रा भावे- सुनिल सुकथनकर यांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘कासव’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी सोनी लाईव्ह वर उपलब्ध झाला. एक नितांत सुंदर चित्रपट, कथा, दिग्दर्शन, उत्तम अभिनय या सर्वच गोष्टींसाठी जरूर पाहावा असा. कोणत्याही पडद्याआड नसलेलीशी, आकंठ साधीशी, नितळ, निरागस आणि खरीशी, माझी तुमची प्रत्येकाची गोष्ट वाटावी अशी ही कथा.

       ‘मला काय करावं काही सुचत नाही, सगळंच नकोसं वाटतं अगदी सहानुभूतीही’; ‘माझा मलाच मी आवडत नाही’ असं म्हणणारं मुख्य पात्र शेवटी कुठेतरी 'आजूबाजूला कोणी नाही म्हणून थोडं कावरंबावरं होतं, कोणासाठी तरी जीव टाकून धावत सुटतं'. चित्रपट संपून जातो पण प्रेक्षक म्हणून आपला प्रवास मात्र इथून सुरु होतो तो कायमसाठी. हे हे साधं साधं सगळं किती अवघड असतं असं वाटून जातं, त्यातलंच एक वाक्य "झडझडून काम करायचं, भरभरून कष्टाचं खायचं, जीवाला जीव लावायचा, कशाला वाटतंय एकटं? एकटं बसलं तर एकटंच वाटणार!!" किंवा 'सुख दुखणं' या वाक्प्रचाराचा कुठे तरी लागणारा संदर्भ राहून राहून डोकं वर काढतोय;

         त्याच बरोबर मनात रुंजी घालत आहेत ती चित्रपटाच्या कथेनुरुप येणारी 'लेहर समंदर रे' आणि 'अपनेही रंग में' ही दोन्ही गाणी, समुद्राची गाज, एकामागून एक येणार्या पाण्याच्या लाटा आणि विचारांच्याही... कधी वेगवान लाटा कधी संथ लाटा, कधी दिवसाच्या लाटा कधी रात्रीच्या लाटा, कधी भरभरून येणाऱ्या लाटा कधी दूर सारून लांब निघून जाणाऱ्या लाटा, कधी चकाकणाऱ्या लाटा कधी निस्तेज लाटा, कधी गडबडीने घोंघावत येणाऱ्या लाटा तर कधी एकट्या निशब्द लाटा, कधी प्रसन्न लाटा कधी खिन्न लाटा, कधी बिनधास्त लाटा तर कधी कचखाऊ लाटा, कधी लोभसवाण्या लाटा तर कधी किळसवाण्या लाटा, कधी हव्याशा लाटा कधी नकोश्या लाटा... अन् मग हळूहळू ओळखीच्या लाटा, सवयीच्या लाटा, दमलेल्या लाटा, थकलेल्या लाटा, फेसाळलेल्या लाटा, पिसाळलेल्या लाटा, जोखायच्या लाटा, रोखायच्या लाटा, कसलेल्या लाटा, फसलेल्या लाटा, चुकलेल्या लाटा, बेसुमार लाटा, अनंत लाटा आणि निरंतर लाटाच...


टिप्पण्या