हबल अंतराळ दुर्बीण

 

हबल अंतराळ दुर्बीण

हबल ही दृश्य प्रकाशाचा वेध घेणारी परावर्तन दुर्बीण १९९० मध्ये अंतराळात प्रक्षेपित केले गेली. ही दुर्बीण पृथ्वीभोवती ६०० किलोमीटर अंतरावरून फिरते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जेव्हा निरीक्षण केले जाते, तेव्हा सूर्यप्रकाश वायूमंडलातील धुलीकणांवर आपटून सर्वत्र पसरतो व बिंबे सुस्पष्ट दिसू शकत नाहीत. परंतु हबल सारखी दुर्बिण अंतराळात असल्याने ती वायूमंडलाच्या वरुन निरीक्षण करू शकते जेथे बिंबे स्पष्ट आणि स्थिर दिसू शकतात. या दुर्बिणीच्या बाबतीत घडलेली वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की ती अवकाशात असताना तिच्या आरशात काही दोष आढळले. त्या वेळी तिची दुरुस्ती, बदल वा त्यातील तंत्रज्ञान अद्यतन करण्याचे सर्व काम दुर्बीण जमिनीवर न आणता अंतराळात फिरत असताना केले गेले. हबल दुर्बिणीचे प्रमुख उद्दिष्ट होते विश्वाचे प्रसरण नेमके किती वेगाने होत आहे याचा शोध घेणे.

ही प्रचंड दुर्बीण स्पेस शटलचा उपयोग करून अवकाशात सोडण्यात आली. तिला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारण ९५ मिनिटे लागतात. या दुर्बिणीच्या दोन्ही बाजूंना सौर सेल जोडलेले असल्याने ती सौरउर्जेवर चालते.आरशाचा व्यास २.४ मीटर आहे. या दुर्बिणीतील कॅमेराची क्षमता जमिनीवरील दुर्बिणीपेक्षा १० पट सरस आहे. यावरील स्पेक्टोग्राफ विविध किरणांचे संकलन करून त्यातील वर्णपटाच्या नोंदी करतात. या दुर्बिणीमध्ये कॅमेराने टिपलेल्या प्रतिमेचे विश्लेषण करणारी अत्याधुनिक साधने जसे वाइड फिल्ड कॅमेरा, कॉस्मिक ओरीजीन स्पेक्ट्रोग्राफ, हाय स्पीड फोटोमीटर, फेंट ऑब्जेक्ट कॅमेरा यांसारखी अत्याधुनिक यंत्रे ठेवण्यात आली आहेत.हबलने अनेकविध चमत्कृतीपूर्ण नोंदी केल्या. या दुर्बिणीने आजवर लक्षावधी निरीक्षणे केली आहेत. यामध्ये आपल्यापासून अब्जावधी प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या विविध ताऱ्यांची आणि आकाशगंगांची निर्मिती आणि ऱ्हास कसा होतो, गुरूला येऊन आदळणारे धूमकेतूचे तुकडे, पृथ्वीवर आदळणाऱ्या वस्तूंची माहिती, आकाशगंगांमध्ये असणाऱ्या अब्जावधी ताऱ्यांची छायाचित्रे, विश्वाच्या वयाचा अंदाज, विश्वाचे मोजमाप, परग्रहांचा शोध, अनेक धूमकेतू, लघुग्रहांचा शोध, ई.चा समावेश होतो.

छायाचित्र व संदर्भ: https://www.nasa.gov/mission_pages/hubble/main/index.html


टिप्पण्या