भिगवण पक्षी अभयारण्य

                 Pic credits : Saket Khambete
आर्क्टिक टर्न सर्वाधिक अंतरावर स्थलांतर करणारा पक्षी तर ऍल्बेट्रॉस पक्षी दक्षिण समुद्रावरुन पृथ्वी प्रदक्षिणा घालतो. दिवसांचा काळ किंवा लहान मोठे होणारे दिवस स्थलांतराचे नियंत्रण करतात. आकाशात असणारे ग्रहगोल, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि पक्षांचं उपजत ज्ञान त्यांना स्थलांतर करताना दिशा देतं. हे सारं काही शास्त्राचा अभ्यास म्हणून वाचलं होतं. 
           गेल्या आठवड्यात भिगवण पक्षी अभयारण्याला भेट दिली आणि फ्लेमिंगो पक्षांचे थवेच्या थवे पाहायला मिळाले. गुलाबी पांढऱ्या रंगाचे हे बगळा कुलोत्पन्न परदेशी पक्षी भलतेच कमाल दिसत होते. हे पक्षी सामान्यत: एक पाय दुमडून फक्त एका पायावर उभे राहतात, कदाचित ऊब मिळविण्यासाठी किंवा शक्ती टिकवून ठेवण्यासाठी ते असं करत असावेत. यांची पिले राखाडी रंगाचे असतात, ती मोठी होतात तसतसा त्यांचा रंग फिकट किंवा गडद गुलाबी होत जातो. ते जवळपास ४ ते ५ फूट उंचीचे असतात.     
फ्लेमिंगो पक्षी प्रामुख्याने हिरवे शेवाळे खातात, तसेच उथळ पाण्यातील किटक, आळ्या, गोगलगायी असे प्राणी खातात. त्यांना गुलाबी किंवा लालसर रंग त्यांच्या या प्लँक्टनच्या आहारामुळे, त्यातील कॅरोटीनॉइड्समुळे येतो. 
            भिगवण कडे जाताना डाळज गावाच्या फाट्यावरून आत शिरल्यापासूनच खरं तर आम्ही वेगवेगळ्या पक्षांना पाहात, त्यांच्या नावांची उजळणी करत निघालो होतो, अगदी चिमण्या, कावळे, डोमकावळा, चष्मेवाला, हळद्या, शेकाट्या, सुगरण पक्षी असे कितीतरी पक्षी दिसले. उजनी धरणाच्या मागे असलेल्या या जलाशयाच्या काठावर तर शेकडो प्रकारची बदके, बगळे, पाणकावळे, सारंग, करकोचे पाहायला मिळाले.
फ्लेमिंगो पक्षासारखी दिसणारी चित्रबलाक किंवा पेंटेड स्टॉर्क या नावाने ओळखली जाणारी भारतीय जातही तितकीच सुरेख दिसत होती. यातील ऑस्ट्रेलियन सीगल पक्षांनी तर चक्क घरगुती स्वागतही केले. बाकी उंच भरारी घेत आत्ताच क्षण अनुभवायचा की तो छायाचित्रात घ्यायचा हे ठरवताना मजेशीर फजिती होत होती. याबरोबरच हे फ्लेमिंगो सातत्याने पार्श्वसंगीत देऊन नाट्यमयता आणखी वाढवित होते. पुण्यापासून दोन सव्वा दोन तास अंतरावर असलेल्या भिगवणच्या निसर्गानं एक ठेवणीतला अनुभव दिला.
            एक कमाल वाटली या स्थलांतरीत पक्षांची, त्यांचं कसं सगळं नैसर्गिक... पण मानवाचं आगमन, स्थलांतर आणि निर्गमन हे मात्र विधी लिखीत... अर्थात त्याला छेद देत उद्या हबल म्हणू लागेल की ती तिथे दूर वर दिसणारी जी बिंदू सम आकाशगंगा आहे नां... तिथले पूर्वीचे तुम्ही बघा कसे दिसता... मग काय सगळं कोलमडूनच जाईल नां राव! एकीकडे आपण संपूर्ण ग्रहावरील मानवजातीने एक होऊन बहुग्रहवासी होण्याची स्वप्ने आणि दुसरीकडे मात्र स्वदेशसीमा वाढविण्यासाठी आटोकाट प्रयत्न....

टिप्पण्या