ट्विटर: समाजाचे की मस्कचे माध्यम?


आपल्यापैकी काहींचा जन्म झाला तेव्हा इंटरनेटचा उदयही झालेला नव्हता. त्वरीत प्रतिक्रिया, मेसेज, पिंग असल्या गोष्टींचा थांगपत्ता नव्हता. स्पॅम मेल्स, स्युडो कोड्स, बॉट्स अशा गोष्टी खिजगणतीतही नव्हत्या. पण आपल्यापैकी काहींचा जन्म झाला तोच मुळी फेसबुकचा प्रोफाईल अपडेट करत. काहींनी अभ्यास केला तो व्हॉटस ऍप वापरत, काहींनी व्यवसाय मोठा केला तो इंस्टाग्राम वापरत आणि काहींनी चक्क नेत्याला मत दिले ट्विटर फॉलो करत... समाज माध्यमांचा सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यावर पगडा कधी बसला ते कळलंही नाही. लांबवर राहणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवता ठेवता माणूस त्याचे विचार, भावना, अनुभव या माध्यमातून मांडू लागला. करमणूक, खरेदी-विक्री, मार्केटिंग  करता करता आजच्या घडीला मोबाईलवाचून आणि पर्यायाने समाज माध्यमांशिवाय त्याचं पान हलेनासं झालं. अर्थातच अशा समाज माध्यमाच्या संदर्भात जरा काही घडलं की त्याचे पडसाद केवळ एखाद-दुसऱ्या देशात नाही तर जगभरात उमटताना दिसणारच, आणि त्यात जर एलॉन मस्क सारखा अतिश्रीमंत आणि हाती घेतलेलं काम तडीस नेणारा व्यक्ती संबंधित असेल तर मग काय विचारावं!

आहे तरी कोण हा एलॉन मस्क?... जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. अंतराळात वसाहत निर्माण करण्याची स्वप्न सत्यात उतरवणारी, तेलावरील जगाचं अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक गाड्या आणि सौरशक्तीचा वापर करून गृहसंकूल बांधणारी, इतकंच नव्हे तर मानवी मेंदूमध्ये संगणकीय शक्ती जोडण्याची योजना आखणारी ही असामी. व्यावसायिक महत्त्वाकांक्षेसाठी ओळखल्या  जाणाऱ्या आणि अमाप संपत्तीचा धनी असणाऱ्या या व्यक्तीने गेल्या आठवड्यात ट्विटर हे  एक प्रभावशाली समाज माध्यम विकत घेण्याचा घाट घातला आहे. ट्विटर ची स्थापना २००६ मध्ये झाली. आज जगभरातून जवळपास ३३० दशलक्ष लोक ट्विटरचा वापर करतात. यावर  ट्विट्सच्या माध्यमातून संवाद साधला जातो. ज्यातून कमीत कमी शब्दांचा वापर करून माहितीची देवाणघेवाण केली जाते. मस्क आणि ट्विटर यांचं नातं तसं फार नवं नाही. ट्विटरवरुन त्याने वेळोवेळी विविध मतं मांडलेली आहेत, त्यामुळे कधी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे तर कधी त्याला काही विशिष्ट विषयावर ट्विट करण्यास बंदीदेखील घातली गेलेली आहे. त्याच्या काही जुजबी ट्विट्समुळे क्रिप्टोचलनाच्या भावांत बदल होतानाही दिसून आलेला आहे. अशा पार्श्वभूमीवर ट्विटरचा मालक बनून तो कोणत्या सीमा ताणेल आणि कोणत्या नियमांना आव्हान देईल याचा अंदाज बांधणं कठीण आहे. त्याने हा निर्णय का घेतला असावा आणि त्या माध्यमाचं भवितव्य काय असेल याबद्दल अनेक किंतुपरंतु आज सर्वांच्या मनात उभे आहेत. 


मोठ्या माशाने छोट्या माशाला गिळंकृत करण्याचा हा व्यवहार आजकाल काही नवा नाही. परंतु एका यशस्वी आणि हाडाच्या व्यावसायिकाकडून एखादे प्रसारमाध्यम विकत घेतले जाते तेव्हा त्यातील घटनाक्रमही अभ्यासण्यासारखा असतो. मस्क याचा ‘ट्विटर कंपनीचा सर्वात मोठा समभागधारक’ ते ‘कंपनीचा मालक’ हा प्रवास तसं पाहता गेल्या महिन्याभरापुरताच होता. घटनाक्रम बघायचा तर;

१. गेल्या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत त्याने ट्विटरच्या शेअर्सची सातत्याने खरेदी केली. चार एप्रिल रोजी ट्विटर कंपनीच्या एकूण भागभांडवलापैकी ९.२ टक्के एकट्या मस्कच्या ताब्यात होते. 

२. पाच एप्रिलला 'ट्विटर'चे सीईओ पराग अगरवाल यांनी मस्क यांची कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्ती करत असल्याची बातमी ट्विटद्वारे जाहीर केली. यावर रीट्विट करीत मस्कने ट्विटरच्या संचालक मंडळासोबत काम करीत येत्या काही महिन्यांमध्ये ट्विटरमध्ये लक्षणीय सुधारणा केल्या जातील असे सुचवले.

३. परंतु काही दिवसांतच संचालक मंडळाचा भाग न होता मस्कने चक्क कंपनीच विकत घेण्याची तयारी दर्शविली. १४ एप्रिल रोजी त्यांनी तशी ऑफर दिल्याचे जाहीर केले. यानुसार त्यांनी प्रति शेअर ५४.२० डॉलर प्रमाणे ट्विटर विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला. 

४. त्यावेळी ट्विटरच्या संचालक मंडळाने निर्णय पुढे ढकलण्यासाठी काही वेळ घेत मस्क यांची ही ऑफर स्थगित करण्याचाही प्रयत्न केला.

५. काही बैठका आणि विचारविनिमयानंतर ट्विटर बोर्डाला ही ऑफर पसंत पडली व  बोर्डाने ऑफर मान्य केली असून बऱ्याच अनिश्चिततेनंतर हा करार प्रत्यक्षात आल्याचे जाहीर करण्यात आले. 

 

'टेस्ला', 'स्पेस एक्स' या कंपनीचा संस्थापक, 'पेपल' या ऑनलाइन पेमेंट कंपनीचा सहसंस्थापक असलेल्या मस्कचे ट्विटरवर जवळपास ८ कोटी ७१ लाख फॉलोअर आहेत. त्याची एकूण मालमत्ता २६९.७ अब्ज डॉलर असून, 'ट्विटर' खरेदी करण्यासाठी त्यांना ४४ अब्ज डॉलर मोजावे लागणार आहेत. १६ वर्षानंतर इतर प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत फार लाक्षणिक प्रगती केलेली नसताना याप्रकारची ऑफर मिळाल्याने ट्विटरचे संस्थापक आणि समभागधारक समाधानी असण्याची शक्यता अधिक आहे. परंतु या घटनेनंतर ट्विटरच्या कर्मचाऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत. काही यामुळे खुश आहेत तर काहींनी कंपनी सोडण्याचे ठरविले आहे. मस्कने ट्विटर खरेदी केल्यानंतर कंपनीत मोठे बदल होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यापैकी काही महत्त्वपूर्ण बदलांचा आढावा घ्यायचा तर तो असा; 

 

१. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणारं व्यासपीठ: ट्विटरची खरेदी करण्याच्या निर्णयाप्रत येण्यापूर्वीपासूनच त्याने ट्विटरबाबतही अनेकदा स्पष्ट मते मांडलेली आहेत. यामध्ये ट्विटर या माध्यमाद्वारे पुरेशा प्रमाणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले जाते का यावर जनमताचा कौलही त्याने घेतला होता. यामध्ये सहभागी झालेल्या साधारण २० लाख ३५ हजार फॉलोअरपैकी ७० टक्क्यांहून अधिक लोकांनी त्याचे उत्तर नकारार्थी दिले. मस्क स्वत: ट्विटरवर सक्रीय असल्याने त्यानी पूर्वीपासूनच ट्विटरच्या धोरणावर विविध प्रसंगी टीका केली होती. त्याच्या मते ट्विटर संपूर्ण क्षमतेने वापरले जात नाही. मस्कची या माध्यमाची मालकी घेण्याचा हेतूच  ‘ट्विटर वर कोणालाही आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य असावे, त्यावर कोणतेही बंधन असू नये.’ असाच दिसून येत आहे. 

२. ट्विटरचा अल्गोरिदम ओपन सोर्स केला जाईल: एलॉन मस्कच्या मते अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच अल्गोरिदम ओपन सोर्स करणे गरजेचे आहे. ज्यामुळे ट्विटरच्या कार्यप्रणाली मधील पारदर्शकता समोर येईल आणि वापर करणाऱ्यांची संख्या वाढेल.  ट्विटर कोड गिट हबवर उपलब्ध व्हायला हवे, असेही त्याने  म्हटले आहे. (गिट हब हे असे व्यासपीठ आहे ज्याच्या माध्यमातून विविध कंपन्या त्यांचे सॉफ्टवेअरचे कोड सर्वांना उपलब्ध करून देऊ शकतात. जेणेकरून वरवर पाहता स्क्रीनवर घडणाऱ्या गोष्टींच्या मागे चालणारी तर्कसंगत प्रक्रिया सामान्य माणसापर्यंत पोहोचू शकते). उदाहरण घ्यायचे तर एखादा वापरकर्ता जेव्हा एखादी रीट्विट करतो तेव्हा त्याला एक विशिष्ट क्रम दिलेला असतो असे घडताना यांच्यामागे एक गणिती कार्यपद्धती पूर्णवेळ कार्यरत असते. यामुळे पारदर्शकता आणि परिणामकारकता दोहोंत वाढ होऊ शकते. 

३. खऱ्या वापरकर्त्याचे प्रमाणीकरण: सध्या ट्विटरवर बनावट अकाऊंट किंवा बॉट्सची संख्या प्रचंड आहे. तेव्हा अशाप्रकारचे खोटे बॉट्स हटवून खरे वापरकर्ते मिळवणे आणि खरी फॉलोअर्सची संख्या मिळवणे हाही एक उद्देश आहे. माहितीच्या सामग्रीचे नियंत्रण करण्याची पद्धत आणि सेंसरशिप याबाबत देखील पाऊले उचलली जातील असा अंदाज आहे. 

 

आता, हे सर्व कशाप्रकारे केले जाईल हे अजूनही अस्पष्ट आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबर येणारा हक्क आणि जबाबदारी यांचा समतोल कसा साधला जाईल हे अधिक महत्त्वाचं आहे. जर असे झाले तर ते एक प्रभावी व्यासपीठ नक्की होऊ शकेल मात्र ते अधिक मोकळेपणाने वापरले जाऊन स्वातंत्र्याच्या गूढगर्भी लपलेला स्वैराचार तर डोकं वर काढणार नाही नां अशी शंका अनेकांच्या मनात येत आहे. डिजिटल समाज माध्यम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपन्यांची स्थापना केली गेली तेव्हा, ज्यावेळी ‘ज्याला जे हवं ते ऑनलाईन म्हणू द्यावं’ असं म्हटलं गेलंच, पण तेव्हाच नैतिक, व्यावहारिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रत्येक प्रमुख व्यासपीठाने अभिव्यक्तीच्या मुक्ततेचे  कायदेशीर नियमनही केले. द्वेष, छळ, नकारात्मकता, स्पॅमी, धमकवणूकीची वा खोटी माहिती याविरुद्ध काही नियम लागू केले गेले. हे नियम वापरकर्ते आणि जाहिरातदार दोघांसाठी एखाद्या व्यासपीठावर अधिक काळ टिकून राहण्यासाठी मदतीचे ठरले. 



एलॉन  मस्कने कराराची घोषणा करताना म्हटले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा कार्यरत लोकशाहीचा मूलाधार आहे आणि ट्विटर हा डिजिटल टाउन स्क्वेअर आहे जिथे मानवतेच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्टींची चर्चा केली जाते. ट्विटरची खरेदी करून झाल्यानंतर मस्कने त्याच्या ट्विट्समधून त्याचे धोरण डाव्या टोकाचे १०% आणि उजव्या टोकाचे १०% यांना असमाधानी ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच ८०% जनसामान्यांसाठीच हे व्यासपीठ असल्याचे म्हटले गेले आहे. अगदी माझा टीकाकारही ट्विटरवर राहायला हवा असे त्याचे म्हणणे आहे. निष्णात व्यावसायिक असलेल्या मस्कला ट्विटर राजकीयदृष्ट्या तटस्थ ठेवायचे आहे. पण प्रत्यक्षात टेस्ला ची मोठी बाजारपेठ असलेल्या चीनविषयी तो साधरणत: मौन बाळगताना दिसतो  तर रशियामध्ये व्यावसायिक हितसंबंध नसल्याने त्यावर टीका करताना दिसतो. भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्याच्या स्पेस एक्स द्वारे प्रदान केली जाणारी स्टारलिंक ही ब्रॉडबँड सेवा भारतात देऊ करण्यासाठी विनापरवाना प्री-बुकिंग स्वीकारले गेल्याने त्याच्या कंपनीचे अधिकारी अडचणीत आले होते.  भारतातील इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्क जास्त असल्याविषयी त्याने त्याची नापसंती ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली होती. भारताने त्यावर या कार्सचे भारतात उत्पादन केले जावे असे सुचवले होते. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समर्थक म्हणून मस्कची अधिकारवाणी ही कितपत विश्वासार्ह आहे याचा सावधतेने उहापोह करायला हवा.

या माध्यमाची मालकी घेताना जशी मुक्त विचार मांडण्याची संधी देऊ केली जाईल तसेच त्या व्यासपीठावरील वापरकर्त्यांच्या विचारसरणीवर नियंत्रण केले जाऊ शकेल का अशीही शंका अनाठायी नाही. पारंपारिक प्रसारमाध्यमे विचारात घेतली तर त्यावर असणारा राजकीय पक्षांचा पगडा आणि त्या अनुषंगाने केले जाणारे राजकारण सामन्यालाही दिसून येण्यासारखे आहे. आजकाल डिजिटल समाज माध्यमाचा वापर करून विविध प्रकारची माहिती नुसती पोहोचवली नाही तर पसरवली जाऊ शकते. पुरोगामी, सनातनी, डावे, उजवे अनंत विचारांचे लोक या समाजाची मानसिकता घडवत-बिघडवत असतात. अशावेळी योग्य त्या नियंत्रणाच्या कुंपणात जर वैचारिक उत्खनन आणि देवाण-घेवाण झाली तरच ती समाजोपयोगी ठरु शकते. वरवर पाहता लोकांनी लोकांशी लोकांना हवे ते बोलावे अशी प्रतिमा घेऊन येणाऱ्या नव्या ट्विटरच्या चेहऱ्याआड खाजगी खिसे भरणारी एकाधिकारशाही तर लपलेली नाही नां हे येत्या काही दिवसांतच कळून येईल!

                                                                                                                                -नंदिता गाडगीळ

लिंक:https://www.mahamtb.com//Encyc/2022/5/1/article-on-elon-musk-buys-twitter-.html



टिप्पण्या