रेडिओ दुर्बीण

 

 दुर्बिणीच्या साहाय्याने मूळ दृश्य प्रकाशझोताची तीव्रता मोजणे, संगणक वापरून प्रकाशातील फोटॉनचे कमी-अधिक प्रमाण दर्शविणे, तारकांचे वर्णपट घेणे यासारखी निरीक्षणे केली जात होती. अशी प्रगती होत असताना रेडीओ लहरींचा वेध घेऊन सर्वप्रथम खगोलनिरीक्षण केले ते कार्ल्स जान्स्की या अभियंत्याने. अवकाशातील तारे त्यांच्या अंतरंगात घडत असलेल्या घडामोडींमुळे विद्युच्चुंबकीय लहरींचे उत्सर्जन करत असतात. क्ष किरण, सूक्ष्मलहरी, टीव्हीच्या लहरी हे यांचेच प्रकार. त्या लहरींचा अभ्यास करायचा असेल तर तो पृथ्वीच्या वातावरणापलीकडे जाऊन करावा लागतो. या दुर्बिणींची निर्मिती करताना रेडीओ लहरींची उर्जा वाढवू शकणारे वर्धक आणि दृश्य प्रकाशापेक्षा कित्येक पट असणाऱ्या तरंगलांबीला ग्रहण करण्यासाठी तिचा महाप्रचंड आकार लक्षात घ्यावा लागतो. 

 

(जीएमआरटी मधील रेडीओ दुर्बिणींचा समूह)

दुर्बीण आकाराने जितकी मोठी, तितकी ती फिरवायला कठीण असते म्हणून अनेक दुर्बिणींचा एक समूह बनवला जातो. अशीच एक महाकाय दुर्बीण आपल्या पुण्याजवळच्या जुन्नर तालुक्यात खोडद या ठिकाणी आहे. मीटर तरंगलांबी असणार्‍या लहरींचा वापर करणारी महाकाय दुर्बीण. साधारणपणे २० सेमी ते २ मीटर तरंगलांबी असलेल्या रेडिओ लहरींचा अभ्यास येथे केला जातो. येथे ४५ मीटर व्यास असणारे ३० डिश अँटेना आहेत. एकमेकांपासून विशिष्ट अंतरावर असणारे २ किंवा अधिक रेडिओ अँटेना एखाद्या रेडिओ स्त्रोताची उगवल्यापासून मावळेपर्यंतची पुष्कळ निरीक्षणे घेतात. त्यातून एकत्रित निष्कर्ष काढून त्यावर गणिती प्रक्रिया करून त्या रेडिओ स्त्रोताची एक प्रतिमा तयार केली जाते, ती जवळजवळ एकाच मोठ्या दुर्बिणीतून निरीक्षण घेऊन तयार केलेल्या प्रतिमेइतकी चांगली असते. या अँटेनाच्या खोलगट डिशवर असणाऱ्या आरसावरुन अवकाशातल्या रेडिओ स्त्रोतांकडून येणाऱ्या लहरी परावर्तित होऊन त्या दुसऱ्या अँटेनाकडे पाठवल्या जातात. तो अँटेना या विद्युच्चुंबकीय लहरींचे विद्युतप्रवाहात रूपांतर करतो. या समुहातील दुर्बिणींच्या मदतीने पल्सार ताऱ्यांचा बारकाईने अभ्यास, विश्वाच्या आदिकाळातल्या तारकाविश्वांच्या निर्मितीतून उमटणाऱ्या लहरी ई. ची माहिती मिळविणे चालू आहे.

संदर्भ: https://www.maayboli.com/node/69520

टिप्पण्या