आद्य दुर्बीण
पहिल्या आकाशगंगेची निर्मिती कशी बरं झाली? ग्रह, लघुग्रह, उल्का, अशनी यांची निर्मिती कशामुळे होते? दूरचे तारे बघता येतील का? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं विज्ञानाकडे असतात का? मोठमोठ्ठे प्रश्न… उत्तरं नसणारे! मग अशा वेळी काय करायचं? खगोलशास्त्रज्ञ म्हणतात, घाबरायचं नाही, उत्तरं शोधत राहायचं! पण मग या अक्राळविक्राळ अंतराळाचा अभ्यास करायचा तरी कसा? अवकाशाचं अवाढव्य रूप त्याच्या बारकाव्यासह स्पष्टपणे बघायचं तरी कसं... ते बघायचं दुर्बिणीच्या मदतीने! दुर्बिणी अस्तित्वात येण्यापूर्वीही जगभरात खगोलशास्त्रातील विविध निरीक्षणे नोंदविलेली आहेत. भारतात तर यासाठी वेधयंत्रे वापरली जात.
फार पूर्वी पार १६०८ मध्ये एका डच चष्मे बनविणाऱ्याने दोन भिंगे एकासमोर एक अशी एका बारीक नळीमध्ये घालून पहिली व त्याला दूरवरील गोष्टी जवळ आलेल्या दिसल्या. आणि त्याच्याही नकळत त्याने पहिली दुर्बीण बनवली. त्यानंतर इटालियन खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ याने अशीच एक दुर्बीण बनवली व तिचा उपयोग करून सर्वात पहिल्यांदा अवकाशाचे निरीक्षण केले. गॅलिलिओच्या या आद्य दुर्बिणीमध्ये त्याने २.६ सेमी व्यासाचे भिंग वापरले होते. इतकीशी लहानशी दुर्बीण वापरून त्याने अंतराळातील आकाशगंगेचे रूप, चंद्रावरील खडबडीत भाग, गुरुचे उपग्रह यासारखी विविध निरीक्षणे केली. (आद्यदुर्बीणीचे छायाचित्र: ब्रिटानिका.कॉम)
पुढील काळात विश्वाचे दर्शन घडविणाऱ्या दुर्बिणी अधिकाधिक कार्यक्षम करण्यासाठी भिंगाचा आकार वाढवून त्यातून अधिकाधिक लांबचा प्रकाश केंद्रित व्हावा यासाठी प्रयत्न केला गेला. परंतु त्याच वेळी प्रचंड आकारामुळे त्या दुर्बिणीचे एक टोक घुमटाने झाकावे लागे. एवढे करूनही प्रकाशाचे प्रतिबिंब मात्र स्पष्ट दिसत नव्हते. १६६८ मध्ये न्यूटनने सर्वात प्रथम आरशांचा वापर करून परावर्तन दुर्बिणीची निर्मिती केली. आरशाचा वापर केल्याने तेजस्वी प्रतिबिंब दिसू शकले. आजच्या काळातही बिंब स्पष्ट दिसावे यासाठी एक सलग मोठा आरसा न वापरता आरशाचे लहान लहान तुकडे वापरणे, तापमान आणि वाऱ्याचा झोत यांचा आरशावर परिणाम होऊ नये म्हणून नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणे अव्याहतपणे चालू आहे.
संदर्भ: आकाशाशी जडले नाते: डॉ. जयंत नारळीकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा